World Corona Update: रुग्णवाढीत ब्राझील आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Corona Update: रुग्णवाढीत ब्राझील आघाडीवर

World Corona Update: रुग्णवाढीत ब्राझील आघाडीवर

वॉशिंग्टन : जगभरात गेल्या चोवीस तासात ४ लाख ६८ हजार लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असताना यादरम्यान साडेतीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली. तसेच ८ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण ब्राझीलमध्ये आढळून आले असून भारत आणि इंडोनेशियात कोरोनाचे प्रकरणे वाढत चालले आहेत. ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात ५३ हजार ७४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर इंडोनेशियात ३८ हजार ३९१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. अमेरिकेत मात्र ही संख्या १९ हजारांच्या आसपास आहे. दुसरीकडे फायजरने आपल्या कोविड प्रतिबंधक लशीच्या तिसऱ्या डोससाठी अमेरिकी नियामक संस्थेकडून मंजुरी मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनीने म्हटले की, संशोधकांच्या मते, तिसरा डोस दिल्यानंतर अंटीबॉडी लवकर तयार होते. परंतु तिसरा डोस कधी आणि कसा द्यायचा याबाबत ठोस आराखडा तयार झालेला नाही.

ब्रिटनमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ३० हजार रुग्ण

ब्रिटनची स्थिती बिघडत चालली आहे. काल चोवीस तासात ३२,५५१ जणांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी देखील ३२ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे येत्या १९ जुलैपासून अनलॉक होण्याच्या घोषणेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेत ‘टिकर टेप परेड’

अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कोरोना योद्ध्याच्या सन्मानार्थ ‘टिकर टेप परेड’ करण्यात आली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्याचे आयोजन मॅनहटन येथे करण्यात आले. यादरम्यान लोकांनी आरोग्य, परिवहन, शिक्षण, अन्य आपत्ती व्यवस्थापन सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. हे संचलन लोअर मॅनहटनच्या बॅटरी पार्क येथून सुरू झाले होते. ही परेड तीन किलोमीटरपर्यंतचे अंतर कापून सिटी हॉलपर्यंत पोचली. ‘टिकर टेप परेड’मध्ये कागदाचे लहान तुकडे आकाशात फेकण्यात येतात. या परेडची १३४ वर्षांची परंपरा आहे.

टॅग्स :Worldbrazil