शोध स्वतःचा : गरज विरुद्ध आवड

आपण कोणतीही गोष्ट करतो ते करण्यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे त्याची आपल्याला किंवा दुसऱ्या कोणाला तरी गरज असणे म्हणजे ‘need’ आणि दुसरं म्हणजे त्याची आपल्याला आवड किंवा ओढ असणे म्हणजे ‘want’.
Devyani M
Devyani MSakal

आपण कोणतीही गोष्ट करतो ते करण्यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे त्याची आपल्याला किंवा दुसऱ्या कोणाला तरी गरज असणे म्हणजे ‘need’ आणि दुसरं म्हणजे त्याची आपल्याला आवड किंवा ओढ असणे म्हणजे ‘want’. गरजेसाठी करतो म्हणजे डेडलाइन्स आहेत म्हणून केलेली कामं, उदरनिर्वाहासाठी केलेली नोकरी किंवा जीवनावश्यक गोष्टी वगैरे... इच्छा किंवा आवडींशिवायही आपण जगू शकतो. त्यांनी आपलं काही अडत नाही, परंतु त्यांचा योग्य समतोल राखला तर नुसत्या गरजेपुरतं न जगता आयुष्यात रंग भरले जातील. इच्छांचा समतोल मात्र सुटायला नको, नाहीतर गोष्टी त्या टोकाला जाऊ शकतात. निरोगी इच्छा म्हणजे व्यायाम करायला आवडतो, पण अतिरेक झाला तर तेही हानिकारक. गाडीची गरज प्रत्येकाला असते पण अवाढव्य इच्छा जेव्हा हाव बनते आणि गाडीत एकच व्यक्ती कायम बसणार असेल तरीही गाडी मात्र भलीमोठी घेण्यानं आपण स्वार्थी ठरतो व सामाजिक भानही विसरतो. चांगलं पौष्टिक खाणं हे आपल्याला आवडतंच, पण चटकमटक खाण्याची सवय सारखीच लागून बसली, तर आपण अतिप्रमाणात बाहेरचं मागवून खातो हा झाला अतिरेक.

कोणतीही गोष्ट करण्याची प्रेरणा ते केल्याच्या बदल्यात काहीतरी मिळेल म्हणून असते, तेव्हा ती गोष्ट करण्याची मूलभूत आवड आणि गोडी निघून जाते. ज्या कारणासाठी ती क्रिया करतो ते कारण त्यातून मिळणारा फायदा हे नसू शकतं. आपण लहान मुलांना आपल्या नकळत ‘अमुक केलं तर चॉकलेट देईन,’ असं म्हणतो. असं रिवॉर्ड मिळेल म्हणून काही केलं तर ते करण्याचा मूळ गाभा आपण हरवून बसतो.

बाह्य गोष्टी आणि आनंद

अमेरिकेतील एडवर्ड डेसीने १९६९ मध्ये सायकॉलॉजीच्या थिसिससाठी एक प्रकल्प केला. त्यात त्याने दोन ग्रुप्स करून दोन्ही ग्रुपला समान कोडी सोडवायला दिली. असं त्यानं तीन दिवस केलं. तीनही दिवशी वेगवेगळी कोडी दिली. पहिला दिवस गेला, दोघांनीही कोडी सोडवली. दुसऱ्या दिवशी त्यातील पहिल्या ग्रुपला त्याने सांगितलं, की कोडं बरोबर सोडवलं तर त्यांना काही रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल. दुसऱ्या ग्रुपला मात्र बक्षीसाबद्दल काहीच सांगितलं नाही. पहिल्या ग्रुपनं अचानक जास्त मन लावून कोडं सोडवलं. म्हणजे मला काही दिलं तर त्या बदल्यात मी आणखी चांगलं काम करेन असं! तिसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी पहिल्या ग्रुपला सांगितलं की आणखी पैसे उरले नाहीत आता बक्षिसाविनाच कोडं सोडवावं लागेल. तिसऱ्या दिवशी पहिल्या ग्रुपनं फारसं मन लावून कोडं सोडवलं नाही. टंगळमंगळ केली आणि लवकर काम थांबवलं. याउलट दुसऱ्या ग्रुपनं (ज्यांना तीनही दिवस बक्षीस दिलं गेलं नव्हतं) जास्त वेळ कोडं सोडवलं व जास्त मन लावून सोडवलं, कारण तिसऱ्या दिवशीपर्यंत त्यांना त्यात गोडी निर्माण झाली होती.

या प्रकल्पातून असा निष्कर्ष निघाला, की पैसे किंवा कोणत्याही स्वरूपातील बाह्य बक्षीसे दिल्यानं त्या क्रियेतील गोडी व त्यातून मिळणारा आनंद हरवून जातो. शॉर्ट टर्म उत्तेजन मिळू शकतं, पण त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकत नाही. प्रेरणा ही कायम टिकायची असेल, तर ती आतूनच यायला हवी.

खरंतर मानवाचा आंतरिक कल हा नावीन्य, आव्हानं व क्षमतांना उंचावण्याचा प्रयत्न असतोच. तुमच्या मुलांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये किंवा कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविकास आणि क्षमता उंचावण्यासाठी काही करण्याची इच्छा असेल, तर त्यांची प्रगती बाह्य बक्षिसांवर आधारित ठेवू नका. ती प्रगती तकलादू पायावर उभी राहील!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com