
भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत असलेली कोरोना व्हॅक्सिन कोविशील्डचा वापर आता जगभरात होणार आहे.
जिनिव्हा - भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया तयार करत असलेली कोरोना व्हॅक्सिन कोविशील्डचा वापर आता जगभरात होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्सफर्ड आणि एस्ट्राझेनकाने तयार केलेल्या दोन व्हॅक्सिनच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटच्या व्हॅक्सिनशिवाय दक्षिण कोरियाच्या एस्ट्राझेनका एसकेबायो या व्हॅक्सिनचा समावेश आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी सांगितलं की, ऑक्सफर्ड एस्ट्राझेनकाच्या व्हॅक्सिनच्या दोन लशींना आपत्कालीन वापराला मंजुरी देण्यात आली आहे. जगभरात कोव्हॅक्स अंतर्गत लसीकरण मोहिम राबवता येईल यासाठी ही मंजुरी दिली आहे. आपल्याला अजून व्हॅक्सिनच्या उत्पादनाचा वेग वाढवायला हवा असं WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानॉम यांनी म्हटलं आहे.
व्हॅक्सिनला मंजुरी देण्याआधी एक दिवस युएनच्या आरोग्य एजन्सीच्या पॅनेलनं व्हॅक्सिनबाबत शिफारस केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, सर्व वयोवृद्धांना 8 ते 12 आठवड्यांच्या अंतराने व्हॅक्सिनचे दोन डोस दिले पाहिजेत.
हे वाचा - चीनचा हेका कायम; WHO च्या टीमला सुरवातीच्या रुग्णांची माहिती देण्यास दिला नकार
जागतिक आरोग्य संघटनेनं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फायजरच्या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. ऑक्सफर्ड एस्ट्राझेनकाची कोरोना लस ही फायजरच्या लशीपेक्षा स्वस्त आहे.
WHO ने म्हटलं होतं की, ऑक्सफर्ड एस्ट्राझेनकाच्या दोन लशींना मंजुरी दिल्यानंतर जगभरातील एनेक देशांमध्ये कोव्हॅक्स मोहिम राबवण्याचं काम वेगाने होईल. यानंतर जगातील ज्या देशांना अजून व्हॅक्सिन मिळालेली नाही तिथं लसीकरणाला सुरुवात होईल. कोव्हॅक्स मोहिमेंतर्गत जागतिक आरोग्य संघटना जगभरातील गरीब देशांमध्ये कोरोना लस पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
हे वाचा - Corona : नवी रुग्णसंख्या 10 हजारच्या आत; गेल्या 24 तासांत 81 रुग्णांचा मृत्यू
भारतात डीसीजीआयने गेल्या महिन्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला देशात आपत्कालीन वापराला मंजुरी दिली होती. यानंतर सरकारने 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती. देशात 13 फेब्रुवारीपर्यंत 80 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यानंतर आता लसीचा दुसरा डोसही देण्यास सुरुवात झाली आहे.