ट्रम्प यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला तर बायडेन यांची भूमिका काय?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 November 2020

बायडेन विजयी झाले असताना ट्रम्प मात्र अजुनही पराभव स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थिती जर त्यांनी पद सोडण्यास आणि व्हाइट हाउसमधून बाहेर पडण्यास नकार दिला तर काय असा प्रश्न सर्वांसमोर आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निव़डणुकीत अखेर जो बायडेन यांनी बाजी मारली. जॉर्जिया आणि पेन्सिलवेनिया या राज्यात कमाल करत बायडेन यांनी सत्ता हस्तगत केली. एकीकडे बायडेन विजयी झाले असताना ट्रम्प मात्र अजुनही पराभव स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा परिस्थिती जर त्यांनी पद सोडण्यास आणि व्हाइट हाउसमधून बाहेर पडण्यास नकार दिला तर काय असा प्रश्न सर्वांसमोर आहे. अशी परिस्थिती उद्भवलीच तर ट्रम्प यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून व्हाइट हाऊसच्या बाहेर काढण्यात येईल असा इशारा जो बायडेन यांच्या टीमकडून दोन दिवसांपूर्वीच देण्यात आला आहे. 

डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी अखेरच्या टप्प्यात जॉर्जिया आणि पेन्सिल्वेनिया या राज्यांमध्ये विजय मिळवला. यासह ट्रम्प यांचे सलग दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याचं स्वप्न भंगलं आहे. दरम्यान, निकाल स्पष्ट झाल्यावरसुद्धा आपणच जिंकलो असल्याचा दावा ट्रम्प यांनी ट्विटरवरून केला आहे. मतमोजणीत गैरव्यवहाराचा आरोप याआधी सातत्याने त्यांनी केला असून अवैध मते मोजली नसती तर आपण सहज जिंकलो असतो असंही त्यांनी म्हटलं आहे. 

हे वाचा - बायडेन यांच्या विजयानंतर मोदींकडून शुभेच्छा; हॅरिस यांचेही अभिनंदन

बायडेन यांच्या प्रचार प्रवक्त्यांनी सांगितले की,'जसं की आम्ही 19 जुलैला म्हटलं होतं त्यानुसार अमेरिकेचे लोक निवडणुकीचा निर्णय घेतील आणि युएस सरकार अतिक्रमण कऱणाऱ्यांना व्हाइट हाउसमधून बाहेर काढण्यासाठी सक्षम आहे.' फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी पराभव झाल्यास तो स्वीकारणार नाही आणि सत्तेच हस्तांतरण कऱणार नाही असं म्हटलं होतं. 

निकाल स्पष्ट होण्याआधी ट्रम्प यांनी ट्विट कलं होतं. मात्र जो बायडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. ट्रम्प यांचे पुढच्या आठवड्याभरातले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे किमान आठवडाभर तरी ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसणार नाहीत. त्यात आता निकाल अधिकृतपणे जाहीर केल्यानंतर ट्रम्प काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: what-if-donald-trump-refuses-leave-white-house