इटलीतील "या' शहरात स्थायिक होण्यासाठी मिळतील लाखो रुपये 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे.

मोलिसे : परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल, तर तुमच्यासाठी संधी चालून आली आहे. इटलीतील मोलिसे या प्रांतात स्थायिक होण्यासाठी तेथील सरकार तुम्हाला तब्बल 19 लाख रुपये देणार आहे. जास्त वस्ती नसलेला हा सुंदर मात्र वन्य भाग मागील बऱ्याच वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे या भागाची संस्कृती टिकविण्यासाठी सरकार तेथे स्थायिक होणाऱ्या व्यक्तींना दरमहा 770 डॉलर असे तीन वर्षांसाठी सुमारे 27 हजार डॉलर देणार आहे.

मात्र, या वेळी स्थानिक अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी त्यांना एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याचे वचनदेखील सरकारला द्यावे लागणार आहे. पर्वतरांगांनी नटलेल्या हिरव्यागार मोलिसे प्रांताचे एका भकास शहरात रुपांतर होऊ नये यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत आहोत, असे मत मोलिसेचे नगरसेवक अँटोनियो टेडेची यांनी व्यक्त केले.

अँटोनियो हे मोलिसे प्रातांतील फिलिग्नोनो या 700 रहिवासी असलेल्या छोट्या गावात जन्माला आले होते. त्यामुळे जुन्या परंपरा आणि ऐतिहासिक ठिकाणांचा ऱ्हास होताना कसे वाटते हे मला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे मोलिसेचा असा ऱ्हास होऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे अँटोनियो यांनी सांगतले. 

मागील पाच वर्षांत मोलिसेची लोकसंख्या तब्बल नऊ हजारांनी कमी झाली आहे. त्यामुळे मोलिसेच्या प्रत्येक गावातील लोकसंख्या दोन हजारांच्या खाली आली आहे. यातील जास्त लोक हे शिक्षण आणि कामानिमित्त शहरी भागात स्थायिक झाले आहेत.

त्यामुळे मोलिसेची ओळख टिकून राहावी, यासाठी तेथील सरकार प्रयत्न करत आहेत. तसेच या वेळी स्थायिक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींमध्ये विवाहित आणि अपत्य असलेल्यांना अधिक प्राधान्य देणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you will get millions of rupees to settle in this cit in Italy