स्तनपान आहे बाळाचा जीवनाधार

डॉ शुभदा खिरवडकरअध्यक्ष, 2020, बालरोगतज्ञ संघटना, नागपूर. (Academy of Pediatrics, Nagpur)
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

जागतिक स्तनपान सप्ताह 2020 नागपूर बालरोगतज्ञ संघटनेच्या उपक्रमामांतर्गत लेख

आईच्या दुधाचं महत्त्व आपण अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो. मात्र सध्याच्या धावत्या जगात, विशेषतः सध्याच्या Covid च्या काळात आजच्या आईला आपल्या बाळाची ही निकड किती प्रमाणात पूर्ण करता येईल याविषयी अनेक शंका कुशंका निर्माण होणे अगदी साहजिकच आहे.

जागतिक आरोग्य संघटना व युनिसेफच्या संयुक्त विदयमाने स्तनपान आणि बालकांचे आरोग्य याविषयी जगभर जनजागृतीपर अभियान राबविले जाते. दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे याच निमित्ताने भारतीय बाल रोग तज्ज्ञांची संघटना (Indian Academy of Pediatrics) ही सुद्धा आपल्या देशभरातल्या विविध शाखांमार्फत स्तनपान बाळासाठी आणि आईसाठी किती महत्वाचे आहे हे जनमानसात बिंबवण्यासाठी अनेक उपक्रम घेऊन खालील बाबींचा अवलंब करावा असे सांगते.

सर्वप्रथम सर्वांनी हे लक्षात ठेवायचं आहे की आईचं दूध पिणे हा बाळाचा जन्मसिद्ध अधिकार आहे, जो कोणीच हिरावून घेऊ शकत नाही; अगदी Covid पण नाही!

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला एका तासाच्या आतच स्तनपान चालू करावे. त्याला त्याच्या आईचे हवे तेवढे दूध पिऊ दयावे. यासाठी कुठलेही वेळापत्रक नसावे. आईच्या स्तनांना बाळाच्या ओठांचा स्पर्श होताच दूध चांगल्या प्रमाणात झरू लागतं. जन्मानंतर थोड्याच वेळात स्तनपान करविल्याने आईला जास्त दूध येण्याची क्रिया चालू होते.

बाळाच्या जन्मानंतरच्या काही दिवसांमध्ये आईच्या स्तनांमधून पिवळसर रंगाचे घट्ट दूध येते. त्याला कोलोस्ट्रम (colostrum) म्हणतात. त्यात भरपूर प्रथिने असतात जी अतिशय पोषक असतात. त्यात अनेक रोगप्रतिकारक घटकही असतात ज्याच्यामुळे बाळाचे जंतुसंसर्गापासून रक्षण होते. काही वेळा मातांना हा चीक बाळास न पाजण्याचा सल्ला दिला जातो; हा सल्ला अत्यंत चुकीचा आहे.

सुरवातीला दूध पिणं हे बाळ आणि पाजणे हे आई, असे दोघेही शिकत असतात. त्यामुळे बाळाची रडरड आणि आईची काळजी वाढते. पण काहीच दिवसात दोघांनाही हे छान जमू लागतं. दर काही तासांनी बाळ चुळबूळ करू लागते, रडू लागते तेंव्हा दूध पाजत राहावे. काहीच दिवसात आपोआपच स्तनपानाचं एक वेळापत्रक जमून येतं.

काही आयांना स्वतःला पुरेसे दूध येत नाही अशी शंका असते. त्यामुळे त्या बरेचदा बाळाला, सुरुवातीच्या काही महिन्यांमधेच, वरचे अन्नपाणी चालू करतात. परंतु ह्यामुळे बाळ स्तनपान कमी करते, परिणामी आईला कमी दूध येते. बाळाला इतर पेये किंवा आहार न देता केवळ स्तनपान करविल्यानेच आईला जास्त दूध येईल.

आईचं दूध हे बाळाच्या वाढीसाठी जसं हवं तसं (tailor made) असतं. त्यात योग्य प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, मेदयुक्त पदार्थ, जीवनसत्त्वे आणि क्षार असतात. त्यात पाणी सुद्धा भरपूर असतं. त्यामुळे 6 महिन्यापर्यंत बाळाला पाणी देण्याची मुळीच गरज नाही. आईचं दूध पचायला हलके, योग्य तापमानाचे, मलावरोध किंवा allergy टाळणारे असते.

अनेक सर्वेक्षणात असं लक्षात आलं आहे की आईचे दूध पिणारी मुले कमी प्रमाणात आजारी पडतात तसेच इतर प्रकारचे 'वरचे दूध, अन्न' घेणाऱ्या मुलांच्या तुलनेमध्ये त्यांना अधिक चांगले पोषण मिळते. सर्वच बाळांना पहिले 6 महिने फक्त आणि फक्त आईचे दूध देण्यात यावे.

यामुळे दरवर्षी होणारे सुमारे 1.5 दशलक्ष बालमृत्यू टळतील, शिवाय इतर लक्षावधी बालकांचे आरोग्य सुधारून त्यांचा चांगल्या रीतीने शारीरिक आणि मानसिक विकास होईल. आईच्या दुधाला पर्याय म्हणून इतर प्राण्यांचे दूध बालकांना देण्याने त्यांचे आरोग्य आपण धोक्यात आणतो, हे लक्षात ठेवावे.
Covid संक्रमणाच्या काळात काही बाबतीत आईने विशेष काळजीपूर्वक वागायला हवे. स्तनपान करण्यापूर्वी दोन्ही हात 20 सेकंद स्वच्छ धुवून घ्यावे. घरातील बाहेर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी बाळाला घेण्यापूर्वी हीच काळजी घ्यावयाची आहे. कमीत कमी लोकांनी बाळाच्या संपर्कात असावे. घर परिसर स्वच्छ ठेवावा.

दूध पाजण्यापूर्वी स्तनाग्रे स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यावीत. मास्क वापरावा. पौष्टिक आणि चौरस आहार घ्यावा. स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या, फळे खावीत.

बाळाच्या जन्मानंतर लवकर स्तनपान केल्यामुळे आईचे गर्भाशयही आकुंचन पावते आणि जोराचा रक्तस्त्राव किवा रोगसंसर्ग होण्याचा धोकाही बऱ्याच प्रमाणात कमी होतो. गर्भाशय पूर्वस्थितीला लवकर येते, गरोदरपणात वाढलेले मातेचे वजन कमी होते, मातेच्या हाडातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढते, स्तनाच्या कर्करोगापासून तिला संरक्षण मिळते.

स्तनपान करण्याने आई आणि बाळ यांच्यात भावनिक सुरक्षेचे एक छान नाते तयार होते जे मनोसामाजिक वाढीसाठी अत्यंत मोलाचं असतं.
एकूण काय, आई आणि बाळ दोघांनाही स्तनपान अत्यंत लाभदायक... अमृतपानच म्हणा ना!

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breastfeeding is Foundation of Life