हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अन् HIV च्या औषधासंदर्भात WHO चं मोठं विधान

टीम ई-सकाळ
रविवार, 5 जुलै 2020

कोरोना विषाणूसंदर्भातील अन्य संशोधन कार्यात या निर्णयामुळे कोणताही अडथळा येणार नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

जिनेव्हा : जगभरात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी जगभरातल्या वेगवेगळ्या देशात हायड्रोक्सीक्लोरोक्वीन अन् HIV च्या औषधाचा प्रयोग करण्यात येत आहे. ही आषधे कोरोनावरील उपचामध्ये उपयुक्त ठरत असल्याचा दावा करण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची कोणतीही लक्षणं नसताना देखील खबरदारी म्हणून चक्क हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्या घेत असल्याचे म्हटले होते. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये या गोळ्या अधिक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे भारताचे महत्त्वही वाढल्याचे पाहायला मिळाले. याशिवाय एचआयव्हीवरील औषधही कोरोनाग्रस्तावर प्रभावी ठरु शकते, असे सांगण्यात आले. यासंदर्भात आता जागतिक आरोग्य संघटनेने मोठे विधान केले आहे. कोरोनाचा मृत्यू दर कमी करण्यामध्ये ही दोन्ही ओषधे उपयुक्त ठरत नसल्याचे निदर्शनास आले असून याच्या परीक्षणाला स्थगिती देत आहोत, अशी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेने घेतली आहे.   

कोरोना विषाणूच्या साथीबाबत सर्वप्रथम सावधानतेचा इशारा चीनने नव्हे तर...

जगभरात वेगाने समोर येणाऱ्या केसेस धक्कादायक आहेत. कोरोनामधून बरे होणाऱ्यांच्या आकडेवारीनुसार हायड्रोक्सीक्लोरोक्वीन आणि लोपिनवीर/ रटनवीर यांच्या अंतरिम परीक्षणावरुन असे लक्षात येते की, कोरोनाच्या मृत्यू दर कमी करण्यामध्ये ही ओषधे उपयुक्त ठरलेली नाही. त्यामुळे या औषधांच्या परीक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय संचालन समितीच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आला असून कोरोना विषाणूसंदर्भातील अन्य संशोधन कार्यात या निर्णयामुळे कोणताही अडथळा येणार नाही, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 

कोरोना काळामध्ये सर्वच देशांनी आता शस्त्रसंधीचे पालन करावे

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूने जन जीवन विस्कळीत झाले आहे. अमेरिकेला या विषाणूने मोठा फटका दिलाय. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीत जगभरात दोन लाखाहून अधिक कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने जागतिक आरोग्य संघटनेला मोठा धक्का बसला होता. जगभरातील 2 लाख 12 हजार 326 पैकी 53 हजारहून अधिक कोरोनाग्रस्त एकट्या अमेरिकेत आढळले होते. अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझीलचा क्रमांक लागतो. दिवसागणिक येथील आकडेवारीही वाढत आहे. भारतामध्येही कोरोना विषाणूने दहशत निर्माण केली असून देशातील आकडाही दिवसागणिक वाढताना दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO halts trial of hydroxychloroquine and HIV drug says failed to reduce COVID patients mortality