कार्पेल टनेल सिंड्रोम आणि उपचार

डॉ. नरेंद्र वैद्य
Saturday, 16 November 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. नरेंद्र वैद्य, अस्थिरोगतज्ज्ञ
हातामध्ये, मुख्यत: अंगठा, तर्जनी आणि मधील बोट यामध्ये मुंग्या येत असतील, बधिरपणा जाणवत असेल, तळहाताकडील किंवा मनगटाच्या ठिकाणी वेदना जाणवत असल्यास अस्थिरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

तपासणीनंतर ‘कार्पेल टनेल सिंड्रोम’ झाल्याचे निदान केले जाते. मनगटाच्या सांध्याच्या ठिकाणी पुढील बाजूला एक बोगद्यासारखा अरुंद भाग असतो. त्या ठिकाणी असलेली ‘मेडियन नर्व्ह’ दाबली गेल्यावर वरील लक्षणे उद्‌भवतात. यामध्ये हाताची करंगळी अथवा अनामिकेच्या (करंगळीच्या बाजूचे बोट) बोटाला मुंग्या जाणवत नाहीत. दैनंदिन जीवनातील हातामध्ये फोन धरणे, रोजचे वृत्तपत्र वाचणे, स्वयंपाक करणे आदी कृती करताना हातामध्ये अचानक मुंग्या येतात किंवा तो बधिर होतो. काही वेळा मुंग्या मनगटापासून पुढील बाजूला सरकतानाही आढळतात. हाताची ताकद कमी होते. काही वेळा ही लक्षणे एवढी तीव्र असतात की त्यामुळे झोपमोडही होते. 
या आजारामागील कारणे खालीलप्रमाणे-
१.    रचनात्मक घटक : मनगटाच्या ठिकाणी इजा झाली, हाड तुटले, निखळले, हातामध्ये तुटलेले हाड चुकीच्या पद्धतीने जुळले, संधिवातामुळे किंवा अगदी जन्मत: या बोगद्याचा भाग अरुंद असल्यास मेडियन नसेवर दाब पडतो.
२.    लिंग घटक : पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये निसर्गत: मनगटातील जागा अरुंद असते. त्यामुळे, तुलनेने हा आजार स्त्रियांमध्ये अधिक आढळतो.
३.    इतर आजारांचा परिणाम : काही दीर्घकालीन आजार, मधुमेह, थायरॉईड, रजोनिवृत्ती, लठ्ठपणा, किडनी फेल्युअर आदी आजारांमध्ये कार्पेल टनेल सिंड्रोमची शक्यता अधिक असते. 
४.    काही व्हायब्रेट होणारी यंत्रे सतत हाताळल्यास या आजाराची शक्यता बळावते.

हा आजार खालील उपायांनी टाळता येतो.
१.    हातावरील ताण कमी करणे व मूठ रिलॅक्स ठेवणे
    मुख्यत: आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी की-बोर्डवरील की हळुवारपणे दाब ठेवून हाताळणे  गरजेचे आहे. अधिक लिखाण करणाऱ्या व्यक्तींनी मोठ्या आकाराचा जाड पेन वापरावा.
२.    हात किंवा मनगटाच्या क्रियांमध्ये विश्रांती देणे.
३.    शरीरस्थिती उत्तम ठेवणे
४.    संगणकाचा माऊस व्यवस्थित हाताळणे. खराब असेल तर लगेच बदलणे.
या आजाराचे निदान स्वत: तपासणी करून तसेच क्ष किरण, इलेक्ट्रोमायोग्राम व नर्व्ह कंडक्शन स्टडी या तपासण्यांच्या साह्याने केले जाते. सुरुवातीला वेदनाशामक औषधे, स्टिरॉईडसची इंजेक्शन्स, मनगटाला आधार देणाऱ्या सपोर्टिव्ह स्प्लिंटच्या साह्याने उपचार करतात. परंतु हे उपचार करूनही आराम मिळत नसेल तर रुग्णाला शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. यामध्ये दोन पद्धती असतात.

१.    एंडोस्कोपिक सर्जरी : यामध्ये सर्जन पुढील बाजूला कॅमेरा असणाऱ्या टेलिस्कोपचे यंत्राद्वारे कार्पेल टनेलचे परीक्षण करून एक किंवा दोन छोट्या छेदांमधून अत्याधुनिक यंत्राच्या साह्याने लिगामेंट कट करून नस मोकळी करतात. दाब काढतात. त्यामुळे लगेचच वेदना कमी होऊन रुग्णाला आराम मिळतो.

२.    ओपन सर्जरी : मनगटाच्या पुढील बाजूला हाताच्या तळव्यावर छेद घेऊन लिगामेंट कट करून मेडियन नस मोकळी करतात. 
हा आजार वरवर छोटा दिसत असला तरी यामध्ये रुग्णाला असह्य वेदना, बधिरता येत असल्याने वेळीच उपाय केल्यास त्वरित व पूर्णपणे बरा करता येऊ शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr narendra vaidya all is well sakal pune today