
पालकांनो सावधान : ‘हँड-फूट-माउथ’चा संसर्ग वाढतोय
पुणे : सध्या मुले हँड-फूट-माउथ (एचएफएमडी) या आजाराने हैराण झाली असून, याचे प्रमाण वाढत आहे. या आजारामुळे हात आणि पायाचे तळव्यांवर छोटे-छोटे लालसर फोड येतात, तर तोंडाच्या आतमध्येही व्रण दिसतात. एंटेरो विषाणूंमधून (Enterovirus) तोंडावाटे पसरणारा हा आजार आहे. या रुग्णांच्या संख्येत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत काही अंशी वाढ झाली आहे. आपल्या देशात आढळणारा हँड-फूट-माउथ आजाराचा विषाणू सौम्य आहे. त्यामुळे याचा संसर्ग झाला, तरी त्यातील गुंतागुंत वाढत नाही. परदेशांमध्ये आढळणाऱ्या या आजाराच्या काही विषाणूंपासून मात्र गुंतागुंत दिसते, अशी माहिती शहरातील बालरोगतज्ज्ञांनी दिली. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांसमोर आता ही नवीन डोकेदुखी निर्माण झाल्याचे दिसते.
कोणाला होतो?
बारा वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या वयोगटांमधील मुलांमध्ये हा आजार आता दिसू लागला आहे. बाह्यरुग्ण विभागात तपासलेल्या शंभरपैकी सुमारे दहा मुलांना या आजाराची लक्षणे दिसत आहेत.
आजार कसा पसरतो?
हँड-फूट-माउथ हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे एकाकडून दुसऱ्या मुलाला याचा सहजतेने संसर्ग होतो. विशेषतः चार ते सहा वर्षे वयोगटातील नर्सरी, ज्युनिअर, सीनियर ‘केजी’मध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये याचा संसर्ग पटकन होतो. आपल्या मुलाला हे काय नवीन दुखणे झाले आहे, अशी भीती पालकांना वाटत असल्याचे निरीक्षण बालरोगतज्ज्ञांनी व्यक्त केले.
...या कांजिण्या नाहीत
कांजिण्यांसारखे फोड दिसत असल्याने काही पालकांना त्या कांजिण्या वाटतात. पण, या कांजिण्या नाहीत. त्यामुळे कांजिण्याविरोधी औषधे घेऊन फायदा नसल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी स्पष्ट केले.
कशामुळे होतो?
हँड-फूट-माउथ हा आजार एंटेरो विषाणूंपासून होतो. अन्न-पाण्यातून, आजारी मुलाच्या डब्यातले खाऊन आजार पसरतो. हा आजार नवीन नाही. दरवर्षी काही प्रमाणात याचे रुग्ण आढळतात. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून कोरोना विषाणूंचा उद्रेक सुरू असल्याने हँड-फूट-माउथ हा विषाणू आढळला नाही. याला प्रमुख कारण म्हणजे मुलांची शाळा बंद होती.
उपचार काय?
विषाणूंपासून होत असल्याने या आजारावर खास असे औषध नाही. ताप कमी करण्यासाठी औषधे द्यावीत, असा सल्लाही डॉ. जोग यांनी दिला.
लक्षणे
सौम्य ताप येतो.
हात, पायाच्या तळव्यांवर लालसर फोड येतात.
तोंडाच्या आतमध्ये व्रण दिसतात, त्यामुळे गिळायला त्रास होतो.
काहींना कोपर, गुडघे यावर फोड येतात, त्यांना खाज सुटते
काहींच्या फोडांना आग-आग होते
हँड-फूट-माउथ या आजाराचे काही रुग्ण आता आढळून येत आहेत. पण, त्यामुळे पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. भारतातील या आजाराचा विषाणू सौम्य आहे. एक-दोन आठवड्यांत आजार बरा होतो. ताप कमी करण्यासाठी औषधे द्यावीत. खाज, आग कमी होण्यासाठी मलम लावावे. तोंडातील व्रणांमुळे गिळायला त्रास होत असल्यास आतून वेगळे मलम लावावे. डायपर बदलून झाल्यावर हात स्वच्छ धुवावेत.
- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ज्ञ