सुका मेव्यापेक्षा फायदेशीर गूळ-फुटाणे, फायदे वाचून व्हाल चकित

Jaggery and rhubarb are beneficial for health read full story
Jaggery and rhubarb are beneficial for health read full story

नागपूर : सध्या हिवाळा सुरू आहे. हे दिवस सर्वात आरोग्यदायी मानले जातात. याच दिवसांत आरोग्यदायी खाण्याकडे अनेकांचा कल असतो. सुकामेव्याच्या लाडूचे सेवन याच काळात केले जाते. परंतु, सुकामेव्याचे दर पाहता ते सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसतात. त्यामुळे गूळ-फुटाण्यातूनही शरीराला बरेच काही मिळू शकते. विशेष म्हणजे केवळ हिवाळा नव्हे तर सर्वच ऋतूंमध्ये गूळ फुटाणे खाण्याचे बरेच फायदे आहेत.

हृदयरोग ते हाडं मजबूत करण्यावर रामबाण उपाय म्हणजे गूळ-फुटाणे यांचे सेवन होय. घरात जेव्हा कुणी आजारातून बाहेर पडतं तेव्हा घरातील ज्येष्ठ मंडळी बरेचदा गूळ आणि फुटाणे खाण्याचा सल्ला देतात. एखाद्या व्यक्तीला आजारातून बरे झाल्यानंतर अशक्तपणा जाणवत असेल तर गूळ-फुटाणे खायला देतात. कारण, यामुळे शरीर उत्साही होते.

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फॉस्फरस, कार्बोहायड्रेट आणि इतर अनेक पौष्टिक घटक असतात. गूळ खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता दूर होते. तसेच फुटाण्यांमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट, लोह, व्हिटॅमिन-बी तसेच अनेक घटक असतात. गूळ-फुटाणे शरीरासाठी औषधाचे काम करतात. फुटाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु, भाजलेल्या फुटाण्यांसोबत थोडा गूळ खाल्ल्यास ते शरीरासाठी औषध म्हणून कार्य करते आणि शरीराला बरीच पोषकद्रव्ये प्रदान करते.

गूळ आणि फुटाणे दररोज काही प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे बऱ्याच गंभीर आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. विशेष म्हणजे महिलांसाठी गुळ व फुटाणे अमृत मानले जाते. कारण, अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता आढळते. मासिक पाळीमुळे स्त्रियांमध्ये ही एक सामान्य समस्या आहे. बाळांतपणामुळे स्रियांच्या शरीराला हिमोग्लोबीनची गरज भासते. अशा परिस्थितीत शरीरात हिमोग्लोबीनची मात्रा पूर्ण करण्यासाठी त्यांनी दररोज गूळ व फुटाणे खाणे गरजेचे आहे.

गूळ-फुटाणे लोह आणि प्रथिने यांचे उत्कृष्ट संयोजन आहे. लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात फुटाणे आणि गुळामध्ये आढळते. प्रथिने शरीरात नवीन पेशी तयार करण्यात मदत करतात आणि गूळ शरीरात ऊर्जा प्रदान करतो. ज्यामुळे शरीरात ऊर्जा स्थिर राहते. शरीर कमकुवत होत नाही आणि दैनंदिन कामातही आनंद उत्साह असतो.

हाडे होतात मजबूत

हाडे मजबूत करण्यासाठी दररोज मूठभर फुटाणे आणि गूळ खावा. वयाच्या चाळिशीनंतर शरीरातील हाडे कमकुवत होऊ लागतात. हेच कारण आहे की, शरीरात जोड भागाशी संबंधित वेदनादेखील सुरू होतात. हे टाळण्यासाठी गूळ आणि फुटाणे यांचे दररोज सेवन करावे. याशिवाय गूळ-फुटाणे हृदय निरोगी ठेवते.

रोगप्रतिकारक शक्ती होते मजबूत

गूळ-फुटाणे पोटॅशियमने समृद्ध आहेत. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो. याशिवाय गुळ-फुटाणे शरीरातील वाढते वजन नियंत्रित करतात. याच्या सेवनाने शरीरात चयापचय वाढतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील मजबूत राहते. अपचनामुळे बहुतेक लोकांना बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि गॅससारख्या पोटाच्या समस्या उद्भवतात. पोटाच्या सर्व समस्यांमध्ये आपण गूळ आणि फुटाणे खाल्ल्यास या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते. यामुळे पचनक्रियादेखील सुधारते.

संकलन - अतुल मांगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com