शरद पवारांवर होणारी 'ती' एन्डोस्कोपी म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

शरद पवारांवर होणारी 'ती' एन्डोस्कोपी म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती
शरद पवारांवर होणारी 'ती' एन्डोस्कोपी म्हणजे नक्की आहे तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नागपूर: शरीरातील कुठल्याही रोगांसंबंधीची माहिती घेण्यासाठी आपल्याला आधी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं. डॉक्टरांचा सल्ला घेताना आपल्याला काही गंभीर आजार असल्याची शंका डॉक्टरांना आली तर आपल्याला MRI किंवा X -ray काढण्याचा सल्ला दिला जातो. मात्र अनेकदा शरीरातील काही अवयव या डोही चाचण्यांमधून दिसुन येत नाहीत. यामुळे आपल्या शरीरातीळ समस्येबाबत कळू शकत नाही. अशावेळी डॉक्टर 'एन्डोस्कोपी' करण्याचा सल्ला देतात. आता ही 'एन्डोस्कोपी' म्हणजे नक्की काय  असा प्रश्न  तुम्हाला पडला असेल. 

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही मुंबईतील ब्रीचकँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ३१ मार्चला त्यांच्यावर एन्डोस्कोपी करण्यात येणार आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवार यांच्या  पित्ताशयाची एन्डोस्कोपी करण्यात येणार आहे. मात्र ही एन्डोस्कोपी असते तरी काय? या चाचणीला डॉक्टर इतकं महत्वं का देतात? आणि आपल्याला ही कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. 

'एन्डोस्कोपी' म्हणजे नक्की काय? 

एखादी वस्तू हरवली असेल आणि संपूर्ण घरात शोधल्यानंतरही ती आपल्याला सापडत नसेल तर आपण घरातील कोपऱ्यांमध्ये ती वस्तू शोधू लागतो. मात्र कोपऱ्यांमध्ये अंधार असल्यामुळे आपण मोबाईलचा टॉर्च किंवा मोबाईलच्या कॅमेराची मदत घेतो आणि ती गोष्ट आपल्याला सापडते. अशाचप्रकारे एन्डोस्कोपीमध्ये करण्यात येतं. तुमच्या शरीरातील काही रोगांची, समस्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडून एन्डोस्कोपी केली जाते. 

यात तुमच्या शरीरात दुर्बीण आणि लहान आकाराचा टॉर्च सोडून तुमच्या शरीरातील लहान अवयवांचं निरीक्षण करण्यात येतं. तसंच त्या अवयवांना एकमेकांच्या दूर करून दुर्बिणीच्या साहाय्यानं त्यांची तपासणी करण्यात येते. बदलत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आता डॉक्टरांना आपल्या शरीरातील सूक्ष्म समस्यांची तपासणी करता येणं शक्य झालं आहे.  

पोटविकार, नाक-कान-घशाचे आजार, स्त्रीयांशी संबंधित आजार, मूत्रसंबंधी आजार आणि हृदयासंबंधीच्या आजारांचं निदान करण्यासाठी एन्डोस्कोपी करण्यात येते. 

काय असते एन्डोस्कोपीची प्रकिया?

'एन्डोस्कोपी' मध्ये करताना एक लहान आकाराची लवचिक रबरी नळी तोंडातुन किंवा शरीराच्या इतर भागातून आतमध्ये घातली जाते. या नळीच्या सुरुवातीला एक लहान कॅमेरा आणि लाईट असतो ज्यामुळे डॉक्टरांना आपल्या शरीरातील लहान-सहान अवयवही स्पष्ट दिसतात. ही नळी आणि कॅमेरा शरीरात आतमध्ये घातल्यानंतर कार्बन डायऑक्साईडच्या मदतीनं पोटाला फुगारा दिला जातो ज्यामुळे एकमेकांना चिकटून असलेले अवयव काही प्रमाणात एकमेकांच्या दूर होतात. यामुळे डॉक्टरांना संपूर्ण चिकित्सा करण्यास मदत होते. ही संपूर्ण प्रक्रिया अगदी १०-१५ मिनिटांमध्ये पूर्ण होते. 

एन्डोस्कोपी केव्हा करावी? 

अनेकदा आपल्या शरीरातील अडचण इतकी सूक्ष्म असते की विविध चाचण्या करूनही डॉक्टरांना आपल्या समस्यांचं निदान होत नाही. अशावेळी डॉक्टर एन्डोस्कोपीचा सल्ला देतात. या चाचणीमुळे आपल्या शरीरातील अतिसूक्ष्म अवयांमध्ये असणारे खडे (Stones) किंवा वाढलेलं मास यांसारख्या काही महत्वाच्या समस्या डॉक्टरांच्या निदर्शनास येऊ शकतात. 

एन्डोस्कोपीचे प्रकार कोणते? 

शरीरातील विविध भागांमधील तपासणी करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या एन्डोस्कोपी करण्यात येतात. यामध्ये जठराची एन्डोस्कोपी, लहान-मोठ्या आतड्यांची एन्डोस्कोपी, पित्ताशयाची एन्डोस्कोपी  अशा प्रकारच्या एन्डोस्कोपी करण्यात येतात. जठराची एन्डोस्कोपी करताना तोंडातुन किंवा घश्याच्या भागातून नळी शरीरात घालण्यात येते. तर आतुड्यांच्या एन्डोस्कोपीमध्ये रबरी नाली गुदद्वारातून आतमध्ये घालून तपासणी केली जाते. 

पित्ताशयाच्या एन्डोस्कोपीला ERCP (Endoscopic Retrograde Cholangiopancreatography)  असंही म्हणतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यामध्ये पित्ताशयाची आणि पॅनक्रियाजची तपासणी करण्यात येते. पित्तनलिकेत असणारे खडे या एन्डोस्कोपीच्या माध्यमातून निदर्शनास येतात. अशा खड्यांना शरीराबाहेर काढण्यासाठीही या एन्डोस्कोपीचा वापर केला जातो असं तज्ज्ञ सांगतात. 

डॉक्टरांनी एन्डोस्कोपी सांगितलीये ? 

जर तुम्हालाही डॉक्टरांनी एन्डोस्कोपी करण्याचा सल्ला दिला असेल तर घाबरून जाऊ नका. आम्ही सांगतोय त्या टिप्स लक्षात ठेवा. तुम्ही आता घेत असलेल्याला औषधांबद्दल संपूर्ण माहिती डॉक्टरांना द्या. जर तुम्हाला कुठल्याही औषधांपासून ऍलर्जी असेल तर याबद्दल कल्पना द्या. तसंच एन्डोस्कोपी करण्यासाठी जायचं असल्यास किमान ६-७ तास आधी काहीच खाऊ नका. सर्वात महत्वाचं म्हणजे एन्डोस्कोपीआधी तुमचं ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोलमध्ये तर आहे ना? याची खात्री करून घ्या. 

आजकालच्या काळात तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे एंडोस्कोपीच्या दरम्यान लहान शस्त्रक्रियाही करण्यात येतात. त्यामुळे रुग्णांच्या शरीराला कुठल्याही प्रकारची इजा होता नाही. तसंच एन्डोस्कोपीदरम्यान रुग्णांना कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत त्यामुळे सर्व रुग्ण अगदी निश्चितपणे एन्डोस्कोपी करू शकतात. तुमच्या फायद्याची आणि महत्वाची बाब म्हणजे एन्डोस्कोपी झाल्यानंतर अनेक दिवस भरती राहावं लागत नाही अशी माहिती नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिली आहे.  

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com