कोरोनामुक्त झाल्यानंतर किती काळ शरीरात राहतात अँटिबॉडीज? संशोधनातून समोर आली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळे पुन्हा कोरोना व्हायरसचा धोका कमी असतो.

लिस्बन - कोरोनामुक्त होणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळे पुन्हा कोरोना व्हायरसचा धोका कमी असतो. मात्र तरीही पुन्हा कोरोना झाल्याची काही उदाहरणे समोर आली होती. आता अँटिबॉडीबद्दल नवीन संशोधन झाले असून त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढणारे अँटिबॉडी तयार झाल्यानंतर पहिल्या तीन आठवड्यात वेगाने विकसित होतात. त्यानंतर पुढच्या सात महिन्यांपर्यंत हे अँटिबॉडीज शरीरात राहतात असाही दावा करण्यात आला आहे. 

अँटिबॉडी अशी गोष्ट आहे ज्याच्या निर्मितीमुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती व्हायरसला रोखते. कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 300 रुग्णांवर आणि त्यातून बऱ्या झालेल्या 198 लोकांवर संशोधन केल्यानंतर ही गोष्ट समोर आली आहे.

हे वाचा - पोट सारखं बिघडतंय? पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी लक्षात ठेवा 4 गोष्टी

युरोपियन जर्नल ऑफ इम्युनॉलॉडीमध्ये याबाबतचे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. त्यानुसार सार्स कोव 2 व्हायरसच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या शरीरात सहा महिन्यानंतरही अँटिबॉडी तत्त्वे सक्रिय राहतात. 

पोर्तुगालची प्रमुख सस्था आयएमएमचे मार्क वेल्होएन यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी रुग्णालयामध्ये 300 हून अधिक कोरोना रुग्ण आणि आरोग्य कर्मचारी, 2500 युनिव्हर्सिटी कर्मचारी, तसंच कोरोनातून बरे झालेले 198 स्वयंसेवकांच्या शरीरातील अँटिबॉडीच्या पातळीचा अभ्यास केला. यामध्ये अशी माहिती समोर आली की कोरोनामुक्त झालेल्या 90 टक्के लोकांच्या शरीरात पुढच्या सात महिन्यांपर्यंत अँटिबॉडीज असल्याचं आढळून आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: antibodies-found after-7-months-of covid-19 recover patient-says-research

Tags
टॉपिकस
Topic Tags: