esakal | 'आम्ही हार मानणार नाही', पंजशीर खोऱ्यातून अहमद मसूदची गर्जना
sakal

बोलून बातमी शोधा

अहमद मसूद

'आम्ही हार मानणार नाही', पंजशीर खोऱ्यातून अहमद मसूदची गर्जना

sakal_logo
By
दीनानाथ परब

काबुल: पंजशीर (panjshir) जिंकल्याचा तालिबानचा (taliban) दावा नॅशनल रेसिस्टन्स फ्रंट ऑफ अफगाणिस्तानने (NRFA) फेटाळून लावला आहे. काल रात्रीपासून तालिबानने पंजशीरमध्ये विजय मिळवल्याच्या बातम्या येत आहेत. तालिबानने या आंनदात रात्री काबुलमध्ये हवेत गोळीबारही केला. पण आता रेसिस्टन्स फ्रंटचा नेता अहमद मसूदने (Ahmad Massoud) समोर येऊन तालिबानचा विजयाचा दावा खोडून काढला आहे. पाकिस्तानी मीडियामध्ये पंजशीर तालिबानने जिंकल्याच्या बातम्या येत आहेत. पण हे खोटं आहे. आम्ही हार मानणार नाही, असे अहमद मसूद म्हणाला.

अहमद मसूद पंजशीरचे दिवंगत नेते अहमद शाह मसूद यांचा मुलगा आहे. पंजशीरमध्ये अहमद शाह मसूद यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाच्या नेतृत्वाखालीच तालिबान विरोधात ही लढाई सुरु आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्लाह सालेह सुद्धा पंजशीर खोऱ्यामध्येच तळ ठोकून आहेत. ते आणि अहमद मसूद मिळून ही लढाई लढत आहेत. अमरुल्लाह सालेह देश सोडून पळाल्याचे वृत्त आले होते. पण आपण इथेच असून कमांडर्ससोबत बैठक करत असल्याचं सालेह यांनी सांगितलं.

हेही वाचा: जल्लोषात तालिबानचा हवेत गोळीबार, लहान मुलांसह अनेकजण ठार

आम्ही आमची लढाई सोडणार नाही, असं अहमद मसूदने सांगितलय. "आम्ही थकणार नाही आणि हारही मानणार नाही. कुठल्याही धोक्याला आम्ही घाबरत नाही" असे नॅशनल रेसिस्टन्स फोर्सचा कमांडर अहमद मसूद म्हणाला. पंजशीर वगळता अफगाणिस्तानातील सर्व प्रांत तालिबानने आपल्या ताब्यात घेतले आहेत. पंजशीर खोऱ्यात तालिबान विरोधक एकवटले आहेत. सुरुवातीपासूनच इथे घनघोर लढाईची शक्यता वर्तवण्यात येत होती. आता सुरु असलेल्या लढाईमध्ये दोन्ही बाजूला मनुष्यहानी होत आहे.

loading image
go to top