वसंत ऋतुतील 'बोर' आरोग्यासाठी फायदेशीर; 'या' छोट्याशा फळाचे 'गुण' ऐकून आवाक् व्हाल !

बाळकृष्ण मधाळे 
Monday, 22 February 2021

हिरव्या आणि तपकिरी रंगाचे हे फळ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर देखील बहाल केले जाते. हे फळ सहजरित्या आपल्याला खाता येते. तसेच पचन सुधारण्यास आणि चांगली झोप घेण्यास देखील मदत करते.

सातारा : जसजसा वसंत ऋतु सुरू होत आहे, तसतसे निसर्गात वेगळे बदल घडताना दिसत आहेत. या बदलत्या वातावरणात असे एक गुणकारी फळ आहे, जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आणि फलदायी आहे.

अनेक देशांत या फळाला जुज्यूब, तर भारतात 'बोर' या नावाने ओळखले जाते. आपल्याला बोर आवडत असेलच, नाही का?, ग्रामीण भागात या फळाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, तसेच डोंगरामध्ये सर्वाधिक हे फळ उपलब्ध असते. हिरव्या आणि तपकिरी रंगाचे हे फळ महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर देखील बहाल केले जाते. हे फळ सहजरित्या आपल्याला खाता येते. तसेच पचन सुधारण्यास आणि चांगली झोप घेण्यास देखील मदत करते. जरी बोर अगदी लहान असले, तरी आरोग्याच्या दृष्टाने गुणकारी आहे. 

बोरामधून सर्वाधिक जीवनसत्त्वे

बोर फळ हे जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्माचे एक पॉवरहाउस मानले जाते. त्यामध्ये व्हिटॅमिन सीची सर्वाधिक मात्रा असते. 100 ग्रॅम बोरामध्ये सुमारे 69 मिलीग्राम व्हिटॅमिन सी आढळतो. आपल्या शरीरात व्हिटॅमिन सी तयार होऊ शकत नसल्यामुळे आम्हाला ते नैसर्गिकरित्या उपलब्ध फळांमधून घ्यावे लागते, जे शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यासाठी आणि इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी कार्य करते.

चांगली झोप येण्यासाठी उपयुक्त 

झोपेची समस्या दूर करण्यासाठी चिनी औषधात पारंपारिकपणे बोराचा वापर केला जातो. बोर आणि बोराची बिया दोन्ही फ्लेव्होनॉइड्समध्ये समृद्ध असतात, जे चांगल्या झोपेसाठी आवश्यक आहे. तज्ञांच्या मते, त्याची गुणवत्ता संपूर्ण मज्जासंस्था शांत करून झोपेमध्ये मदत करते.

बद्धकोष्ठता (पचनसंस्था) दूर करण्यास मदत

भारतात सुमारे 22 टक्के लोक बद्धकोष्ठतेमुळे त्रस्त असतात. बद्धकोष्ठता ही एक समस्या आहे, ज्याबद्दल अद्याप उघडपणे बोलले जात नाही. तथापि, आम्हाला या संदर्भात डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्यक आहे. मूठभर बोर खाल्ल्यास तुम्हाला बद्धकोष्ठतापासून आराम मिळू शकतो. त्यातील फायबर पचन तंदुरुस्त ठेवून बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते.

चिंताग्रस्तांना गुणकारी

बोरात असलेले अँटी-ऑक्सिडेंट्स मेंदू आणि मज्जासंस्था शांत करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करतात. बोराच्या बियांमधून काढलेले तेल हार्मोनल पातळी संतुलित करण्यास, मन शांत करण्यास आणि शरीराला आराम करण्यास मदत करतात.

रक्तदाबावर नियंत्रण 

लोह आणि फॉस्फरसची चांगली मात्रा असल्याने बोर रक्ताभिसरण प्रक्रियेवर नियंत्रित ठेवते. बोर खाण्यामुळे अशक्तपणा देखील काही प्रमाणात नियंत्रित होऊ शकतो. बोरामध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाबास गुणकारी ठरते.

हाडे मजबूत करण्यास मदत 

या फळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्याने हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते. जर तुमची हाडे कमकुवत असतील, तर तुम्ही हे फळ शोधून खाल्ले पाहिजे, जेणे करुन तुमच्या शरीराला त्रास होणार नाही.

त्वचेची चमक वाढण्यास फलदायी  

बोरामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने निरोगी आणि चमकणार्‍या त्वचेसाठी हे फळ उपयुक्त ठरते. यात अँटी-एजिंग देखील आढळतात, जे त्वचेला सुरकुत्यापासून दीर्घकाळ संरक्षण देण्याचे काम करतात, त्यामुळे हे फळ सर्वांनी जरुर खायला हवेच!

संपादन : सुस्मिता वडतिले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apple Bore is very beneficial for health