गेल्यावर्षी हेल्थ सेक्टरवर सर्वांत जास्त सायबर हल्ले; जगभरात दर 10 सेकंदाला एक हल्ला

cyber attack health sector
cyber attack health sector

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना व्हायरसच्या हाहाकारामुळे जगभरातील आरोग्य व्यवस्था मोठ्या ताणाखाली होती. कोरोनाचा कहर सध्या कमी झाला असला तरीही ताण अद्याप तसाच आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आरोग्य क्षेत्राने या महासाथीचा सामना करण्यामध्ये आपली ताकद पणाला लावली होती. या दरम्यानच्या काळातच हॅकर्सच्या निशाण्यावर सर्वांत जास्त कोणतं क्षेत्र असेल तर ते आरोग्य क्षेत्रच होतं. एका रिपोर्टनुसार, 2020 मध्ये आरोग्य क्षेत्रावर होणाऱ्या सायबर अटॅकमध्ये तब्बल 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर दर 10 सेकंदाला एका ऑर्गनायझेशनवर सायबर अटॅक झाला आहे. यातील सर्वाधिक सायबर अटॅक हे नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 मध्ये झालेले आहेत. हे हल्ले जगभरातील आरोग्य संस्थांवर केले गेले आहेत. या दरम्यान सायबर अटॅकमध्ये तब्बल 45 टक्क्यांनी वाढ झालेली पहायला मिळाली. तसेच इतर क्षेत्रांमधील सायबर अटॅकमध्ये सुद्धा दुप्पट वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. ऑक्टोबर महिन्यात अमेरिकेच्या आरोग्य क्षेत्रावर सर्वांत जास्त हल्ले केले गेले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात 71 टक्क्यांनी वाढ झाली होती. हॉस्पिटल आणि हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्सना मोठ्या प्रमाणावर खंडणीच्या गुन्ह्यांचा सामना करावा लागला आहे. 

काय करतात हॅकर्स?
डबल एक्स्टॉर्शन नावाच्या हॅकिंग टेक्निकद्वारे ही खंडणीखोरी केली जाते. याद्वारे त्यांनी रुग्णांच्या डेटाची चोरी करणे आणि फाईल्समध्ये छेडछाड करण्याच्या प्रकारांचा समावेश आहे. हे हॅकर्स लोकांचा डेटा चोरून त्याबदल्यात खंडणी मागतात. जर त्यांना खंडणी मिळाली नाही तर ते हा डेटा सार्वजनिक करण्याची धमकी देतात. त्यामुळे या हॅकर्सना खंडणी देण्यास अनेकजण तयार होताना दिसतात. 2020 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये सर्वांत जास्त असे प्रकार घडले असून जगभरात प्रत्येक 10 सेंकदाला अशा घटना घडल्या आहेत. सायबरपीस या संस्थेने आरोग्यव्यवस्थेशी निगडीत एका अहवालाद्वारे याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.  त्यांनी म्हटलंय की, आरोग्य व्यवस्थेच्या विरूद्ध सायबरॅटॅक होत असून त्यातून रुग्णांच्या आयुष्याला धोका आहे. याचा आरोग्य कर्मचार्‍यांवर मानसिक परिणाम देखील होत आहे. या सायबर हल्ल्यांविरुद्ध लढा देण्यासाठी सरकारांनी आणखी काही उपाययोजना करणे आवश्यक आहे, असा इशारा सायबरपीस संस्थेने दिला आहे.

खंडणी देणं हाच रुग्णाचं आरोग्य सुरक्षित करण्याचा एक सोपा आणि त्वरित मार्ग ठरत असल्याने झालेल्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी हॉस्पिटल्स कदाचित मागितलेली खंडणी देऊन या हल्ल्यापासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यातून पूर्णपणे सुटका होण्याची शक्यता नसतेच. कारण रुग्णाच्या आयुष्याबाबतची कर्मचाऱ्यांच्या मनातील भीती त्यामुळे नष्ट होऊ शकत नाही. सायबर अटॅक झाल्यानंतर देखील रुग्णांच्या आरोग्याला पूर्णपणे धोका नसेलच, याची खात्री त्यांनाही बाळगता येत नाही. याचा दिर्घकालीन परिणाम होतो. असं सायबरपीस इन्स्टिट्यूचे सीईओ स्टेपन डुगीन यांनी म्हटलं आहे. 

त्यामुळेच 'प्लेइंग विथ लाइव्ह' या नावाचा सायबरपीस इन्स्टिट्यूटचा पेपर असा युक्तिवाद करतो की आरोग्यसेवेवर होणारा सायबरअटॅक हा संपूर्ण समाजावरचाच हल्ला ठरतो आणि परिणामत: याचा मानवी आयुष्यास धोका निर्माण होतो. सायबर गुन्हेगार आरोग्य सेवेला लक्ष्य का करतात? हा प्रश्न देखील महत्त्वाचा ठरतो. त्याचं उत्तर या रिपोर्टमध्ये देण्यात आलं आहे. असं करण्यामागच्या मुख्य कारणांपैकी एक कारण आहे की बर्‍याचदा हॉस्पिटल्समध्ये तकलादू 'डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर'ची व्यवस्था असते. तसेच हेल्थकेअर नेटवर्कशी वेगवेगळे स्पेशल डिव्हाईस कनेक्ट केल्याने ही व्यवस्था आणखीनच किचकट बनते. या व्यवस्थेला सिक्योरिटी अपडेट्सनी सुरक्षित केलं जात नाही, त्यामुळे सायबर गुन्हेगारांसाठी एकप्रकारे ही पर्वणीच असते.  दुर्दैवाने आरोग्य क्षेत्रात असे सायबर हल्ले करुन खंडणीच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने पैसे उकळणाऱ्या गुन्हेगारांना पकडणे आणि त्यांना शिक्षा होण्याच्या घटना घडताना दिसतच नाहीत. यावर जगभरातील सर्वच देशांच्या सरकारांनी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com