खेलेगा इंडिया - लोक व्यायाम का सोडतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यायाम

खेलेगा इंडिया - लोक व्यायाम का सोडतात?

महेंद्र गोखले

नवीन व्यायाम ‘करू इच्छिणारे’, त्यांच्या नवीन वर्षाच्या संकल्पाच्या दोन आठवड्यांच्या आतच त्यांचे व्यायामाचे नित्यक्रम सोडून देतात. लोकांचा हेतू प्रामाणिक असतो. वर्कआउट प्लॅन नेटाने सुरू करायचा त्यांचा निर्धार देखील असतो. व्यायाम सुरू करण्यासाठी भरपूर खरेदी करतात परंतु तरीही ते व्यायाम मध्येच सोडून देतात. व्यायाम आणि फिटनेस सोडून देण्याच्या कारणांवर सामाजिक आणि आरोग्य मानसशास्त्रामध्ये संशोधन केले गेले आहे.

व्यायाम सोडण्याची कारणे

१. वेळ नाही

सामान्य कारणांपैकी एक म्हणजे ‘माझ्याकडे वेळ नाही.’ व्यायामाची वेळ आणि इतर कामाच्या वेळा यामध्ये निवडायची ‘वेळ’ येते. लोक संध्याकाळी तासन् तास टीव्ही पाहण्यासाठी वेळ काढतात. त्यामुळे त्यांना हवे असल्यास व्यायामासाठी दिवसातून ४५ मिनिटे नक्कीच काढू शकतात.

उपाय

सबबींना थारा न देणे.

आधी वर्कआउट्स शेड्यूल करा.

ते म्हणजे जणू काही डेंटिस्टला दिलेली वेळ आहे असे समजा.

आदल्या दिवशीच याची तयारी करा.

२. लवकर रिझल्टची अपेक्षा

तुम्हाला वजन लवकर कमी होण्याची अपेक्षा असेल आणि ते होत नसल्यास फिटनेसचे रुटीन बंद कराल. तुम्‍हाला स्‍नायू वेगाने बळकट होण्याची अपेक्षा पूर्ण होत नसल्यास‍ही फिटनेस कार्यक्रम मध्येच सोडून द्याल.

उपाय

स्मार्ट उद्दिष्टे ठरवा.

ती विशिष्ट, मोजण्यायोग्य, प्राप्त करण्याजोगी, वास्तववादी आणि वेळेनुरूप असावीत.

ट्रेनरकडून तुमच्या उद्दिष्टांबद्दलचा फीडबॅक वेळोवेळी घेत राहा.

३) चुकीच्या प्रकारची प्रेरणा

फिटनेस प्राप्त करण्यासाठीची प्रेरणा ही व्यक्तीला स्वतःच्या मनाने निर्णय घेण्याने आणि आतून आलेल्या भावनेतूनच झाल्यास ती दीर्घकाळ टिकते. फिटनेस प्राप्त करण्याचे ते एक प्रभावी साधन आहे. व्यायामाचा निर्णय लाज वाटते म्हणून किंवा अपराधीपणा वाटतो म्हणून करत असल्यास ती बाह्यप्रेरणा आहे. त्यामुळे तुम्ही सुरुवात केलीत तरी सातत्य टिकवून ठेवू शकाल असे नाही. उपाय

तुमची प्रेरणा काय आहे ते शोधा.

आरोग्यासाठी आणि शारीरिक व्यायामामुळे चांगली जीवनशैली प्राप्त करता येते याबद्दल स्वतःची खात्री करून घ्या.

तुमचे लक्ष व्यायामातून मिळणाऱ्या आनंदावर आणि त्यातून होणाऱ्या सकारात्मक बदलांवर केंद्रित करा.

४) वेदनांची भीती

व्यायाम सोडण्यामध्ये दुखापतीची भीती हे एक कारण असू शकते. केवळ गुडघेदुखीमुळे लोक व्यायाम पूर्णपणे बंद करतात. खरंतर त्यांनी पर्यायी व्यायाम किंवा रिकव्हरीसाठी व्यायाम केला पाहिजे.

उपाय तुम्हाला आवडणारा व्यायाम निवडा.

दुखापत टाळण्यासाठी वॉर्म अप आणि कूल डाउन कसे करावे ते शिका.

चांगला फॉर्म आणि पोश्चर घेऊन व्यायाम कसा करायचा ते शिका

५) पाठिंब्याचा अभाव

अनेक अभ्यास असेही दर्शवितात की एखाद्या महत्त्वाच्या किंवा जवळच्या मित्राकडून पाठिंबा मिळाला नाही तरीदेखील व्यायाम सोडून देण्याकडे लोकांचा कल असतो.

उपायमित्र आणि कुटुंबीयांना शारीरिक आरोग्याबद्दलचे तुमचे विचार समजावून सांगा.

तुमच्याबरोबर व्यायाम करण्यासाठी मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना सहभागी व्हायला प्रवृत्त करा.

सकाळच्या वेळेचे मित्र वाढवा आणि संध्याकाळचे मित्र कमी करा.

फिटनेस प्रोग्रॅम कधीही अर्धवट सोडू नये.

६) काय कराल?

तुमचा दृष्टिकोन आणि प्रेरणा स्थान तपासून बघा. आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या कल्याणासाठी आपण व्यायाम करत आहोत हे स्वतःशी कबूल करा.

सामाजिक पाठिंबा आणि ट्रेनरच्या अभिप्रायाने आपली भावना दृढ करा.

एक विशिष्ट ट्रेनिंग प्रोग्रॅम सेट करा.

Web Title: Khelega India Why Do People Quit Exercising

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..