WHO म्हणते,'कोरोना व्हॅक्सिनच्या भरोशावर बसू नका, स्वत:ची व्यवस्था बघा'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

जागतिक आरोग्य संघटनेनं व्हॅक्सिनच्या भरोशावर बसू नका असं सांगत स्वत:च व्यवस्था करा असं म्हटलं आहे. 

जिनिव्हा - कोरोना व्हॅक्सिनचं डील करण्यासाठी भारत सरकार सक्रीय झालं आहे. देशात सध्या तीन व्हॅक्सिनच्या ट्रायल सुरू आहेत. याशिवाय आणखी दोन कंपन्या यावर काम करत आहेत. त्यांनी तीन दिवसांच्या आत पुढचं नियोजन काय आहे याबाबत माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. जर त्यांच्या व्हॅक्सिनला मंजुरी मिळाली तर किती वेळेत आणि किंमतीत व्हॅक्सिन तयार होऊ शकेल या माहितीचा यामध्ये समावेश असणार आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियनसह भारताने आतापर्यंत कोणत्याच कंपनीसोबत करार केलेला नाही. मात्र व्हॅक्सिन मिळवण्या दृष्टीने भारताचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं व्हॅक्सिनच्या भरोशावर बसू नका असं सांगत स्वत:च व्यवस्था करा असं म्हटलं आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं की, कोरोना व्हायरसवर लशीची वाट बघत बसू नये. देशांमध्ये पसरत असलेल्या कोरोनाविरुद्ध तुमची व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवं. व्हॅक्सिनवर अवलंबून राहू नये कारण सुरुवातीला मागणीच्या तुलनेत पुरवठा करता येणं शक्य नाही. सर्वांनी कोरोना विरुद्ध आपला लढा सक्षम केला पाहिजे. केवळ व्हॅक्सिनच्या आशेवर राहून चालणार नाही. 

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं की, तज्ज्ञांचा गट सध्या लशीची निर्मिती, किंमत आणि वितरण यावर चर्चा करत आहे. एकीकडे वैज्ञानिक कोरोनावर व्हॅक्सिन तयार करण्यासाठी काम करत आहेत तर दुसरीकडं लोकांना वेळेवर व्हॅक्सिन मिळावं यासाठी देश प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांची व्हॅक्सिन निर्मात्यांसोबत चर्चा सुरू असून यामध्ये निर्मिती, किंमत आणि त्यानंतर लस प्रत्यक्ष वितरीत करण्याबाबत चर्चा सुरू आहे. 

हे वाचा - कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू आढळला; दहा पटीने अधिक हानीकारक

मॉस्कोमध्ये भारतीय दूतावास रशियन आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार, गामलेया रिसर्च इन्स्टिट्यूटसोबत भारताच्या दूतावासाचे अधिकारी चर्चा करत आहेत. स्पुटनिक व्ही व्हॅक्सिन याच इन्स्टिट्यूटने तयार केली आहे. गेल्या आठवड्यात या व्हॅक्सिनच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. भारतीय दूतावासाचे अधिकारी या व्हॅक्सिनची सुरक्षा आणि त्याचा प्रभाव याच्या माहितीची प्रतिक्षा करत आहेत. अनेक राष्ट्रांनी या व्हॅक्सिनवर शंका उपस्थित केली असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मात्र व्हॅक्सिन सुरक्षित असल्याचा दावा केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आठवड्यापासून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी - अस्राजेनेका यांनी तयार केलेल्या व्हॅक्सिनची ट्रायल सुरु करणार आहे. कोविशिल्ड नावाच्या या व्हॅक्सिनसाठी सीरम आणि अस्राजेनेका यांच्यात करार झाला आहे. देशातील 10 सेंटरवर व्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या होणार आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WHO says not just hope for the vaccine