esakal | भारतामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती; जागतिक बँकेकडून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

world bank

जागतिक अर्थव्यवस्थेला सध्या वेग येत असून अमेरिका, चीन आणि भारतातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने हा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी आज सांगितले.

भारतामुळे जागतिक अर्थव्यवस्थेच्या चक्राला गती; जागतिक बँकेकडून कौतुक

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

वॉशिंग्टन- जागतिक अर्थव्यवस्थेला सध्या वेग येत असून अमेरिका, चीन आणि भारतातील अर्थव्यवस्था बळकट होत असल्याने हा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे, असे जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी आज सांगितले. अर्थव्यवस्था सुधारत असली तरी कोरोना संसर्गामुळे आर्थिक दरी निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या संयुक्त बैठकीनंतर मालपास यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले,‘‘कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील आर्थिक स्थिती सुधारत आहे. अमेरिका, चीन आणि भारताने अर्थव्यवस्थेला वेग आणल्याने हा परिणाम दिसून येत आहे. ही चांगली बातमी असली तरी जगात असमानताही वाढत आहे. लस वाटप, लसीकरण, उत्पन्नाची संधी याबाबतीत असमानता दिसून येत आहे. गरीब देशांमध्ये अद्यापही कर्जदर प्रचंड असून जगात इतरत्र हे दर कमी झाले असले तरी गरीब देशांमध्ये परिस्थिती बिकट आहे.’’ या बैठकीत लसीकरणाबरोबरच पर्यावरण बदल, कर्ज आणि कर्जाची वसुली या मुद्द्यांवर चर्चा झाली. कर्ज मिळतानाही अधिकाधिक कर्ज मोठ्या उद्योगांनाच मिळत असल्याचे मालपास यांनी निदर्शनास आणून दिले. छोटे उद्योगपती, दुकानदार, महिला यांना कर्ज मिळविताना अनेक अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.

युरोपात लसीकरणाचा वेग काळजी करण्याइतपत धिमा आहे. लसीकरण मोहिम राबविताना अनेक देशांना अडचणी येत आहेत. मात्र, या अडचणींवर मात करून लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्‍यक आहे. जागतिक पातळीवर संसर्गाची स्थिती सुधारण्यासाठी सर्वांचे लसीकरण होणे आवश्‍यक आहे, असं जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी म्हटलं आहे. 

अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीमुळे रक्तात गुठळ्या? ऑस्ट्रेलियानेही वापर थांबवला

दरम्यान, जवळपास एकावर्षापेक्षा अधिक काळापासून जगावर कोरोना महामारीचे संकट थैमान घालत आहे. याकाळात सर्व व्यवसाय, उद्योग उपक्रम ठप्प झाले. जगाभरातील अर्थव्यवस्थेची चाकं थांबली. याचे परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाले. कोरोना महामारीचे संकट टळले नसले, तरी आता हळूहळू जग यातून बाहेर येताना दिसत आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊनपेक्षा कठोर निर्बंध लादण्याला पसंती देण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर झालेले परिणाम भरुन निघण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. 

loading image