...'गुंफू' मैत्रीच्या माळा

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

मोदी आणि ट्रम्प यांनी व्हाइट हाउसच्या पोर्टिकोमध्ये दोन वेळेस परस्परांची गळाभेट घेतली. पहिल्या भेटीतच मोदींनी ट्रम्प यांना आपलेसे केले. मोदींनी यापूर्वी तीन वेळा ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला होता, त्यामुळे त्यांच्या भेटीस औपचारिकतेची झालर नव्हती.
- एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव

मोदी- ट्रम्प यांची परस्परांवर स्तुतिसुमने; ट्रम्प यांना भारत भेटीचे आमंत्रण

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा बऱ्याच अंशी यशस्वी ठरल्याचा दावा केला जात आहे, अमेरिकेचे काहीसे हेकेखोर आणि लहरी अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे डोनाल्ड ट्रम्प मोदींच्या भेटीने आनंदित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उभय नेत्यांनी संधी मिळताच परस्परांचे कौतुक तर केलेच; पण त्याचबरोबर अनेकदा गळाभेटही घेतली. मोदींनी दिलेल्या भारतभेटीच्या निमंत्रणाचाही ट्रम्प दाम्पत्याने आनंदाने स्वीकार केला.

भारताचा "खरा मित्र' असा उल्लेख करणाऱ्या ट्रम्प यांनी उभय देशांतील मैत्रीसंबंध हे नैतिक मूल्ये, लोकशाहीप्रतीच्या प्रतिबद्धतेवर आधारित असल्याचे सांगितले. माझ्या प्रचारादरम्यान मी निवडून आलो तर भारत हाच अमेरिकेचा खरा मित्र असेल असे सांगितले होते आणि आज आपल्यासोबत खरा मित्र असल्याचे ट्रम्प यांनी "रोझ गार्डन'मध्ये बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदींना सॅल्यूट करताना मी काहीसा भारावून गेलो आहे. मोदी आणि भारतीय जनतेने एकत्रितपणे प्राप्त केलेली ध्येये मोठी आहेत, असेही ट्रम्प यांनी नमूद केले.

या वेळी आपल्या नेहमीच्या मिठास शैलीत ट्रम्प यांची स्तुती केली. मोदी म्हणाले ""आपल्या नेतृत्वाखाली उभय देशांतील भागीदारी नव्या उंचीवर पोचेल याची मला खात्री आहे. उद्योगजगतामधील आपला मोठा आणि यशस्वी अनुभव द्विपक्षीय संबंधांना पुढे नेईल. भारत अमेरिका संबंधांच्या उभारणीसाठी मी ट्रम्प यांच्या नेतृत्वाचे आभार मानेल.''

अपेक्षेपेक्षा जास्त चर्चा
मोदींनी व्हाइट हाउसच्या साउथ पोर्टिकोमध्ये फर्स्ट लेडी मेलानिया यांच्याशीही संवाद साधला. मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची या वेळी 40 मिनिटे चर्चा झाली. पूर्वनिर्धारित वेळेपेक्षा ती 20 मिनिटे अधिक होती. शिष्टमंडळस्तरीय चर्चाही एक तास जास्त चालली. या वेळी सर्व माध्यमांचे लक्ष हे मोदी आणि ट्रम्प यांच्या देहबोलीकडे होते. ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांची भेट घेतली तेव्हा 90 सेकंद हस्तांदोलन केले होते, तर जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्याशी हस्तांदोलन करण्यास त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला होता.

भारताचे मानले आभार
अफगाणिस्तानात भारताने विविध विकास प्रकल्प राबविल्याबद्दल ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले. अफगाणिस्तानातील स्थैर्य हे दोन्ही देशांसाठी चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी नमूद केले. उत्तर कोरियावर निर्बंध लादताना भारताने घेतलेली भूमिका स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, अमेरिकेने सय्यद सलाहुद्दीनला जागतिक दहहशतवादी घोषित केल्याने त्यांच्या हालचालींना पायबंद घातला जाणार असून, त्यांच्या संघटनेच्या आर्थिक नाड्याही आवळल्या जातील, असे गृहसचिव राजीव महर्षी यांनी म्हटले आहे.

मोदींनी घेतला डिनरचा आस्वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यानिमित्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथमच कुण्या परदेशी पाहुण्यासाठी शाही डिनरचे आयोजन केले होते. या डिनरला फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प, उपाध्यक्ष माईक पेन्सी यांच्यासमवेत ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अन्य सहकारी उपस्थित होते. फर्स्ट लेडी मेलानिया यांनी आयोजित केलेला स्वागत समारंभ आटोपून परतलेल्या पाहुण्यांसाठी व्हाईट हाऊसच्या "ब्लू रूम'मध्ये खास मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. मोदींनी यावेळी ट्रम्प यांच्याशी चर्चा करत भोजनाचा आस्वाद घेतला. यानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधानांना व्हाईट हाऊसची सफर घडवली. लिंकन यांची बेडरूम, त्यांचा प्रसिद्ध गेट्टीसबर्ग येथील पत्ता आणि ज्या डेस्कर लिंकन यांनी लिखाण केले तो डेस्कही ट्रम्प यांनी मोदींना दाखविला.

Web Title: washington news donald trump and narendra modi friendship