

मातृत्वाबरोबरच आपल्या बाळाला स्तन्यपानाने तृप्त करणे, ही प्रत्येक मातेची इच्छा आणि गरज असते. तथापि, विकलांग, दिव्यांग मातांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांना मदतकारक ठरणाऱ्या सूचना जागतिक स्तन्यपान सप्ताहानिमित्ताने...
डॉ. चारुलता बापये, स्त्रीरोगतज्ज्ञ
नवजात अर्भकाच्या फक्त दोनच गरजा असतात. एक म्हणजे आईच्या कुशीची ऊब आणि दुसरी तिच्या वक्षातील अमृत! आईच्या दुधाची किंमत मोजताच येणार नाही! प्रसूतीनंतरच्या पहिल्या तासातच सुरू केलेल्या स्तन्यपानाने बाळाला आपली पहिली रोगप्रतिबंधक लस मिळते. अर्थातच, खूप साऱ्या अँटिबॉडीज मिळतात, ज्यामुळे अनेक आजार बाळापासून लांब राहतात. असे हे स्वच्छ, ताजे, योग्य तापमानास असलेले अमृत प्रत्येक आई आपल्या नवजात बालकाला देण्यास आतुर असते. परंतु ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नसते. त्यातून आई जर विकलांग असेल, तर तिला निश्चित जास्त आधार आणि मदत लागणार यात शंकाच नाही.
अधिकाधिक विकलांग स्त्रिया आज माता बनत आहेत. पण आपण समाज म्हणून, स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून त्यांना मार्गदर्शन देण्यास समर्थ आहोत का? कदाचित नाही. आपले बाळ सुदृढ व्हावे, अशी त्यांचीही अपेक्षा असते. त्याकरिता स्त्रीरोगतज्ज्ञ, परिचारिका, लॅक्टेशन कन्सल्टंट आणि जवळचे नातेवाईक सर्वांनी मिळून त्यांना स्तन्यपान आणि त्याद्वारे आरोग्यसंपन्न असलेले बाळ देण्याकरिता सोयी निर्माण केल्या पाहिजेत.
अशा करूया उपाययोजना
असे दिसून येते, की ज्या स्त्रियांना शारीरिक व्यंग आहे (जसे सेरेब्रल पाल्सी, मल्टिपल स्केलरॉसिस, मज्जारज्जूला हानी, हात अधू असणे) त्यांना आपल्या मर्यादा आणि क्षमता दोन्ही माहीत असतात. त्यांच्याबरोबर चर्चा करून, त्यांचे मत घेऊन, स्तन्यपान अधिक सुकर कसे करता येईल, याचा आढावा घेणे महत्वाचे आहे. अशा मातांना स्तन्यपानाकरिता आपण पुढील प्रकारे मदत करू शकतो.
स्तन्यपानाकरिता खास उशा मिळतात, ज्या मातांच्या कंबरेला बांधता येतात. त्यामुळे बाळाचे वजन आईच्या कमजोर दुखऱ्या हातावर न येता उशीवर राहते. शिवाय, बाळाचे ओठ मातेच्या स्तनापर्यंत सहज पोहोचतात. त्यामुळे आईच्या हाताचा किंवा मनगटाचा/दुखऱ्या भागाचा वापर टळतो, स्तन्यपान सुखद होते.
शारीरिक व्याधी/विकलांगता असलेल्या स्त्रीने कुठल्या स्थितीमध्ये बाळास पाजावे? ज्या स्थितीमध्ये आई आणि बाळ पूर्णपणे सुखसीन स्थितीत (कम्फर्टेबल) वाटते, ती स्थिती सगळ्यात चांगली. जर वर सांगितलेली उशी वापरली जात असेल, तर फूटबॉल होल्ड सर्वात चांगली स्थिती. या व्यतिरिक्त आईने बाळाला झोपून पाजले तरीही त्यात गैर काहीही नाही. जी बाजू विकलांग असेल, त्या बाजूस झोपल्याने चांगला हात आई बाळाला आधार द्यायला वापरू शकते. त्यामुळे तिचे श्रम वाचतील आणि रात्री स्तन्यपान देणे अधिक सोपे जाईल.
या शिवाय ‘प्रॉपर लॅच’ म्हणजे काय, हे आईला समजावणे गरजेचे आहे. बाळाच्या तोंडात फक्त स्तनाग्रच नाही, तर बाजूचा काळा भागही गेला पाहिजे. यामुळे स्तनाग्रे दुखणे, त्यांना चिरा पडणे या गोष्टी टळतात. स्तन्यपान सुखकर होते.
दृष्टिहीन/कमी दिसणाऱ्या मातांसाठी
या स्त्रियांना दिसत नसले तरी त्यांच्या बाकीच्या क्षमता अतिशय चांगल्या विकसित असतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्ट बोलून, वर्णन करून सांगितली की, अगदी व्यवस्थित कळते.
या मातांनी जर बालकाकरिता एक खास झोळी वापरली; तर तिचे हात, बोटे रिकामे राहतील. त्याद्वारे बाळाचे तोंड, नाक, ओठ स्पर्शाने कळतील. त्यामुळे स्तन्यपान सोपे होईल.
ब्रेल आणि आॅडिओ टेप्स अशी साधने अंध मातांकरिता उपलब्ध आहेत.
बाकीच्या अंध मातांचे अनुभवाचे बोल खूप उपयोगी पडू शकतील.
बहिरेपणा असलेल्या माता
बहिरेपणा असलेल्या माता लिहून, बोलून किंवा सांकेतिक भाषा अशा निरनिराळ्या मार्गाने संवाद साधू शकतात.
या मातांना माहिती देताना व्हिडिओ, पुस्तके, निरनिराळ्या वेबसाइटचा वापर करू शकतो.
आज बाजारात कंपन पेजर (व्हायब्रेटिंग पेजर) उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या आवाजाकरिता वेगवेगळी कंपने होतात. बाळ रडले की, विशिष्ट प्रकारचे कंपन होते, आईला परिस्थितीची जाणीव होते.
जर इस्पितळात सांकेतिक भाषा येणारी व्यक्ती असेल तर दुधात साखर! मग अशा बहिरेपणा असलेल्या मातेला तंतोतंत माहिती देणे खूप सोपे होईल!
अनेक देशांमधले शोधनिबंध हेच सांगतात की, दिव्यांग स्त्रियांमध्ये स्तन्यपानाचे प्रमाण कमी आहे. त्याचे महत्त्वाचे कारणे म्हणजे संवादामधील विविध प्रकारच्या कमतरता. हाच अडथळा दूर केल्यास अमृताहून श्रेष्ठ असलेले आईचे दूध प्रत्येक बाळाला मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.