esakal | रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

बोलून बातमी शोधा

Remdesivir

रेमेडिसिवीर मिळालं नाही तर घाबरु नका; डॉक्टर सांगतात...

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना विषाणूमुळे देशात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज हजारोंच्या संख्येने लोकांचा मृत्यू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता, बेडचा अभाव, कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या अशा काही नकारात्मक आणि भीती वाढवणाऱ्या घटनाही कानावर पडत आहेत. यामध्येच रेमेडिसिवीर हे इंजक्शन न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो अशी चर्चा सर्वत्र रंगल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, यात किती सत्यता आहे हे डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच या काळात घाबरुन न जाता धैर्याने परिस्थिती हाताळण्याचं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

ताप किंवा थंडी वाजणे, स्नायूंमध्ये दुखणे, डोकेदुखी, खोकला किंवा घसा खवखवणे, तोंडाची चव जाणे किंवा वास न येणे, थकवा येणे अशी कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास लगेच कोरोना चाचणी करुन घ्या. तसंच प्रत्येक आजाराचं वेळीच निदान झालेलं योग्य आहे.

हेही वाचा: सलाम तिच्या कार्याला! बेवारस मृतदेहांना 16 वर्षांची मुलगी देतेय अग्नी

कोरोना प्रतिबंधासाठी वैद्यकीय उपचारांमध्ये वापरात येणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांच्या कुटुंबियांची धावाधाव सुरू आहे. मात्र या इंजेक्शनची गरज कोरोना झालेल्या प्रत्येक रुग्णाला नसते. त्यामुळे विनाकारण अस्वस्थ होऊ नका. अनेक रुग्ण रुग्णालयात दाखल होतानाच रेमडेसिवीर द्या, असा आग्रह धरतात. मात्र त्यात वैद्यकीय तथ्य नाही. रुग्णाचा हॉस्पिटलमधील कालावधी कमी करण्यासाठी रेमेडिसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला जर ते इंजेक्शन मिळाले नाही तर तो रुग्ण वाचणार नाही, असा गैरसमज करून घेऊ नका.

कोरोनाची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत असून डबल म्यूटेंट विषाणूंमुळे होणाऱ्या जंतूसंसर्गचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये फुफ्फुसात जंतूसंसर्ग होण्याचं प्रमाण जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे. सदर लाट पसरत असताना लोकांमध्ये समज गैरसमज होत आहेत. तसेच तरूण पिढीमध्ये हा संसर्ग झपाट्याने पसरत असून त्याला नवीन स्ट्रोन म्हटलं जात आहे.

कोरोना काळात घ्या 'ही' काळजी

कार्यालय किंवा घरी पृष्ठभागास स्पर्श करणे टाळा.

लिफ्टच्या बटणांना स्पर्श करू नका.

सामाजिक अंतर राखा आणि मास्कचा वापर करा.

सहका-यांशी हस्तांदोलन करू नका.

प्रतिकारशक्ती वाढविणारे पदार्थांचे सेवन करा.

घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क घाला,कारणाशिवाय घराबाहेर पडू नका.

लग्न समारंभ, कौटुंबिक सोहळे आदींमध्ये सहभागी होण टाळा.

सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, गर्दीच्या ठिकाणी जमणे टाळा.

स्वच्छता राखा किंवा हात स्वच्छ धुवा, घर आणि कार्यालय निर्जंतुकीकरण करा आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त रहा.

कोरानोची लस घेतल्यानंतरही लगेचच पूर्णपणे प्रतिकारशक्ती तयार होत नाही. म्हणून आपल्याला लस घेतल्यानंतरही कोरोनाच्या नियमांच पालन करावं लागणार आहे. मास्कचा वापर करणे, हात धुणे, फिजिकल डिस्टन्सिंग या त्रिसुत्रींमुळे कोरोना संसर्गापासून बचाव करता येणे शक्य आहे, ही वस्तुस्थिती आहे.

बऱ्याच रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे असतात अशावेळी डॉक्टर त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देतात. त्यामुळे अशा वेळी रुग्णाने घराबाहेर जाणे व कुटुंबातील व्यक्तींच्या संपर्कात येण्याचं कटाक्षाने टाळावं. तसंच आयसीएमआर (ICMR) च्या नियमानुसार होम आयसोलेशचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वेळोवेळी कोविड चाचणी करणे आवश्यक आहे. या नियमावलीची माहिती http://www.mohfco.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

( डॉ. प्रविणकुमार जरग हे साताऱ्यातील साई-अमृत हॉस्पिटल येथे जनरल फिजिशीयन आहेत.)