अमेरिकेन सरकारचा महत्त्वाचा निर्णय; ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतिक्षेतील लाखो भारतीयांना दिलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 December 2020

अमेरिकेच्या या निर्णयाचा गेली अनेक वर्षे ‘ग्रीन कार्ड’साठी प्रतिक्षा करणाऱ्या अमेरिकेतील लाखो भारतीयांना प्रचंड फायदा होणार आहे.

वॉशिंग्टन- एच-१ बी व्हिसा वाटप करताना प्रत्येक देशासाठी ठरवून दिलेली मर्यादा अमेरिकेने आज रद्द केली आहे. तसेच, कौटुंबीक व्हिसाची मर्यादाही वाढविली आहे. अमेरिकेच्या सिनेटमध्ये याबाबतचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. अमेरिकेच्या या निर्णयाचा गेली अनेक वर्षे ‘ग्रीन कार्ड’साठी प्रतिक्षा करणाऱ्या अमेरिकेतील लाखो भारतीयांना प्रचंड फायदा होणार आहे.

उच्च कौशल्य असलेल्या स्थलांतरीतांच्या न्याय्य हक्कासाठीचे हे विधेयक सिनेटमध्ये मंजूर झाल्याने त्याचे कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे विधेयक गेल्या वर्षी जुलैमध्ये अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहात मंजूर झाले होते. अमेरिकेत अनेक भारतीय एच-१ बी व्हिसाच्या आधारे विविध कंपन्यांमध्ये काम करतात. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. हे भारतीय येथे येतात आणि त्यातील अनेक जण ग्रीन कार्ड, म्हणजेच अमेरिकेत कायमस्वरुपी राहण्याचा परवाना मिळविण्यासाठी अर्ज करतात. मात्र, ही अर्ज करणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने प्रतिक्षा काळ काही दशकांवर पोहोचला आहे.

पिरॅमिडसमोर फोटोशूट करणे मॉडेलला पडले महागात; फोटोग्राफरला अटक

याशिवाय, एकूण उपलब्ध व्हिसाच्या सात टक्के कुटुंबावर आधारित व्हीसा दिले जात होते, हे प्रमाणही आता १५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले आहे. आज मंजूर झालेल्या विधेयकामुळे रोजगारावर आधारित व्हिसावर असलेली ७ टक्क्यांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. यामुळे अमेरिकेत कामासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रीन कार्डच्या प्रतिक्षेत असलेल्या अमेरिकेतील भारतीयांसाठीचा प्रतिक्षा कालावधी १९५ वर्षांपर्यंत पोहोचला असल्याचे सिनेटर माइक ली यांनी सांगितले होते.
भारत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Visa limit revoked by US millions of Indians waiting for a green card