कोविड 19 संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली भीती

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 3 August 2020

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऐडनम यांनी कोरोना महामारीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे

जिनिव्हा- जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऐडनम यांनी कोरोना महामारीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. कोविड-19 पासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. पण, कोरोना विषाणूविरोधात 'रामबाण' उपाय मिळण्याची शक्यता कमी आहे, असं ते म्हणाले आहेत. टेड्रोस यांनी भारतातील स्थितीवरही भाष्य केलं आहे. भारतात कोरोना प्रादुर्भावाचा वेग खूप जास्त असून त्यांना खूप दिर्घकाळ चालणारी लढाई लढायची आहे, असं ते म्हणाले आहेत. 

वॅक्सिनच्या निर्मितीत भारताची भूमिका महत्वाची, व्हायरस एक्सपर्ट आणि ट्रम्प.

परिस्थिती सुधारण्यास वेळ लागेल

टेड्रोस ऐडनम सोमवारी आभासी परिषदेद्वारे संवाद साधत होते. ते म्हणाले की, कोरोनावर सध्या तरी रामबाण उपाय नाही आणि भविष्यातही असण्याची शक्यता नाही. शिवाय परिस्थिती सामान्य होण्यासाठी आणखी खूप वेळ लागू शकतो. 3 महिन्यापूर्वी आरोग्य संघटनेची आणीबाणी समितीची बैठक झाली होती. तेव्हापासून कोरोना प्रादुर्भाचा दर पाच पटीने वाढला आहे. आतापर्यंत 1.75 करोडपेक्षा अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 6.8 लाखांपेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 

टेड्रोस आणि जागतिक आरोग्य संघटनेचे आणीबाणी प्रमुख माईक रायन यांनी सर्व देशांना मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात धुणे आणि चाचण्या वाढवण्यासंदर्भात कठीण पाऊल उचलण्यास सांगितलं आहे. सर्व देशाच्या सरकारांना संदेश स्पष्ट आहे की, सर्व उपाय करा आणि करत रहा. मास्क वापरणे एक प्रतिक बनलं पाहिजे, असं टेड्रोस म्हणाले आहेत. 

मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

मोठी लढाई, जागरुकता आवश्यक

अनेक लस या मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यामुळे आम्ही आशा करतो की कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी या लस प्रभावी ठरतील. पण, सध्या तरी यावर कोणता प्रभावी उपाय नाही आणि पुढे कधी असेल याचीही शक्यता नाही, असं टेड्रोस ऐडनम म्हणाले आहेत. माईक रायन म्हणाले की, ब्राझिल आणि भारत या देशांमध्ये संसर्गाचा दर जास्त आहे. शिवाय त्यांना मोठ्या लढाईसाठी तयार रहावं लागणार आहे. कोरोना महामारीतून बाहेर येण्यासाठी अजून खूप कालावधी लागणार आहे. तसेच यासाठी सर्व देशांची वचनबद्धताही आवश्यक आहे.

दरम्यान, देशभरातील वैज्ञानिक कोरोनाच्या प्रसाराला रोखू शकेल अशी लस तयार करण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या 140 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनाविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करणारी लस शोधण्यात गुंतले आहे. सध्या 17 उमेदवार पहिल्या टप्प्यात आहेत, 13 उमेदवार मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. 5 उमेदवारांनी तिसऱ्या टप्प्यापर्यंत मजल मारली आहे. 

(edited by-kartik pujari)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Health Organization fears covid-19