डॉक्‍टर-पेशंट संबंध आणि आरोग्य

doctors.
doctors.

गेले सहा महिने मी 'सकाळ' च्या माध्यमातून स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्येबद्दल लिहित आहे. पण त्याबरोबरच डॉक्‍टर - पेशंटचे संबंध, संवाद खुप महत्त्वाचा आहे. कारण त्याचा पेशंटच्या आरोग्यावर खूप परिणाम होतो. हे संबंध म्हणजे आरोग्य व्यवस्थेचा पाया आहे. उत्कृष्ट आरोग्य सेवा, उपचार प्रक्रिया, फलदायी परिणाम हे सर्व या संबंधांवर अवलंबून आहे. या संबंधाला नकळत तडा गेला आहे. आजच्या काळातील डॉक्‍टरांची समाजमनातून ढासळलेली प्रतिमा, अनादर, त्यांच्यावर होणारे हल्ले हेच दाखवतंय.

मला पुर्वीचा काळ आठवला. तेव्हा 'फॅमिली डॉक्‍टर' हीच संकल्पना होती. 1965 मध्ये माझे डॉक्‍टर आईवडिल मुंबईहून लातूरसारख्या छोट्या तालुक्‍याच्या ठिकाणी येऊन स्थायिक झाले. माझी आई लातूरमधील पहिली स्त्रीरोगतज्ज्ञ. त्यावेळी लातूरला रक्तपेढी, भूलरोगतज्ज्ञ, अशी काहीच सोय नव्हती. बाळंतपणात बऱ्याच स्त्रिया दगावायच्या. भूलरोगतज्ज्ञाशिवाय तिने लातूरमधील पहिले सिझेरियन माझ्या वडिलांच्या मदतीने रात्री बारा वाजता केले, तेही अतिशय जोखमीचे समजले जाणारे म्हणजे प्लॅसेंटा प्रीव्हीया. ज्यामध्ये प्लॅसेंटा (वर) गर्भाशयाच्या खालच्या बाजूला असतो. अतिरक्तस्त्रावाने पेशंट व बाळ दगावण्याची शक्‍यता असते. असे असताना एका अनामिक विश्‍वासाने त्या पेशंटच्या पतीने तिला म्हटले, 'बाई, जे करायचे ते तुम्हीच करा. कुठल्याही परिणामाला माझी तयारी आहे.' आणि तिने ते आव्हान स्वीकारले. त्या आणिबाणीच्या मध्यरात्रीनंतर तिला आणि माझ्या वडिलांना काय मिळाले? एक आत्मविश्‍वास, दुर्दम्य आशावाद आणि पेशंटसाठी जितकं जमेल तेवढं उत्कृष्ट अद्ययावत उपचार करण्यासाठी लाखमोलाचं बळ! आणि पेशंटला काय मिळाल? पेशंट बरा झाल्याचा आनंद, बाळ वाचल्याचे समाधान आणि डॉक्‍टरांप्रती एक गाढ विश्‍वास व श्रद्धा!

त्या काळात सगळ्या आजारांचे ते 'डॉक्‍टर फॉर ऑल' होते. रक्ततपासणी व इतर तपासण्या अगदी कमी असायच्या. ते म्हणतील तो शब्द प्रमाण. कारण पेशंटनी त्या दोघांना पितृत्व बहाल केलं होतं.
मग या आजच्या काळात असं काय घडलं? कुठं चुकलं? डॉक्‍टर व पेशंट यांच्या संबंधाबाबत खुप संशोधन, अभ्यास झाला आहे. त्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत.

1) पॅटरनॅलीझम (पितृत्व) :- हा प्रकार वर सांगितल्याप्रमाणे आधीच्या काळात होता. यामध्ये डॉक्‍टर हा प्रबळ असायचा व पेशंट आज्ञा पाळायचा. याचा फायदा खुप गंभीर स्वरूपाचा आजार असलेल्या रूग्णांना होतो. तसेच पेशंटच्या अंगावरची जबाबदारी, ताण गेल्यामुळे बऱ्याच पेशंटस्चा आजार तसाच कमी व्हायचा. डॉक्‍टरांवर टाकलेला विश्‍वास, डॉक्‍टरांना असणारा आत्मविश्‍वास यामुळे पेशंट जादुची गोळी घेतल्यासारखा बरा व्हायचा.

2) अन्योन्य, परस्परसंबंधी (Mutuality) :- काळ हळूहळू बदलत होता. पेशंटचा शैक्षणिक, सांपत्तिक स्तर उंचावला आणि पितृत्व पद्धत लोप पावत गेली. डॉक्‍टर आणि पेशंट दोन्ही समान पातळीवर आले. पेशंटपण आपल्या तब्येतीविषयीचे ज्ञान व माहिती घेऊन चर्चा करू लागले. एका अर्थी असा संवाद होणं चांगलंच होतं. डॉक्‍टर, पेशंट दोघेही निर्णयासाठी जबाबदार झाले. आणि संबंध टिकवणे दोघांनाही बांधिल आहे. असे संबंध छान राहू शकतात.

मागच्या वर्षी एकता तिच्या पाच वर्षांच्या मुलीला, रियाला घेऊन 1 जुलैला मला शुभेच्छा द्यायला आली होती. रियाला पाहिल्यावर माझा माझ्या डोळयांवर विश्‍वासच बसेना. जन्मत: आठशे ग्रॅम वजन असलेली रिया, आज खुप छान व सुदृढ दिसत होती. सहा वर्षापुर्वी एकताचे माझ्याकडेच वंध्यत्वाचे उपचार चालू होते. तिचे वय 37 वर्षे होते. रक्तदाब, मधुमेह असे त्रासदायक आजार सोबतीला होते. तिला तिची गर्भधारणा खुप जोखमीची आहे हे सांगूनसुद्धा ती ऐकत नव्हती. अथक प्रयत्नानंतर शेवटी गुड न्युज मिळाली. पण खुप काळजी घेऊनसुद्धा अचानक सहा साडेसहा महिन्यात तिच्या गर्भाशयातील गर्भजलाची पिशवी फुटली. बाळ वाचायची शक्‍यता अगदीच नगण्य होती. पण माझं मन हार मानायला तयार नव्हतं. मी तिच्याशी व तिच्या घरच्या लोकांशी बोलून, सगळे जोखमीचे घटक सांगितले व सिझेरियनचा निर्णय घेतला. आठशे ग्रॅम वजनाचे छोटेसे बाळ कसे तग धरेल असे वाटत होते. दोघीही अतिदक्षता विभागात दाखल झाल्या. आणि शेवटी त्यांची झुंज यशस्वी झाली. या केसमध्ये डॉक्‍टर व पेशंट दोघांचाही उपचारामध्ये सहभाग व समन्वय होता. म्हणून उपचार फलदायी ठरले.

3) माहिती दिली जाणारे (Informed) :- गेल्या पंधरा-वीस वर्षांत तर इंटरनेट, मीडिया, फेसबुक या माध्यमामुळे नेहमीचा पेशंट हा इ-पेशंट झाला. एकमेकांना पूरक असणारं डॉक्‍टर - पेशंटचं नातं बदलत आता वेगळ्याच टप्प्यावर आलं. यामध्ये पेशंट प्रबळ झाला. डॉक्‍टरांचं काम म्हणजे वेगवेगळे पर्याय सांगणे किंवा कुठल्यातरी कंपनीने सगळे अधिकार घेऊन डॉक्‍टरकडे पेशंटला त्याच्या त्रासानुसार पाठवणे.
आताचे इ-पेशंटस त्यांच्या आजाराविषयी पूर्ण माहिती इंटरनेटवरून मिळवूनच डॉक्‍टरांकडे येतात. कांही दिवसांपूर्वी वीस वर्षांची मुलगी आली व मला म्हणाली, 'डॉक्‍टर, मला पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (पीसीओएस) आहे. मी नेटवर सगळं वाचलंय.' तिने आधी कुठेही डॉक्‍टरांना दाखवले नव्हते. मी तिला कांही सांगितले की म्हणायची, हो मला माहिती आहे. शेवटी म्हणाली, 'पीसीओएस साठी हे नविन औषध देतात.' त्यामुळे आता असं झालं की उपचार कसे करायचे हेच आम्हाला आमचे ई-पेशंटस्‌ सांगतात. मजेचा भाग सोडला तर कधीकधी हा प्रकार डॉक्‍टर पेशंट संबंधामध्ये घातक आहे.आणि यातच वैद्यकीय उपभोक्तावाद (Medical consumerism) जन्माला आला. इंटरनेटच्या तोडक्‍या माहितीमुळे व पेशंट त्यांच्या अपुऱ्या ज्ञानामुळे तब्येतीविषयीचे निर्णय स्वत: घेऊ लागले आणि मेडिकल कंझ्युमेरिझमचे तोटेही दिसायला लागले.

इकडे वैद्यकीय क्षेत्रात पण न भूतो न भविष्यती आश्‍चर्यकारक प्रगती होत गेली. डॉक्‍टरांकडे अद्ययावत, महागडी उपकरणे आली. आजचा वैद्यकीय व्यवसाय evidence based medicine वर अवलंबून आहे. त्यामुळे तपासण्यांचा, आजाराचा खर्च वाढला. तसेच कांही गुंतागुंतीची प्रकरणे कोर्टात गेल्यावर कोर्ट फक्त पुरावाच (तपासण्या) मागतं.

डॉक्‍टर पेशंट संबंध आज दुरावत चाललाय. दोघांमधील नातं व्यवहारिक पातळीवर आलं. या सगळ्या गोंधळात गरीब अशिक्षित पेशंटचे पण हाल होऊ लागले. अर्थात पाच ते दहा टक्के डॉक्‍टर व पेशंटची पण कांही बाबतीत संयुक्तपणे चूक आहे. पण त्यामुळे असं झालं की, चांगल्या डॉक्‍टरांकडे पण सगळेच संशयाने बघू लागले. तरीही सध्याच्या कोरोनाच्या संकटात डॉक्‍टरांनी जी अतुलनीय कामगिरी केली त्याला तोड नाही.

डॉक्‍टर व पेशंट दोघांनीही आत्मचिंतन करणं महत्त्वाचं आहे. दोघांनाही एकमेकांविषयी आदर व विश्‍वास असेल तर दोघे मिळून कुठल्याही आजाराशी समर्थपणे लढू शकतील.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com