VIDEO : धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपलेला; भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा व्हायरल व्हिडीओ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 17 January 2021

अलिकडेच टेस्ला कंपनीने भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

नवी दिल्ली : टेस्ला कंपनीच्या गाड्या ऑटोपायलट फीचरचा दावा करतात. याचा अर्थ असा की या गाड्या रस्त्यावर ड्रायव्हरशिवाय आपोआप धावू शकतात. सामान्यत: गाडी चालवताना ड्रायव्हरला सातत्याने सतर्क रहावं लागतं. सावधगिरीने वाहन चालवावं लागतं मात्र टेस्ला कंपनीच्या गाड्या याला अपवाद असल्याचं म्हटलं जातं. या गाड्या चालवताना तितकं सतर्क राहण्याची आवश्यकता नसते. मात्र, आता या संदर्भातीलच एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. चालू असणाऱ्या एका टेस्लाच्या कारमध्ये ड्रायव्हर आणि प्रवासी मस्त झोप काढताना दिसत आहे. त्यांच्यासाठी ही झोप आरामदायी असली तरीही बघणाऱ्यांचे मात्र झोप उडवून लावणारी आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याबाबत माहिती उपलब्ध नाहीये.

मात्र, ट्विटरवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. अलिकडेच टेस्ला कंपनीने भारतीय बाजारात प्रवेश करण्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काही लोक विचारात पडले आहेत की, भारतात देखील हे फीचर्स असणार आहेत का? आणि जर ते असतील तर त्याचे परिणाम काय होतील. याआधी घडलेल्या एका घटनेनुसार, मागच्या वर्षी टेस्ला ऑटोपायलट ड्रायव्हर डिप्टी शेरिफ कॅरोलिनामध्ये दुर्घटनाग्रस्त झाला होता, कारण तो गाडी सुरु असताना पिक्चर बघण्यात व्यस्त होता.

टेस्ला कारचे ऑटोपायलट फीचर सर्वाधिक चर्चेत आहे. lane centering, traffic-aware cruise control, self-parking, automatic lane changes, semi-autonomous navigation या सुविधांमुळे ही कार इतर कारपेक्षा वेगळी ठरते. मात्र, हे सगळं असताना देखील ड्रायव्हर हाच कारसाठी सर्वार्थाने जबाबदार असतो. 
या घटनेचा 20 सेंकदाचा व्हिडीओ ट्विटर अकाऊंट @knowIedgehub वर शेअर केला गेला आहे. हा कुठला व्हिडीओ आहे, याबाबत काही माहिती नाहीये. या व्हिडीओत आपण पाहू शकता की, ड्रायव्हर आणि प्रवासी दोघेही गाढ झोपेत आहेत मात्र गाडी आपणहून चालत आहे. या व्हिडीओवर उलटसुलट अशा प्रतिक्रिया आलेल्या पहायला मिळत आहेत.

हेही वाचा - VIDEO : 'अल्लाहू अकबर' म्हणत सामान सोडून पळू लागला; एअरपोर्ट केलं रिकामं

हे स्पष्टच आहे की, टेस्लाचे हे नवे फीचर्स ड्रायव्हर्सना झोपण्यासाठी दिले गेले नाहीयेत. एका विशिष्ट वेळेपर्यंत स्टेअरिंगला स्पर्श न केल्यानंतर एक बीप वाजतो जो ड्रायव्हरला सावध करतो. सध्याच्या ऑटोपायलट फीचर्समध्ये ड्रायव्हर असणे गरजेचं आहे. तसेच ही कार पूर्णत: ऑटोनॉमस नाहीये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Video Tesla Car Driver and Passenger Both Caught Sleeping in Moving Vehicle