कोविड-19 लस लवकरच मिळणार; WHOने दिली चांगली बातमी

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 6 October 2020

कोरोना विषाणूविरोधात प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, असा प्रश्न सर्वांना सतावू लागला आहे.

जिनिव्हा- कोरोना महामारी जगभरात थैमान घालत आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूविरोधात प्रभावी ठरणारी लस केव्हा येईल, असा प्रश्न सर्वांना सतावू लागला आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेकडून World Health Organization (WHO) मोठं वक्तव्य आलं आहे. कोरोनावरील लस या वर्षीच्या शेवटपर्यंत उपलब्ध होण्याची आशा आहे, असं सकारात्मक वक्तव्य WHO प्रमुख टेड्रोस घेब्रेयसेस यांनी केलं आहे. कोरोनासंबंधी झालेल्या मंगळवारच्या बैठकीत त्यांनी हे भाष्य केलं आहे. 

जगनमोहन रेड्डींनी घेतली PM मोदींची भेट, NDA मध्ये सहभागी होण्याची शक्यता

आपल्या सर्वांना कोरोना लशीची प्रतिक्षा आहे. या वर्षाच्या शेवटपर्यंत कोरोना लस मिळण्याची आशा आहे, असं टेड्रोस घेब्रेयसेस म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्याने 2020 च्या शेवटपर्यंत कोविड लस मिळेल अशी शक्यता वाटू लागली आहे. याआधी WHO ने कोरोना लस केव्हा येईल, याबाबत उत्तर देणे टाळले होते. शिवाय कोरोना लस उपलब्ध होण्यास आणखी एक वर्षाचा कालावधी लागेल, असं मध्यंतरी संघटनेकडून सांगण्यात आलं होतं. मात्र, आता WHO प्रमुखांच्या वक्तव्यामुळे लस तीन महिन्याच्या आत मिळण्याची आशा वाटू लागली आहे. WHO जागतिक संघटना असून जगभरातील कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. तसेच कोरोना लशीची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशीही WHO जवळीक साधून असते. त्यामुळे WHO च्या वक्तव्याला विशेष महत्व आहे. 

जगभरातील 100 पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेकडून देण्यात आली आहे. तसेच किमान 10 कोविड लस मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. यात अमेरिकीची मॉडर्ना, जॉनसन अँड जॉनसन, ब्रिटनची अॅस्ट्राझेनेका-ऑक्सफर्ड आणि चीनची सीनोवॅक्स कंपन्या किंवा लशीचे उमेदवार आघाडीवर आहेत. WHO ने काही कंपन्यांशी करार केला असून 2021 च्या शेवटापर्यंत 200 कोटी लस निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

खवय्यांसाठी खुशखबर! आता स्ट्रिट फूडही मिळणार ऑनलाईन  

दरम्यान, जगभरात कोरोना महामारीने हाहाकार माजवला असून एकूण बाधितांची संख्या 3.5 कोटींच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 10 लाखांहून अधिकांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. अमेरिका कोरोना महामारीने सर्वाधिक प्रभावित राष्ट्र ठरला आहे. त्यांनतर दुसरा क्रमांक भारताचा आहे. भारतात आतापर्यंतची कोरोना बाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 83 वर गेली आहे. तर सध्या 9 लाख 19 हजार 23 कोरोना रुग्ण उपचार घेत असून 1 लाख 3 हजार 569 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: World Health Organization said about corona vaccine Tedros Adhanom Ghebreyesus