Hope of life! कर्करोग! उपचाराचा खर्च वार्षिक कमाईपेक्षा पाच पटीने अधिक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 December 2019

भारतातील कर्करोगाच्या 66 टक्के रुग्णांचे उपचार खासगी रुग्णालयात होतात. तेथे कर्करोगाच्या चाचण्यांपासून शस्रक्रिया आणि उपचारासाठी किमान सहा ते सात लाखापर्यंतचा सरासरी खर्च होतो.

मुंबई : कर्करोगासारखा आजार झाल्याचे कळताच अनेकांना सुरुवातीला धक्काच बसतो. त्यानंतर परिस्थितीला सामोरे जाताना रुग्ण आणि नातेवाईकांसमोर प्रश्‍न उभा राहतो तो उपचाराचा आणि खर्चाचा. सामान्यपणे भारतातील कर्करोगाच्या 66 टक्के रुग्णांचे उपचार खासगी रुग्णालयात होतात. तेथे कर्करोगाच्या चाचण्यांपासून शस्रक्रिया आणि उपचारासाठी किमान सहा ते सात लाखापर्यंतचा सरासरी खर्च होतो. भारतीय नागरिकांचे सरासरी कौटुंबिक उत्पन्न हे वार्षिक एक लाख 26 हजार रुपये आहे. त्यावरून असा निष्कर्ष काढता येईल की एका कुटुंबाला किमान पाच वर्षांचे उत्पन्न कर्करोगावरील उपचारासाठी खर्च करावे लागते. 

जाणून घ्या तुमच्या हेअर फॉलची कारणं आणि घरघुती उपाय

देशात कर्करोगावरील उपचारांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी कॉंग्रेसचे खासदार जयराम रमेश यांच्या अध्यक्षतेखाली राज्यसभेची स्थायी समिती नियुक्त करण्यात आली होती. त्या समितीने नोव्हेंबर महिन्यात आपला अहवाल सादर केला. या अहवालात कर्करोगावर होणाऱ्या उपचारांवरील खर्चावरही बोट ठेवले. सदर अहवालातील माहितीनुसार 66 टक्के रुग्णांचे उपचार हे खासगी रुग्णालयात होतात. या प्रकारच्या महागड्या उपचारांमुळे दरवर्षी सहा कोटी नागरिक दारिद्य्ररेषेखाली येत असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

महत्वाची बातमी - हिवाळ्यातील त्वचेशी काळजी

निदानासाठी एक लाखापर्यंतचा खर्च 
कर्करोगाचे निदान साधारणत: पेट स्कॅन, सिटीस्कॅन तसेच बायोप्सीने करता येते. खासगी रुग्णालयात सीटीस्कॅनचा खर्च 10 ते 15 हजार रुपयांच्या वर असतो. बायोप्सीचाही खर्च जवळपास त्याच प्रमाणात असतो. त्यामुळे निदानासाठी वरील सर्व चाचण्या कराव्या लागल्या तर हा खर्च एक लाखापर्यंतही जाऊ शकतो. 

पोटाचा घेर वाढलाय? या टिप्स तुम्हाला ठरतील फायदेशीर

औषधोपचार आणि आहारसुद्धा महागडा 
कर्करोगाच्या उपचारांमुळे रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. तसेच नियमित जेवण घेण्यासही रुग्णास त्रास होतो. अशा वेळी विविध औषधे तसेच आहारातही बदल करावा लागतो. त्यासाठी महिन्याला किमान 50 ते 60 हजार रुपये खर्च होतात. 

रुग्णांसह नातेवाईकांच्या राहण्याचा खर्च 
कर्करोगावरील बहुतांश रुग्णालये मोठ्या शहारांमध्ये आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला उपचारासाठी शहरी भागातच यावे लागते. त्यातही रुग्णासोबत किमान दोन नातेवाईक असतात. त्यामुळे त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा खर्च वाढतो. 
 

उपचार आणि शस्त्रक्रियेचा खर्च 

कर्करोगाचा प्रकार शस्त्रक्रिया केमोथेरपी, रेडिएशन
(एकवेळचा खर्च)
स्तन 5 ते 6 लाख 35 ते 40 हजार (3 ते 8 वेळा) 
मानेचा 4 ते 4.5 लाख 25 ते 30 हजार ( 3 ते 6 वेळा) 
गर्भाशयाचा 3 ते 3.5 लाख 15 ते 20 हजार (6 ते 8 वेळा) 
अन्ननलिका 4 ते 6 लाख 50 ते 55 हजार (6 वेळा)
पोट 4.5 ते 6 लाख  50 ते 55 हजार (6 वेळा) 
मोठे आतडे 4 ते 5 लाख 65 हजारापुढे (6 वेळा) 
अंडाशय 3 ते 5 लाख 30 ते 35 हजार (3 ते 6 वेळा) 
यकृत 6 ते 8 लाख 35 ते 40 हजार (3 ते 6 वेळा) 
स्वादुपिंड 6 ते 8 लाख 35 ते 40 हजार (3 ते 6 वेळा) 
पित्ताशय 6 ते 8 लाख 35 ते 40 हजार (3 ते 6 वेळा) 
     

(हा खर्च खासगी रुग्णालयातील आहे. डॉक्‍टर, रुग्णालयाचा दर्जा आणि इतर बाबींनुसार हा खर्च कमी-जास्त होतो) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hope of life! The cost of treatment is five times more than annual income