दुखापतीनंतर जिममध्ये मेहनत घेतोय हार्दिक पंड्या, पाहा व्हिडीओ

वृत्तसंस्था
Monday, 18 November 2019

हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली.आता तो तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे.एक खास फिटनेस ट्रेनर त्याला ट्रेनिंग देत आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातला उत्तम खेळाडू आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्याला काही दिवसांपूर्वी पाठीच्या खालच्या भागाला दुखापत झाली. त्याला सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले होते. संघापासून दूर तो सध्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, आता तो तंदुरुस्त होण्यासाठी प्रयत्न करत आहे.एक खास फिटनेस ट्रेनर त्याला ट्रेनिंग देत आहे. जिममध्ये मेहनत घेतानाचा त्याचा व्हिडीओ  सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. 

हार्दिक पंड्याला ट्रेन करणारी एक महिला ट्रेनर आहे. यासमिन कराचीवाला असं तिचं नाव आहे. क्रिकेटर ते बि-टाउनमधील मोठमोठ्या सेलिब्रिटींना यासमिन ट्रेनिंग देते. हार्दिकसोबत जिममध्ये ट्रेनिंग देणार व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. एका व्हिडीओमध्ये हार्दिक मेहनत घेताना दिसतोय मात्र दुखण्यामुळे त्याला अडचण येत आहे. तरीही त्याची स्ट्रिक्ट ट्रेनर यासमिन अधिक मेहनत घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन देताना दिसतेय. 

दुसऱ्या व्हिडीओमध्ये दुखण्यावर काहीशी मात करत त्याची स्थिती सुधारताना दिसत आहे. प्रॅक्टिस दरम्यानचे व्हिडीओ हार्दिकने ट्विटरवर शेअर केले आहेत. त्याच्या चाहत्यांनी कमेंटद्वारे हार्दिकला सपोर्ट करत लवकर बरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे संघातील सहखेळाडू क्रिकेटर जसप्रित बुमराहने एक मजेशीर कमेंट हार्दिच्या व्हिडीओवर केली आहे. त्या कमेंटमध्ये जसप्रित म्हणाला,'सरजी तुम्ही एखाद्या प्रेशर कुकरसारखे आवाज करत आहात.' 

त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे आता त्याला मोठ्या कालावधीसाठी क्रिकेटपासून लांब रहावे लागू शकते. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात हार्दिकला मैदानात दुखापत झाली होती. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. या सामन्यातील अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: After serious injury hardik is taking efforts in gym watch video