गर्भधारणा आणि प्रसूती सुलभेतेसाठी 'ही' घ्या काळजी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

गर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे असते कायम सकस आणि योग्य आहार घेणे.

कोल्हापूर - प्रवासाला जाताना आपल्या अवतीभोवती दिसणारी हिरवीगार शेती, डुलणारी कणसे पाहून मन प्रसन्न होते. मात्र, चांगले पीक यायला जमीन सकस असावी लागते, याचा विचार आपण केला आहे का? तिची योग्य वेळी मशागत करावी लागते, तरच चांगले बीज अंकुरते आणि सकस पीक येते. शरीराचे अगदी जमिनीसारखेच आहे. निरोगी आणि तणावशून्य गर्भधारणा, गर्भावस्था, प्रसूती आणि बाळंतपण हवे असल्यास त्याची तयारी गर्भ राहायच्या आधी करून उपयोग नाही. वयात आल्यापासूनच काही गोष्टींकडे नीट लक्ष दिल्यास स्त्रियांचे स्वास्थ्य चांगले राहते आणि त्या पुढील गर्भावस्था पेलायला सक्षम असतात. 

गर्भधारणा आणि प्रसूती सुलभ असाव्यात म्हणून सगळ्यात महत्त्वाचे असते कायम सकस आणि योग्य आहार घेणे. फळे, पालेभाज्या, प्रथिने मिळतील असे खाणे जाणीवपूर्वक आणि योग्य प्रमाणात खाणे अतिशय महत्त्वाचे आहे. चांगल्या आहाराबरोबरच फॉलिक ॲसिड घेणेही लाभदायक ठरू शकते. याचबरोबर नियमित व्यायाम करणेही अतिशय आवश्यक आहे. वजन आटोक्यात असले की, आरोग्य चांगले राहते आणि पुढील शारीरिक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पेलता येतात. वजन अनियंत्रित असल्यास पाळी नीट न येणे, ‘पीसीओडी’सारख्या समस्या मागे लागतात. त्यातून पुढील गुंतागुंत वाढत जाते. आहार आणि विहार या दोन्हीबरोबरच स्वतःची प्रजननक्षमता जाणणे, आनुवंशिक मुद्दे लक्षात घेऊन उपाययोजना करणे, वेळेवर लसीकरण करून घेणे, विचार न करता कोणतीही औषधे न घेणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे स्ट्रेस न घेणे. त्यामुळे त्या बाजूला ठेवायला शिकणे तब्येतीसाठी खूप गरजेचे असते. धूम्रपान, मद्यपान यांसारख्या व्यसनापासून लांब राहणे उत्तम. गर्भधारणेचा विचार करण्याच्या खूप पूर्वीपासून आपले शरीर त्यासाठी आरोग्यपूर्ण ठेवण्यासाठी पुढील पथ्ये नक्की पाळा :

  • सकस आणि चांगला आहार
  • नियमित व्यायाम
  • वजन आटोक्यात ठेवणे 
  • मानसिक ताण न घेणे
  • व्यसनांपासून दूर राहणे
  • स्वतःची प्रजननक्षमता जाणून घेणे
  • वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे न घेणे

या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्यास गर्भधारणा, प्रसूती, बाळंतपण या सगळ्या पायऱ्या तुम्ही आनंदाने आणि निरोगीपणे पार करू शकाल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Diet should for ease of pregnancy and childbirth