दीड वर्षापूर्वी समुद्रात वाहून गेलेली महिला सापडली जिवंत

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

निइनिंग सनर्सह (52) असे या महिलेचे नाव असून, बुडाल्यानंतर अनेक दिवस तिच्यासाठी शोधमोहिम सुरु होती. त्या वाहून गेल्यावर एक आठवड्याने पोलिसांना या समुद्रकिनाऱ्यावर एक मुतदेह सापडला होता. निइनिंग यांच्या परिवाराला या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले होते.

जावा : इंडोनोशियातील सुकाबूमी समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी गेलेली एक महिला समुद्राच्या लाटेबरोबर वाहून गेली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहून गेल्यानंतर बचावासाठी तिला हातपाय मारताना उपस्थितांनी बघितले होते. परंतु, समुद्राचा जोर बघता कोणीही तिच्या मदतीसाठी गेले नसल्याने ती महिला बुडाली. या घटनेला दीड वर्ष उलटल्यानंतर आता त्याच समुद्रकिनाऱ्यावर ही महिला बेशुद्धावस्थेत जिवंत सापडली आहे. विशेष म्हणजे ती बुडाली त्या दिवशी जे कपडे तिच्या अंगावर होते. त्याच कपड्यांमध्ये ती सापडली. 

निइनिंग सनर्सह (52) असे या महिलेचे नाव असून, बुडाल्यानंतर अनेक दिवस तिच्यासाठी शोधमोहिम सुरु होती. त्या वाहून गेल्यावर एक आठवड्याने पोलिसांना या समुद्रकिनाऱ्यावर एक मुतदेह सापडला होता. निइनिंग यांच्या परिवाराला या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी हा मृतदेह त्यांचा नसल्याचे सनर्सह कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते. खात्री करुन घेण्यासाठी पोलिसांनी त्या मृतदेहाची डीएनए चाचणी देखील करुन घेतली होती. त्यानंतर हा मृतदेह निइनिंग सनर्सह यांचा नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे निइनिंग सनर्सह जिवतं असून, त्या एक दिवस नक्की परत येतील असा विश्वास त्यांच्या कुटुंबियांना वाटत होता. अनेक दिवस त्यांचा शोध न लागल्याने पोलिसांनी त्यांना मृत घोषित केले होते. 

निइनिंग यांच्या काकंच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी निइनिंग सनर्सह या त्यांच्या स्वप्नात आल्या. आणि त्यांनी आपण बुडालो त्या जागेपासून जवळच असल्याचा इशारा दिला होता. परंतु, स्वप्न असल्याने त्यांनी याकडे दूर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा पुन्हा तसेच घडू लागल्याने त्यांनी ही माहिती कुटुंबियांना दिली, आणि त्याच्या शोधासाठी सगळे समुद्रकिनाऱ्यावर गेले. दोन दिवस सतत शोध घेतल्यानंतर त्या वाळूत सापडल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.

 इंडोनोशियातील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, निइनिंग यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. लवकरच त्या बऱ्या होतील असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A woman who was driven by the sea was found alive