इनर इंजिनिअरिंग : खरी प्रार्थना

Sadguru
Sadguru

आपल्यापैकी बहुतेक जण प्रार्थनेतून देव नव्हे, तर स्वतःची सुरक्षा आणि सुखाची मागणी करतात. त्यांची प्रार्थना फक्त ‘देवा मला हे दे, मला ते दे, देवा मला वाचव,’ याबद्दलच असते. शेवटी प्रार्थनेतून त्यांना त्यांचे कल्याण हवे असते; परंतु ही वस्तुस्थिती मान्य करण्याची त्यांची तयारी नसते. तुमच्या आयुष्याच्या प्रवासात तुम्हाला खरोखर; अगदी एक पाऊल उचलायचे असल्यास पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणे. असे असेल तरच, आपण आपल्या सीमित मर्यादा पार करून खरा आनंद आणि कल्याण प्राप्त करू शकतो.

आता वेळ आली आहे हे समजण्याची, की जोपर्यंत आपण आपल्या मूर्खपणाकडे लक्ष देत नाही तोपर्यंत देव काही आपली मदत करणार नाही. धर्माबद्दलची तुमची सखोल प्रेरणा पाहिली तर तुमच्या असे लक्षात येईल, की तुम्हाला कधीच दिव्यत्वाची आस नव्हती - तुम्हाला कधीच परमार्थाची आकांक्षा नव्हती. फक्त सुख-सोयी, संपत्ती, सत्ताधिकार, सुखोपभोग यांचीच इच्छा आहे. आणि तुम्हाला वाटते, की त्या गोष्टी मिळवण्यासाठी देव हे एक साधन आहे. तुम्हाला सुरक्षा किंवा संपत्ती हवी असते, तेव्हा लोभ आणि भय तुमच्या प्रार्थनेचा पाया बनतात. हे असे करून काही उपयोग नाही.

आपल्याला वाटते प्रार्थना देवापर्यंत पोचण्याचे साधन आहे. पण, देवाबद्दल आपल्याला खरोखर काय माहिती आहे? तुम्ही प्रामाणिकपणे याकडे पाहिले पाहिजे, तुम्ही हे मान्य करायला हवं की तुम्हाला देवाचा प्रत्यक्ष अनुभव नाही. तुम्ही एका ठरावीक विचारसरणीला मानता, एवढेच. ज्याचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव नाही अशा देवापर्यंत प्रार्थनेतून पोचायचा प्रयत्न करणे हा भ्रम असू शकतो. विचार आणि प्रार्थना एखाद्या माणसाला मोकळे करू शकतात, पण त्याच वेळी ते भ्रमही निर्माण करू शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भ्रम हा बहुतांश लोकांसाठी वास्तविकतेपेक्षाही जास्त शक्तीशाली अनुभव असतो, कारण भ्रमाला हवे ते बनण्याचे स्वातंत्र्य आहे. खूप साऱ्या लोकांसाठी सिनेमा हा प्रत्यक्ष आयुष्यापेक्षा जास्त शक्तीशाली असतो. भ्रमाची तुम्ही हवी तशी आणि हवी तितकी अतिशयोक्ती करू शकता. जेव्हा भ्रमाची प्रक्रिया अतिशयोक्ती होते, तेव्हा ती प्रत्यक्ष जीवनापेक्षाही अधिक शक्तीशाली होते. म्हणून  प्रार्थनेचा फक्त गैरवापरच नव्हे, तर ती फसवणूकही होऊ शकते.

तुम्हाला वास्तवात यायचे असल्यास भ्रम दूर झाले पाहिजेत. प्रार्थना एक कृती म्हणून तुमच्यात बदल घडवून आणत नाही, तर तुम्ही प्रार्थनाशीलतेचा गुण अंगी बाणलात, तर तोच तुमच्यात बदल घडवून आणतो. प्रार्थनाशील होणे म्हणजे तुमचे अवघे अस्तित्वच अर्पण करणे, स्वतःला अर्पण करण्याची ही एक प्रक्रिया आहे. प्रार्थनाशील असणे म्हणजे दिव्यत्वाशी खोलवर जोडले जाणे आहे, जे सकल सृष्टीत व्यक्त आहे. प्रार्थना हा एक गुण आहे, तुमची असण्याची ती रीत आहे. 

तुम्ही प्रार्थनाशील बनता, तेव्हा आयुष्याचा तुमचा अनुभव अतिशय सुंदर बनतो. तुम्ही आनंदी असताना अधिक ग्रहणशील होता. प्रार्थना हे स्वगत उरत नाही, परंतु एक अभूतपूर्व घटना आणि एक उत्सव जो तुमच्यात आनंदाचे उधाण आणतो. आणि मग आपण भीतीने किंवा लालसेने प्रार्थना करत नाही, कारण तेव्हा प्रार्थना हीच आपल्यासाठी फलप्राप्ती झालेली असते. आधुनिक योगाचे जनक मानले जाणारे पतंजली ऋषी असेही म्हणतात, की जेव्हा एखाद्याला कळते की प्रार्थनाशील कसे असावे, तेव्हा प्रार्थना हे देवापर्यंत पोचण्याचे साधन नसून देव हेच साधन होते; जेणेकरून आपण प्रार्थना करू शकू.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com