
सध्या आपण ९-१० वर्षाच्या मुला-मुलींचा विचार करतो आहोत. या वयात जाणवणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची चर्चा करतो आहोत.
घडण-मंत्र : मुलांना मदत
- डॉ. भूषण शुक्ल
सध्या आपण ९-१० वर्षाच्या मुला-मुलींचा विचार करतो आहोत. या वयात जाणवणाऱ्या महत्त्वाच्या बाबींची चर्चा करतो आहोत. ज्या गुणाची फार चर्चा होत नाही, पण तो खूप महत्त्वाचा असतो, तो म्हणजे-स्वयंस्फूर्ती किंवा जबाबदारी. आपल्या आयुष्याशी संबंधित गोष्टी स्वतः जबाबदारीने करणे हा तो गुण.
माणसाचे कुतूहल आणि एखादी गोष्ट जमली की त्याचा स्व-प्रतिमेवर होणारा सकारात्मक परिणाम हे दोन्ही जन्मजात गुण आहेत. याच गुणांचा जन्मभर वाढत जाणारा ताळमेळ हा स्वयंस्फूर्ती म्हणून दिसतो. म्हणजे, स्वतःहून काहीतरी करून पाहिले तर तसे करण्याचा उत्साह आणि कौशल्य वाढत जाते. अनेक पालक मुलांच्या दैनंदिन गोष्टी, शाळेचा अभ्यास, खेळ, छंद, विविध परीक्षा आणि मैत्रीसुद्धा खूप उत्साहाने लढवतात. आपले मूल सगळीकडे चमकावे, शिक्षकांच्या नजरेत राहावे म्हणून ते मुलांना सतत ‘मदत’ करत असतात. सध्याच बघितलेली गंमत म्हणजे सर्व शाळांमध्ये ‘वारी’चा कार्यक्रम नुकताच झाला. यात सर्व तयारी आणि नट्टापट्टा पालकांनी करून दिला आणि लहान मुलांनी फक्त आपली शरीरे पालक आणि शिक्षकांच्या कलाकुसरीच्या हौसेसाठी उपलब्ध करून दिली. याला अनेकजण आपण मुलांच्या वाढीस मदत करतो आहोत, असेही समजण्याची चूक करतात.
मुलांच्या आयुष्याचा ताबा कोणाकडे?
मूल अगदी लहान, म्हणजे ४-५ वर्षाचे असते, तेव्हा त्याला आई-वडिलांच्या या उत्साहाची मजा वाटते. मात्र, ८-९ वर्षानंतर त्याचा परिणाम उलट होतो. प्रत्येक गोष्टीत आई-वडील इतके प्रचंड लक्ष देत राहिले, तर मुले निष्क्रिय होण्याची शक्यता वाढते. आपल्या बाजूने फारसा उत्साह न दाखवता फक्त उपस्थित राहणे एवढेच मुलांकडे शिल्लक राहते. त्या कार्यक्रमात त्यांना स्वतःचा रस राहात नाही. त्यात मिळालेले यश आणि कौतुकही त्यांच्या मनात खोलवर पोहोचून त्याचा स्व-प्रतिमेवर सकारात्मक परिणाम होत नाही. कारण त्या संपूर्ण कार्यक्रमाची त्या मुलाशी नाळच जुळलेली नसते. हे ‘माझे’ आहे असे मुलांना वाटतच नाही. ‘हे आई बाबांचे किंवा शिक्षकांचे आहे,’ असे त्यांना पक्के वाटते आणि त्यांचा उत्साह संपतो. इच्छा उडून जाते.
पालक आणि शिक्षक मात्र, ‘आजकाल सगळं सहज मिळत ना, म्हणून मुलांना काही कशाचे वाटतच नाही,’’ असा सरसकट शिक्का पूर्ण पिढीवर मारून मोकळे होतात.
मला जसे जमेल तसे करू द्या. माझे यश अपयश निदान माझे स्वतःचे असेल असा मुलांचा मूक आक्रोश चालू असतो. तो ऐकायची मोठ्या मंडळींची तयारी आहे का? मग मुले सतत निरुत्साही दिसली तर त्यात दोष कोणाचा? मग, व्हिडिओ गेम एवढा एकच त्यांचा स्वतःचा राहतो कारण तिथे मोठे लुडबूड करत नाहीत.
स्वतःचे अढळ स्थान शोधणारे असे ध्रुव आता घरोघरी दिसताहेत. मदतीच्या गोंडस नावाखाली आपण त्यांचे आयुष्य स्वतःच जगत आहोत का? मुलांच्या आयुष्याचा स्वतःच ताबा घेऊन बसलो आहोत का? हा प्रश्न सर्व पालकांनी स्वतःला विचारावा.
९-१० वर्षाची मुले उत्साहाने मुसमुसलेली असतात. त्यांना स्वतःची कामे, स्पर्धा, परीक्षा यांची जबाबदारी घेण्याचे स्वातंत्र्य मिळाले नाही तर पुढच्या एक दोन वर्षातच कंटाळलेली, फोनमध्ये बुडलेली पौगंडावस्था समोर उभी राहते आणि घरोघरी संघर्ष चालू होतात.
स्वतःचे स्थान शोधताना जग सोडावे लागणाऱ्या ध्रुव बाळाची आणि आपल्या मुलांचे तारुण्य स्वतः उपभोगणाऱ्या ययातीची कहाणी ही पुराणातच राहिलेली बरी. एकविसाव्या शतकातल्या भारतात ती प्रत्येक घरात घडू नये.
Web Title: Dr Bhushan Shukl Writes Help To Childrens
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..