esakal | सोडा घाईघाईत जेवण्याची सवय; आरोग्यासाठी हानिकारक
sakal

बोलून बातमी शोधा

घाईघाईत जेवण्याची सवय

सोडा घाईघाईत जेवण्याची सवय; अन्यथा होईल मोठे नुकसान

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : धकाधकीचे जीवन आणि कामाच्या चिंतेमुळे माणसाला निवांतपणे जेवण्यासही पुरेसा वेळ मिळत नाही. धावपळीत भूक लागल्यावर भरभर काहीतरी खाऊन पुन्हा कामाला सुरुवात केली जाते. या सवयीचा परिणाम इतका होतो की एखाद्या दिवशी निवांत वेळ असला तरी जेवण लवकरच आटोपतो. घाईघाईत जेवण करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

धावपळीच्या युगात कसतरी खाणे आटोपण्याकडे आपल्यापैकी अनेकांचा कल असतो. अनेकांना खाणे किंवा जेवणे हे दैनंदिन काम वाटते. बरेचजण खाण्याला दुय्यम महत्त्व देतात. म्हणूनच कामाच्या वेळी किंवा घाई-गडबडीत भराभर खाऊन मोकळे होतात. काहीजण तर अन्न अक्षरशः तोंडात कोंबतात. घास कसाबसा घशाखाली ढकलतात. याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

हेही वाचा: भटकंतीसाठी बीचवर जाताय? अशी घ्या केसांची काळजी

पचनाची क्रिया तोंडात घास असतानाच सुरू होते. घास नीट चावून खाल्ल्यामुळे अन्न पोटात गेल्यावर ते पचनासाठी शरीराला फार कष्ट घ्यावे लागत नाही. भरभर खाल्ल्याने क्रियाच व्यवस्थित होत नाही आणि नीट न चावलेले अन्न पोटात जाऊन तडस लागते. याचा थेट परिणाम आपल्या ऊर्जेवर होतो. खूपदा मरगळल्यासारखं वाटतं, ते यामुळेच. भरभर जेवण्याचा तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, हे आपण जाणून घेऊ या...

याकडे द्या लक्ष

  • भरभर खाणाऱ्यांचे वजन लवकर वाढते

  • खाण्याचा आनंद घेत सावकाश खाणे गरजेचे आहे

  • भराभर खाताना मोठे घास घेतले जातात. यामुळे पोट फुगणे तसेच पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात

  • बकाबका खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढते

  • छोटे घास घेतल्याने सावकाश चावणे जमेल

  • घास पूर्ण गिळला गेल्यानंतरच चावण्याचे थांबवा

  • घास व्यवस्थित चावून पूर्णपणे गिळल्यावरच पुढचा घास घ्या

  • तोंडात घास असताना पाणी किंवा इतर पेय पिऊ नका

  • जेवणात सॅलड किंवा कोशिंबिरीचा समावेश करा. त्यामुळे सावकाश चावून खाण्याची सवय लागेल

हेही वाचा: सारेच झाले सुन्न; आजोबा, तीन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार

पोटाचा अंदाज येत नाही

भरभर खाल्ल्याने शरीरावर हळूहळू परिणाम दिसू लागतात. अचानक वजन वाढणे आणि आरोग्य समस्या डोके वर काढणे हे प्रमाणापेक्षा जास्त जेवण्याची लक्षणे आहेत. घाईघाईत जेवण्यामुळे तुम्हाला तुमच्या पोटाचा नीट अंदाज येत नाही आणि तुम्ही जास्त जेवता.

वजन अति प्रमाणात वाढते

लठ्ठपणा ही मोठी समस्या झाली आहे. घाईघाईत जेवण्यामुळे तुम्ही काय आणि किती खाता यावर जास्त लक्ष केंद्रित केले जात नाही. यामुळे शरीरावर परिणाम दिसू लागतात. अति प्रमाणात चुकीचे पदार्थ नियमित खाण्यामुळे वजन अति प्रमाणात वाढते.

पचनाच्या समस्या होतात निर्माण

अन्न नीट पचण्यासाठी घास बत्तीस वेळा चावून खावा असे सांगितले जाते. मात्र, बत्तीस वेळा कुणाकडे पुरेसा वेळ नाही. यामुळे घाईघाईत जेवण केले जाते आणि अन्न नीट पचत नाही. यामुळे पचनक्रिया बिघडते आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात.

loading image
go to top