शोध स्वतःचा : ऐका शरीराच्या हाका...

Yoga
Yoga

आपल्या सर्वांत जवळचं काय असतं? आई-वडील? जोडीदार? मित्रमंडळी? घर? नाही! आपल्या सर्वात जवळचं आहे आपलं शरीर! आई-वडिलांना काही कमी पडलं तर आपण तत्परतेने धावून जातो, घरात अनोळखी माणसांना प्रवेश देत नाही, मित्रमंडळींशी नातं घट्ट राहण्यासाठी त्यावर मेहनत घेतो. म्हणजेच बाहेरच्या सगळ्या गोष्टींना आपण जितकं महत्त्व देतो त्यापेक्षा अनेक पटीने कमी आपण आपल्या सर्वांत जवळच्या म्हणजे आपल्या शरीराच्या कित्येक हाकांना उत्तरही देत नाही. या हाका अनेकदा मूक असतात. परंतु खूप काळ या मूक हाकांना दुर्लक्षित केल्यास शरीर ओरडून बोलू लागतं.
शरीराच्या आरोग्याची आपण इतकी हेळसांड का करतो? एरवी मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर आपल्याला खपत नाही, परंतु शरीराचे मात्र आपण हाल करत राहतो.

चुकीचा आहार, जंक फूड, अति खाणे, अवेळी खाणे, कमी किंवा अति झोप, ताणतणाव, कोणतीही गोष्ट अवेळी करणे, जाडी वाढू देणे, मद्यपान, धूम्रपान, हालचाली किंवा व्यायाम न करणे, एकाजागी दीर्घकाळ आखडून बसणे इत्यादी हे सर्व तोंड दाबून बुक्क्यांचा मार दिल्याप्रमाणे शरीराच्या आरोग्याचे अत्याचार आहेत. शरीराचे आरोग्य फार खालावत नाही तोपर्यंत आपण त्याला गृहीत धरत राहतो. याचं कारण म्हणजे एखाद्या गोष्टीचं नावीन्य संपलं, की जसं त्याकडे आपण फार लक्ष देत नाही आणि ती सवयीचा भाग होऊन जाते, तसंच आपलेच शरीर असल्याने त्याकडे रोज असं फार काही वेगळे लक्ष द्यायची गरज भासत नाही. वस्तूमध्ये बिघाड होईपर्यंत तिच्या अस्तित्वाकडे वेगळे असे भान नसते, तसंच आहे. डोळ्यात काहीतरी जाईपर्यंत दृष्टीला गृहीत धरतो, पोट बिघडेपर्यंत पचनक्रिया गृहीत धरतो, पायाला ठेच लागेपर्यंत चालण्यासारख्या साध्या क्रियेचा एरवी विचारही करत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शरीराच्या या मूक हाका कोणत्या? जाडी किंवा पोटाचा घेर वाढला असेल, झोपेचे गणित बिघडले असेल, पचन व्यवस्थित होत नसेल, रोज पोट साफ होत नसेल, अ‍ॅसिडिटी, भूक लागत नसेल, अति खाल्ले जात असेल, पाणी कमी प्यायले जात असेल, व्यायाम होत नसेल, कोणतेही व्यसन असेल, अति स्ट्रेस या सर्व शरीराच्या मूक हाका समजाव्यात.

इंग्रजीमध्ये एक म्हण आहे what you allow is what will continue. याचा अर्थ जो बदल तुम्हाला घडवून आणायचा आहे त्यासाठी प्रयत्न आणि कष्ट घ्यायला हवेत. चालू आहे तसं चालू ठेवलं तर जे चालू आहे तसंच चालू राहील. Nothing changes if nothing changes. त्यामुळे झडझडून उठा आणि तुमच्या आरोग्याची ध्येयं काय आहेत ते ठरवून त्या दिशेने भराभरा पावले टाका.

रस्ता चुकलेला जितक्या लवकर समजेल तितक्या चटकन मागे फिरून योग्य मार्गावर येणे सोपे जाते, नाहीतर परतीच्या प्रवासाचा पल्ला मोठा असतो ज्यात जास्त वेळ आणि शक्ती खर्ची पडते. Stitch in time saves nine असं म्हटलंच आहे. आजपासून आपल्या शरीराच्या या मूक हाकांना ऐकायला शिकूया आणि आरोग्याची गाडी योग्य दिशेने चालू ठेवूया. कोणतीही महाग वस्तू एकच असते आणि ती आपण जपून वापरतो. हे तर आपलंच शरीर आहे आणि आपल्यालाच त्याचं रिपेअरिंग करायचं आहे कारण रिप्लेसमेंटची ऑफर यात नाही!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com