पायी चालणे मुलांच्या आरोग्याला हितकारक  मॉंट्रियल संशोधनाचा निष्कर्ष; स्थूलतेत होते घट

वृत्तसंस्था
रविवार, 1 एप्रिल 2018

"आयएनआरएस'च्या प्राध्यापिका ट्रेसी ए. बार्नेट यांच्या नेतृत्वाखाली याविषयी संशोधन करण्यात आले आहे. शहरी भागात घर घेताना आपण आरोग्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे यात म्हटले आहे.

वॉशिंग्टन : सख्खे शेजारी असले तर दैनंदिन जीवन सुसह्य होण्यास मदत होते. मात्र शेजारी हे चार हात दूरच असावेत, असे मत मॉंट्रियल संशोधन पथकाचे आहे. वादावादी, कटकटी टाळणे हा हेतू यामागे नाही, तर मुलांच्या निरोगी आरोग्यासाठी ही बाब आवश्‍यक असल्याचे या पथकाने केलेल्या अभ्यासात म्हटले आहे. 

"आयएनआरएस'च्या प्राध्यापिका ट्रेसी ए. बार्नेट यांच्या नेतृत्वाखाली याविषयी संशोधन करण्यात आले आहे. शहरी भागात घर घेताना आपण आरोग्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे यात म्हटले आहे. घराचा शेजार दूर म्हणजे चालत जाण्याच्या अंतरावर असला तर मुलांच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. चालल्यामुळे त्यांच्या कंबरेचा घेर सुयोग्य आकारात राहतो, तसेच स्थूलताही कमी होते. त्यांचे "बॉडी मास इंडेक्‍स' (बीएमआय) सुधारते, असे अहवालात नमूद केले आहे. 

शहरी भागातील घरांची आखणी ही मुलांमधील स्थूलतेला आमंत्रण देणारी ठरत आहे, असा निष्कर्ष यात मांडला असून, चालण्यास प्रवृत्त करणाऱ्या पायाभूत सुविधांची उभारणी केल्यास मुलांमधील स्थूलता घटण्यास मदत होऊ शकते, अशी सूचना अहवालात केली आहे. जेथे दाट वस्ती असते, तेथे पादचाऱ्यांना चालण्यासाठी सिग्नल व्यवस्था, मोठे पादचारी मार्ग व पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडण्यासाठीचे फलक अशा पादचाऱ्यांना अनुकूल सुविधा दिल्यास त्याचा फायदा होतो. अशा ठिकाणी मुलेही मोकळेपणाने बाहेर खेळू शकतात, सायकल चालवू शकतात. या हालचालींमुळे शरीरातील जादा ऊर्जा खर्च होते व मुलांचे शरीर बांधेसूद व काटक बनते, असे अनुमान या पथकाने काढले आहे. 

दोन वर्षे सर्वेक्षण 

चालण्याचा व्यायाम मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक असल्याच्या या संशोधनासाठी संशोधन पथकाने मॉंट्रियलमधील मुलांचे दोन वर्षे सर्वेक्षण केले. ज्यांच्या कुटुंबात स्थूलतेचा इतिहास आहे आणि अभ्यासाच्या कालावधीत जी कुटुंबे एकाच पत्त्यावर राहत होती, अशामधील मुलांची पाहणी यासाठी करण्यात आली. या माहितीचे पृथक्करण व तौलनिक अभ्यास करून अहवाल तयार करण्यात आला आहे. या संदर्भातील शोध निबंध "प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन' या मासिकामध्ये प्रसिद्ध झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Walking is Better for Health Motrial Research