'इसिस' ठरली जगातील सर्वांत धोकादायक संघटना

'इसिस' ठरली जगातील सर्वांत धोकादायक संघटना

अमेरिकेतील मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालातील नोंद; गेल्या वर्षी सर्वाधिक दहशतवादी हल्ले

वॉशिंग्टन: "इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) या दहशतवादी संघटनेचा इराक व सीरियातून बीमोड झाला असला तरी जगातील सर्वांत धोकादायक संघटना म्हणून गेल्या वर्षापर्यंत तिची ओळख होती. मेरिलॅंड विद्यापीठाच्या अहवालामध्ये याची नोंद करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

विद्यापीठाने जागतिक दहशतवादासंबंधीच्या संकलित केलेल्या माहितीनुसार "इसिस' किंवा "इस्लामिक स्टेट'ने (आयएस) गेल्या वर्षी चौदाशे हल्ले केले. त्यात सात हजार नागरिकांचा बळी गेला. 2015च्या दहशतवादी कारवायांपेक्षा गेल्या वर्षीच्या हल्ल्यांमध्ये 20 टक्‍क्‍याने वाढ झाली आहे. जगाचा विचार करता 2016 मध्ये दहशतवादी हल्ले आणि त्यातील मृत्यूचे प्रमाण दहा टक्‍क्‍याने वाढले होते. स्पेनमधील बार्सिलोनामध्ये गेल्या आठवड्यात लास रामब्लास येथे वर्दळीच्या ठिकाणी व्हॅन घुसवून हल्ला केल्याचा दावा "इसिस'ने केला आहे. या हल्ल्यात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच रशियात सुरीच्या साह्याने केलेल्या हल्ल्यात आठ जण जखमी झाले. या हल्ल्यांची जबाबदारी "इसिस'ने घेतली असली तरी त्याबद्दल शंका व्यक्त होत आहे. मात्र "इसिस'ने इराक व सीरियात ज्या प्रकारे हल्ले केले होते, त्याच्याशी या नव्या हल्ल्यांचे साधर्म्य असल्याचे अमेरिकेच्या दहशतवादविरोधी पथकातील ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या संघटनेने इराक व सीरियाचा ताबा घेऊन 2014 मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. एखाद्या व्यक्तीचा व गटाचा वापर करून कोणत्याही पद्धतीने ते आत्मघाती हल्ले करतात. "इसिस'शिवाय इराक आणि सीरियात गेल्या वर्षी अन्य दहशतवादी संघटनांनी केलेल्या हल्ल्यांची संख्या 950 होती. यात तीन हजार नागरिक ठार झाले.

बांगलादेश, येमेन, लीबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि फिलिपाईन्समध्ये "इसिस'च्या नेतृत्वाखाली अन्य दहशतवादी गट कार्यरत असून त्यांनी 2016 मध्ये सर्वाधिक हल्ले केले असून, त्यातील बळींची संख्याही पूर्वीपेक्षा मोठी होती, असे अहवालात म्हटले आहे. "इसिस'च्या छायेखाली येण्या आधीपासून हे गट विध्वंसक कारवाया करीत होते. "इसिस'ने त्यांचा कुशलतेने वापर केला, अशी माहिती अमेरिकेच्या गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली. गेल्या काही वर्षांत ओरलॅंडो, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया, लंडन, मॅंचेस्टर, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ज्या पद्धतीने हल्ले झाले तसे आत्मघातकी हल्ल्यांची संख्या वाढविण्याचा आदेश "इसिस'ने अन्य गटांना दिले होते. याच काळात वैयक्तिक हल्ल्यांमध्येही वाढ झाल्याचे दिसून आल्याचे या अहवालाचे लेखक एरिन मिलर यांनी सांगितले.
"इसिस'च्या विरोधात लढण्यासाठी सप्टेंबर 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर संयुक्त पथकाची स्थापना झाल्यानंतर या समितीत सहभागी झालेल्या राष्ट्रांवर मिळेल त्या शस्त्रांनिशी जास्तीत जास्त हल्ले करण्यास दहशतवादी गटांना प्रवृत्त करण्यात आले. जर विध्वंस घडवून आणण्यासाठी स्फोटके अथवा बंदुकीच्या गोळ्या उपलब्ध नसतील तर अमेरिका, फ्रान्स अथवा त्यांच्या मित्र राष्ट्रांतील नागरिक असला तरीही कोणाचीही मुलाहिजा न बाळगता त्याचे डोके दगडाने ठेचून किंवा त्याच्यावर चाकूने वार करून किंवा त्याच्या अंगावर गाडी घालून त्याला मारा, असा आदेश "इसिस'चा प्रवक्ता अबू मुहमद अल अदनानी यांनी 2014मध्ये दहशतवाद्यांना दिला होता. अमेरिकेने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात केलेल्या हवाई हल्ल्यांत अदनानी ठार झाला, असेही मिलर यांनी सांगितले.

दहशतवाद्यांचे मासिक
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त पथकाने दहशतवादी संघटनांना लक्ष्य करण्यास सुरवात केल्यानंतर जास्त हल्ले करण्याचे आवाहन "इसिस'च्या प्रसिद्धीपत्रकांमधून तसेच दहशतवाद्यांच्या सोशल मीडियावरील अकाउंटवरून करण्यात येऊ लागले, असे "एसआयटीई' गुप्तचर संघटनेचे संचालक रिटा कॅट्‌स यांनी सांगितले. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांवर लक्ष ठवण्याचे काम "एसआयटीई' करते. "इसिस'तर्फे गेल्या वर्षीपासून "रुमिया' हे मासिक प्रसिद्ध केले जाते. त्यात हल्ल्यांसंदर्भात संपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले जाते. अगदी एखाद्याला कसे भोसकायचे, वाहनांमधून हल्ला कसा करायचा याची माहिती यात असते. तसेच आर्थिक व धार्मिक क्षेत्राला कसे लक्ष्य करायचे हेही याविषयी टिप्स यात दिल्या जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com