Corona Update: अमेरिकेने सर्व विक्रम मोडले, 24 तासांत आढळले तब्बल 2 लाखांहून अधिक रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आता 10 कोटी 55 लाख 9 हजार 184 इतकी झाली आहे. 

नवी दिल्ली- जगातील सर्वाधिक शक्तीशाली देश अमेरिकेत कोरोनामुळे हाहाकार माजला आहे. अमेरिकेत मागील 24 तासांत कोरोना विषाणूचे दोन लाखांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या आता 10 कोटी 55 लाख 9 हजार 184 इतकी झाली आहे. 

वेबसाइट वर्ल्डोमीटरनुसार, अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 2 लाख 45 हजार 799 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत यातून 66 लाख 1 हजार 331 जण बरे झाले आहेत. सध्या 37 लाख 12 हजार 54 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये 19 हजार 374 जणांची प्रकृती गंभीर आहे. 

हेही वाचा- Corona Updates: देशात 80 लाख कोरोनामुक्त; सक्रिय रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली

जगभरातील तज्ज्ञांनी याप्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका येणाऱ्या हिवाळ्यासाठी तयार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिका आतापर्यंतच्या सर्वात धोकादायक टप्प्यात जाण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले आहेत. 

'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, अमेरिकत आता सुट्ट्यांचा हंगाम सुरु होणार आहे. लोक कौटुंबिक सहलीवर जाण्याचे दिवस जवळ येत आहेत. त्यांच्याकडून कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन होणार नाही. त्यामुळे अमेरिका आता अत्यंत घातक अशा टप्प्यात जात आहे. 

हेही वाचा- Guinness Record: सहा वर्षांचा अरहम ठरला जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर प्रोग्रॅमर

दरम्यान, जगभरात कोरोनाने कहर केला असताना भारतातील स्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली गेली आहे. तब्बल 106 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 5 लाखांच्या खाली आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world coronavirus update us reports more than two lakhs new cases in last 24 hours