घडण-मंत्र : ये दोस्ती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School Friendship

पहिलीची शाळा सुरू होणे हा मोठा टप्पा ओलांडल्याचा संकेत आहे. पहिली सुरू झाल्यावर अनेक गोष्टी बदलतात. दिवसभराची शाळा, अनेकदा एका जागी बसणे, शाळेत खेळाची वेळ जवळ जवळ नाहीच आणि अभ्यास!

घडण-मंत्र : ये दोस्ती...

- डॉ. भूषण शुक्ल

पहिलीची शाळा सुरू होणे हा मोठा टप्पा ओलांडल्याचा संकेत आहे. पहिली सुरू झाल्यावर अनेक गोष्टी बदलतात. दिवसभराची शाळा, अनेकदा एका जागी बसणे, शाळेत खेळाची वेळ जवळ जवळ नाहीच आणि अभ्यास!

जवळपासचे सगळे मोठे लोक, ‘आता मोठी शाळा...’ असे बोलायला लागतात आणि थांबतच नाहीत. अशा वेळेस आपल्या सारखेच कोणीतरी समदुःखी आणि समकालीन मिळणे ही खरी गरज असते. शाळेत ही संधी मिळते. अगदी सुट्या घरात राहणाऱ्या मुलांनाही शाळेत ही संधी मिळते. आपले नातेवाईक आणि शेजारी नसलेले, आपल्या आणि त्यांच्या आईवडिलांची ओळख नसलेले मूल बोलायला सापडणे ही जगात पाऊल पडल्याची पहिली खूण आहे. पूर्णपणे अनोळखी व्यक्तीशी फक्त एका बाकावर, वर्गात किंवा बसमध्ये शेजारी म्हणून ओळख होणे आणि सहज बोलायला लागणे, समान आवडी-निवडी सापडणे मोठी घटना आहे. आवडते गेम, शो, कार्टून, खेळाडू वगैरेबद्दल गप्पा मारणे आणि हसणे किती मजेचे असल्याचे लक्षात येत नाही, मात्र त्या अनुभवाचा आनंद आणि उत्साह सुंदर वाटतो. मुलगा-मुलगी असा भावही त्यामध्ये येत नाही आणि माझा मित्र-मैत्रीण’ असे एक नवीन नाते नकळत तयार होते. बरेचदा या मैत्रीची ओळख फक्त चेहऱ्याने असते. मित्राचे नाव सुद्धा विचारलेले नसते. नंतर कधी तरी नाव, आडनाव, पत्ता, वगैरे तपशील गोळा केले जातात. ही किती गमतीदार गोष्ट असते, हे खूप नंतर उमजते.

शाळा म्हणजे मित्र-मैत्रिणी!

शाळेत जाण्याचे, शाळा आवडण्याचे खरे कारण मित्र असतात हे मुले अगदी मोकळेपणाने कबूल करतात. अभ्यास, आयुष्याची दिशा, चांगल्या सवयी वगैरे सर्व अर्थ हे मोठ्या माणसांनी लावलेले आहेत. जिथे आपण नियम बनवत नाही, जिथे कुटुंबातली रक्ताच्या नात्याची माणसे नसतात आणि जिथे दिवसाचा खूप वेळ काढावा लागतो ती जागा म्हणजे शाळा. पुढे आपण कितीही मोठे झालो तरी हे गणित बदलत नाही. म्हणजे, एका अर्थाने पुढच्या आयुष्याची तयारीच शाळेत होत असते. या सर्व अनोळखी आणि आपल्या इच्छेशिवाय घडणाऱ्या जगात, आपण बनवलेली मैत्री ही खरी सुखाची, आनंदाची गोष्ट असते. हे शहाणपण बहुतेक लहान मुलांना उपजतच असते. पुढच्या आयुष्यात ही नाती महत्त्वाची असतात आणि त्यांचे महत्त्व वाढतच जाते.

हे महत्त्व आईबाबांनी समजणे गरजेचे आहे. फक्त चांगल्या वाईट सवयींची देवाणघेवाण हा मैत्रीचा उद्देश नाही. आई-बाबांना फक्त तेवढी एकच काळजी असली, तरी ही देवाणघेवाण कोणालाच चुकत नाही. फक्त कुटुंब आणि सवयी या भांडवलावर मैत्री होत नाही आणि टिकत तर मुळीच नाही. त्यामुळे मैत्री ‘घडवून आणणे’ असा नसता उपद्व्याप पालकांनी करू नये.

मैत्रीत पालकांची भूमिका

आईबाबांना हवेसे वाटणारे आणि आवडणारे मैत्र हे मुलांना जात्याच नकोसे वाटतात. त्यामुळे लहान मुलांची मैत्री ही दुरून बघायची गोष्ट आहे. त्यांना खेळायला जागा आणि वेळ उपलब्ध करून देणे एवढेच पुरेसे असते. नात्यात धुसफूस आलीच. त्याबरोबर येणारा राग, दुःख, उद्वेग येणारच. अशा वेळेस सगळे ऐकून घेणारा एक कान लागतो. सगळे ठीक होईल, असे सांगणारा धीराचा आवाजही लागतो. हा धीराचा आवाज होणे हे पालकांचे काम आहे.

मुलांना स्वतःलाच प्रश्न सोडवायचा धीर दिल्यास गोष्टी पटकन सावरतात. मोठी माणसे मध्ये पडल्यास सर्व चिघळते, हा नियम कायम लक्षात ठेवल्यास त्रास वाचतो. मागचे विसरून नाते परत सांधायचे हे जमायला पाहिजे. लहानपणीची मैत्री लाइफ स्किल’ शिकवते. अजून काय पाहिजे चांगल्या बालपणासाठी ? म्हणूनच ‘भूता परस्परे जडो, मैत्र जीवाचे’ असे ज्ञानोबांनी सर्व जगासाठी मागितले आहे.

Web Title: Dr Bhushan Shukl Writes Friendship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :health news
go to top