म्हणून कोविड मृत्यु दर अभ्यासकांसाठी आवश्‍यक

डॉ. अजित भागवत
गुरुवार, 25 जून 2020

डॉ. अजित भागवत
कोविडने सर्व जगात थैमान घातलेले असताना त्याच्या घातकतेचे मोजमाप करण्याची काही परिमाणे आहेत. त्यातील मृत्यू दर म्हणजेच फेटॅलिटी रेट हे एक परिमाण आहे. यामुळे आजाराच्या घातकतेची कल्पना तर येतेच परंतु देशांतील विविध राज्ये किंवा जगातील वेगवेगळ्या देशांचा तुलनात्मक अभ्यास देखील करता येतो. यावरून सामाजिक किंवा वैद्यकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येतात. मृत्यू दर मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत व प्रत्येक पद्धतीची काही बलस्थाने व त्रुटी आहेत.

कोविडने सर्व जगात थैमान घातलेले असताना त्याच्या घातकतेचे मोजमाप करण्याची काही परिमाणे आहेत. त्यातील मृत्यू दर म्हणजेच फेटॅलिटी रेट हे एक परिमाण आहे. यामुळे आजाराच्या घातकतेची कल्पना तर येतेच परंतु देशांतील विविध राज्ये किंवा जगातील वेगवेगळ्या देशांचा तुलनात्मक अभ्यास देखील करता येतो. यावरून सामाजिक किंवा वैद्यकीय पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना करता येतात. मृत्यू दर मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत व प्रत्येक पद्धतीची काही बलस्थाने व त्रुटी आहेत.
1. लोकसंख्येच्या प्रमाणातील मृत्यू दर (क्रूड फेटॅलिटी रेट) : म्हणजे एकूण मृत्यू भागिले लोकसंख्या! दर १० लाख लोकांमागे झालेले मृत्यू (डेथ्स पर मिलियन) मोजून हा आकडा काढतात. भारतात हे प्रमाण दर १० लाखांमागे ११ मृत्यू आहे. हे प्रमाण अमेरिका (३६३), इंग्लंड (६२८), जर्मनी (१०६), फ्रान्स (४५४), इटली (५७३) या पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत अत्यल्प आहे. भारतात हे प्रमाण इतके कमी का आहे हा संशोधनाचा विषय आहे. याचा लॉकडाऊनशी विशेष मोठा संबंध दिसत नाही. देशांतील सामान्य नागरिकाला कोविडमुळे मृत्यू होण्याचा धोका किती हे यावरून दिसते. यामध्ये कोविडची लागण होण्याचा आणि झाल्यास त्यामुळे मृत्यू होण्याचा एकत्रित धोका अनुस्यूत आहे.
2. केसेसच्या प्रमाणातील मृत्यू दर (केस फेटॅलिटी रेट): म्हणजे कोविडमुळे झालेल्या मृत्युंची संख्या भागिले एकूण निदान झालेल्या (घशाचा स्वाब घेऊन) कोविड रुग्णांची संख्या. हा आकडा फसवा असू शकतो आणि तो स्थळ आणि काल परत्वे बदलतो. जसे की टेस्टिंग अधिक प्रमाणात केल्यास जास्त रुग्णांचे निदान होऊन हा दर खाली येतो. टेस्टिंगचे निकष बदलले तरी यामध्ये मोठा बदल होऊ शकतो. स्वाब टेस्टची अचूकता फक्त ७० टक्के आहे. त्यामुळे ३० टक्के रुग्ण निदान होण्यापासून वंचित रहातात. देशांतील आरोग्यसुविधा, त्या जनतेची प्रतिकार शक्ती, रोगाची तीव्रता, जनतेचे सरासरी वयोमान या सर्व बाबींमुळे यात फरक पडतो. त्यामुळे महाराष्ट्रातील २३ जून रोजी असलेला केस फेटॅलिटी रेट, असा वेळ व स्थळाचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. टेस्टिंगचे प्रमाण आणि निकष जर स्थिर असतील हा दर कोविडच्या घातकतेचा कलनिर्देशक ठरतो. हा दर जगभरात साधारण ४ ते ५ टक्के इतका आहे.
3. इन्फेक्शनच्या प्रमाणातील मृत्यू दर (इन्फेक्शन फेटॅलिटी रेट) : हे थोडंसं किचकट पण महत्वाचं आहे. कोविड इन्फेक्शन आणि कोविड आजार यात फरक आहे. कोविडचे इन्फेक्शन झालेल्या प्रत्येक रुग्णात लक्षणे (आजार) दिसतातच असे नाही. किंबहुना बहुतांश रुग्णात लक्षणे नसताताच! मग जनतेमध्ये कोविडचा प्रादुर्भाव (इनफेक्शन) नक्की किती झालाय हे कळणार कसं? आणि हे जर कळलं नाही तर मृत्यू दर मोजणार कसा? यासाठी ॲंटिबॉडी टेस्टचा उपयोग करतात. ICMR च्या ॲंटिबॉडी टेस्टच्या अभ्यासानुसार भारतात जवळ जवळ १० कोटी रुग्णांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि त्यानुसार काढलेला मृत्यू दर हा दर दहा लाखांमध्ये १४४ मृत्यू इतका आहे. म्हणजे इतर पाश्चिमात्य देशांच्या केस फेटॅलिटी रेटपेक्षा आपला इन्फेक्शन फेटॅलिटी रेट कमी आहे! ही निश्चितच दिलासादायक बाब आहे.
ICMR च्या ॲंटिबॉडीच्या अभ्यासातून निघालेली माहिती महाराष्ट्रासाठी वापरली तर असे लक्षात येते की साधारण १२ कोटी लोकसंख्येपैकी एक कोटी लोकांना इन्फेक्शन (आजार नव्हे) झालेले आहे. साधारण ६० टक्के लोकांना (७.२ कोटी) इन्फेक्शन झाले की हर्ड इम्यूनिटी आली असे आपण म्हणतो. सध्या महाराष्ट्रात केसेस दुप्पट होण्यास साधारण २५ दिवस लागतात. त्यावरून हर्ड इम्यूनिटी येण्यास साधारण ७५ दिवस लागतील. त्यामुळे सप्टेंबर संपल्यानंतर साथ आटोक्यात येईल असा निष्कर्ष तज्ञ काढत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Doctor Ajit Bhagwat on the number of corona deaths