पुतीन यांना धडकी भरवणारा रशियाचा नेता कोण?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 23 August 2020

पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेल्या अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मॉस्को - पुतीन यांचे कट्टर विरोधक असलेल्या अॅलेक्सी नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवाल्नी यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. त्यांच्यावर अद्ययावत उपचार करण्यासाठी जर्मनी मदतीला तयार आहे. प्रकृती गंभीर असून नवाल्नी कोमात गेले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करून प्रवास शक्य नसल्याचं सांगत डॉक्टरांनी बाहेर उपचारासाठी नेण्यास नकार दिला होता. मात्र, त्यांना उपचारासाठी जर्मनीत हलवले आहे.

होय दाऊद इब्राहिम कराचीतच; पाकिस्तानने पहिल्यांदाच दिली कबुली

व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्याकडेच राष्ट्राध्यक्षपद रहावं यासाठी संविधानात सुधारणा करून घेतल्या आहेत. यासाठी जून महिन्यात देशात मतदानही घेण्यात आलं. यामुळे 2024 नंतर पुढच्या 16 वर्षांसाठी पुतीन सत्तेत राहू शकतात. याविरोधात भूमिका घेत नवाल्नी यांनी पुतीन हे भ्रष्टाचारी आहेत असा आरोप केला होता. तसंच त्यांनी संविधानात छेडछाड केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आता नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याबद्दल पुतीन यांच्यावर टीका वाढली आहे. 

अनेकदा तुरुंगवास

नवाल्नी यांनी अनेकदा रशियात सरकारविरोधात आवाज उठवला आहे. या प्रकरणी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आहे. 2011 मध्ये त्यांनी पुतीन यांच्या पक्षातील भ्रष्टाचारावरून टीका केली होती. पक्षाने संसदीय निवडणुकीत मतांमध्ये गडबड केल्याचा आरोप केला होता. तेव्हा 15 दिवसांसाठी तुरुंगातही जावं लागलं. तसंच 2013 मध्ये नवाल्नी यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. 

नवाल्नी यांना निवडणुकीपासून रोखले 

नवाल्नी यांनी 2018 मध्ये पुतीन यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे तयारी केली होती, पण त्यांना रोखण्यात आले. नवाल्नी यांनी देशभर प्रचार कार्यालये उघडली असून प्रांतिय निवडणूकांत ते सत्ताधारी युनायटेड रशिया या पक्षाविरुद्ध उमेदवार उभे करतात.

संस्था बंद पडली 

नवाल्नी यांनी फाऊंडेशन फॉर फायटिंग करप्शन ही संस्था सुरु केली होती. सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचे प्रकार उघडकीस आणले जायचे. गेल्या महिन्यात सरकारशी घनिष्ठ संबंध असलेले उद्योगपती येवगेनी प्रिगोझीन यांनी नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. त्यात विरोधात निकाल लागल्यामुळे जबर आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने ही संस्था नवाल्नी यांना बंद करावी लागली. 

विरोधकांवर याआधीही विषप्रयोग

रशियामध्ये विरोधकांना विष देऊन मारण्याचे अनेक प्रकार आधीही घडले आहेत. स्काय न्यूजच्या एका रिपोर्टनुसार 2006 मध्ये Alexander Litvinenko ला पोलोनियम 210 देऊन मारण्यात आलं होतं. रेडिएशन सिंड्रोममुळे भंयकर हाल होऊन मृत्यू झाला होता. अशा प्रकारे अनेक राजकारण्यांना पुतीन यांच्या विरोधात बोलण्यामुळे विष देऊन ठार केल्याचे आरोप सातत्याने होत असतात. 

महात्मा गांधींच्या चष्म्यासाठी लागली कोट्यवधींची बोली; वाचा रक्कम

नवाल्नी यांच्यासोबत काय घडलं?

अ‍ॅलेक्सी सायबेरियातील टोम्स्क इथून रशियाची राजधानी मॉस्कोला परत येत होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 800 किमी विमान उड्डाण झाल्यानंतर अचानक ओमस्क इथं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. सायबेरियातून अ‍ॅलेक्सी हे विमानातून परत येत होते. तेव्हा विमानात चहातून विष दिल्याचा संशय आहे. गरम चहामुळे शरीरात विष वेगानं मिसळल्याचंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vladimir Putin afraid of Navalny being poisoned in Russia