Video: म्यानमारमध्ये काय घडतंय आणि का?

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 8 February 2021

लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला बाजूला सारत म्यानमारमधील लष्कराने सत्तापालट केलाय

लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला बाजूला सारत म्यानमारमधील लष्कराने सत्तापालट केलाय. अनेक वर्षांपासून लष्कराच्या राजवटीखाली असणाऱ्या म्यानमारमध्ये 2015 साली निवडणुका झाल्या. त्यामुळे देशात लोकशाही नांदेल अशी आशा निर्माण झाली होती. पण, देश पुन्हा एकदा लष्कराच्या राजवटीखाली गेलाय. याच पार्श्वभूमीवर म्यानमारमध्ये सध्या काय घडतंय आणि कशामुळे घडतंय के आपण पाहुया...

म्यानमार हा देश बुर्मा नावानेही ओळखला जातो. दक्षिण अशियामध्ये असलेल्या या देशाचे थायलँड, लाओस, बांगलादेश, चायना आणि भारत हे शेजारी राष्ट्रे आहेत. म्यानमारची लोकसंख्या साडेपाच कोटी असून मुख्यत्वे येथील लोक बुर्मी भाषा बोलतात. देशाची राजधानी नाय पाय ताव असली तरी सर्वात मोठे शहर यानगोन आहे. येथील मोठी संख्या बौद्ध धर्माला मानणारी आहे. म्यानमारला 1948 मध्ये म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षांनी ब्रिटेनकडून स्वातंत्र्य मिळाले. पण, देशात 1962 ते 2011 पर्यंत लष्कराचीच सत्ता होती. म्यानमारला अनेक शतकांपासून बुर्मा म्हणूनच ओळखलं जातं, कारण येथे याच वंशाचे प्रभुत्व राहिलंय. पण, 1989 मध्ये सत्ताधारी लष्कराने देशाचे नाव म्यानमार असं केलं. 

म्यानमारमध्ये आंदोलन अधिक तीव्र; स्यू की यांना सोडण्याची मागणी

देशात सध्या काय आणि का घडतंय ?

लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हाती घेतली असून एकावर्षासाठी आणीबाणी जाहीर केलीये. नोव्हेंबरमध्ये झालेल्या सर्वसाधारण निवडणुकीत आंग सांग स्यू की यांच्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रॅसी (NLD) पक्षाने दणदणीत विजय प्राप्त केला होता. पण, विरोधी पक्षांनी निवडणुकीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला आणि विरोध करणाऱ्या पक्षाला लष्कराने पाठिंबा दिला. निवडणूक आयोगाने मात्र निवडणुकीत कसलाही गैरप्रकार झाला नसल्याचे स्पष्ट केलं होतं. तरीही लष्कराने लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या स्यू की यांच्या पक्षाला विरोध करत सत्ता हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. संसदेचे नवीन सत्र सुरु होण्याआधीच स्यू की आणि एनएलडीच्या महत्त्वाच्या नेत्यांना लष्कराने ताब्यात घेतलंय. शिवाय त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल केलेत. 
 

सध्या कोणाकडे आहे सत्ता?

म्यानमारची सत्ता लष्कर प्रमख मीन आंग ह्लांईंग यांच्याकडे गेलीये. देश लोकशाहीकडे वळाला तरी लष्कर प्रमुखांनी आपला सत्तेवरील प्रभाव कायम ठेवला होता. म्यानमारच्या संसदेत लष्करासाठी 25 टक्के जागा राबीव असतात. तसेच महत्वाचे मंत्रीपदं लष्कराच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे देशाची लोकशाहीकडे वाटचाल होत असली तरी लष्कराचे वर्चस्व कायम राहिले होते. आता तर लष्कराने पूर्ण सत्ताच आपल्या हाती घेतलीये. 1 वर्षानंतर आणीबाणी उठवल्यावर देशात निष्पक्ष निवडणुका घेण्यात येतील, असा दावा लष्कराने केलाय. 

आंग सांग स्यू की कोण आहेत?

देशात लोकशाही नांदावी यासाठी आंग सांग स्यू की यांनी 1990 साली आंदोलन छेडलं होतं. त्यानंतर त्या जगप्रसिद्ध झाल्या. 1991 साली त्यांना नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा झाली. स्यू की यांनी 1989 ते 2010 हा काळ नजरकैदत घालवलाय. 2015 मध्ये पहिल्यांदाच देशात निवडणुका झाल्या, त्यात त्यांच्या एनएलडी पक्षाने मोठा विजय प्राप्त केला. रोहिंग्या मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारादरम्यान स्यू की यांनी मौन बाळगलं होतं. त्यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय प्रतिमा खालावलीये. 2017 मध्ये हजारो रोहिंग्याची हत्या झाली, जवळपास 7 लाख रोहिंग्यांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्याला लागला. पण, स्यू की यांनी यासाठी लष्कर जबाबदार नसल्याचं म्हटलं होतं. 

पोपनी परंपरेला दिला छेद; प्रमुख चर्चमध्ये पहिल्यांदाच महत्त्वाच्या पदी महिलेची...

स्यू की यांच्या अटकेमुळे म्यानमारच्या जनतेमधून संतप्त प्रतिक्रिया उमटलीये. हजारो लोक रस्तावर उतरुन त्यांच्या अटकेचा निषेध करताहेत. तसेच लोकशाहीच्या नावाने घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे लष्कराने इंटरनेट सेवा बंद केलीये. तरीही लष्कराला देशातील आंदोलन चिरडता आलेले नाहीत. 2007 नंतर देशात पहिल्यांचं मोठं आंदोलन होतंय. अनेकांनी आंदोलनात आपला जीव गमावलाय.

म्यानमारमध्ये जवळपास पाच दशकांच्या लष्करी राजवटीनंतर २०१५ मध्ये लोकशाहीवादी सरकार स्थापन झाले होते. लष्करी राजवटीच्या काळात हा देश उर्वरित जगापासून वेगळा पडला होता. येथील नागरिकांचाही बाहेरच्या जगातील लोकांशी फारसा संपर्क नव्हता. २०१५ मध्ये स्यू की यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर लोकांना प्रभावी लोकशाहीची आशा निर्माण झाली होती. सध्याच्या लष्करी बंडानंतर पुन्हा एकदा हा देश मागे जाण्याचा धोका निर्माण झाला असल्यानेच जनतेने मोठी निदर्शने सुरु केली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what happening in Myanmar Aung San Suu Kyi min aung hlaing