दक्षिण चीन समुद्रापासून ते हिमालयापर्यंत आम्ही भारतासोबत खंबीरपणे उभे; अमेरिकेचा चीनला इशारा

कार्तिक पुजारी
Saturday, 18 July 2020

चीन जर भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करणार असेल तर दक्षिण चीन समुद्रापासून ते हिमालयापर्यंत आम्ही आमच्या मित्रासोबत खंबीरपणे उभे राहू, असा सज्जड इशारा अमेरिकेने दिला आहे

वॉशिंग्टन- अमेरिकेने चीनविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसत आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान झालेल्या रक्तरंजित संघर्षानंतर अमेरिकेने चीनवर टीका केली आहे, तर भारताचे समर्थन केले आहे. तसेच चीन जर भारताला त्रास देण्याचा प्रयत्न करणार असेल तर दक्षिण चीन समुद्रापासून ते हिमालयापर्यंत आम्ही आमच्या मित्रासोबत खंबीरपणे उभे राहू, असा सज्जड इशारा अमेरिकेने दिला आहे. कोणत्याही परिस्थिती आम्ही आमच्या मित्र राष्ट्रांसोबत राहू असंही अमेरिकेने म्हटलं आहे.

मोठी बातमी! आता भारताचं तेल साठवलं जाणार अमेरिकेत
संपूर्ण जग जेथे कोरोना  विषाणूविरोधात लढत आहे, तेव्हा चीन आपले पापी इरादे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. चीनला वाटते की आपण जे काही करत आहोत, ते योग्य आहे. अशात दक्षिण चीन समुद्राच्या मुद्द्याचा प्रभाव आर्कटिक, हिंदी महासागर, भूमध्य सागर यासह अनेक जलमार्गांवर पडत आहे, असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पियो म्हणाले आहेत. अमेरिका चीनविरोधात कडक पाऊलं उचलत आहे. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हाँगकाँग स्वायत्तता कायद्यावर हस्ताक्षर केले आहेत. हा कायदा हाँगकाँगच्या नागरिकांवर अत्याचार करणारा असल्याचं अमिरेकेने म्हटलं आहे.

आपण पाहत आहोत की हाँगकाँगमध्ये काय होत आहे. त्यांची स्वातंत्र्यता काढून घेण्यात आली आहे, जेणेकरुन तो मुक्त बाजारपेढेशी स्पर्धा करु नये. त्यामुळे मला वाटते की आता खूप लोक हाँगकाँग सोडतील. आम्ही एका चांगल्या स्पर्धकाला गमावलं आहे. आम्ही हाँगकाँगसाठी खूप काही केलं होतं. मात्र, आता हाँगकाँगला विशेष वागणूक दिली जाणार नाही. हाँगकाँगलाही चीनसारखंच समजलं जाईल. चीनने आमचा फायदा उठवला आणि आम्हाला बदल्यात चिनी विषाणू दिला. यामुळे आम्हाला खूप मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील कोरोना चाचणीला सुरुवात; 15 हजार जणांना लसही टोचली
चीन विकसनशील देशाच्या नावावर मोठा फायदा घेत आला आहे. पण आता तसं होणार नाही. चीनला यापुढे गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापार युद्ध सुरु झाले आहे. अमेरिकेने चीनमधील आपल्या अनेक कंपन्यांना परत येण्यास सांगितले आहे. शिवाय डोनाल्ड ट्रम्प चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना अमेरिकेत येण्यास बंदी घालण्याचा विचार करत असल्याचं कळत आहे. त्यामुळे दोन महासत्तांमधील संबंध स्फोटक बनत असल्याचं दिसत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we stand with india firmly said america