हसण्यासाठी जगा : हास्याच्या नवचैतन्यानं, फुलवू आनंदाची बाग!

लहानपणापासून आपल्याला ‘माझं- तुझं’ शिकवलं जातं. माझ्या वस्तू, माझे विचार, माझी माणसं यांना लोकं सतत जपण्याचा प्रयत्न करतात. त्यातलं काहीही हरवलं तरी आपण शोधत राहतो.
Laughing
LaughingSakal

लहानपणापासून आपल्याला ‘माझं- तुझं’ शिकवलं जातं. माझ्या वस्तू, माझे विचार, माझी माणसं यांना लोकं सतत जपण्याचा प्रयत्न करतात. त्यातलं काहीही हरवलं तरी आपण शोधत राहतो.

तुम्ही एखाद्या ठिकाणी कामासाठी जाता. त्या ऑफिसमध्ये तीन-चार ठिकाणी तुम्हाला जावं लागतं.  काम संपवून तुम्ही गाडीपाशी येता.  खिशात हात घातल्यावर किल्ली सापडत नाही. त्यानंतर संपूर्ण बिल्डिंगभर तुम्ही किल्ली शोधत फिरता,  कारण किल्ली सापडली नाही तर तुमचं ‘अडणार’ असतं.  किल्ली हरवल्यानंतर कोणीही ‘हरवली तर हरवू दे’ असं म्हणून शांत बसत नाही.

महिला लग्नसमारंभात जातात.  दुसरी एखादी महिला तिला म्हणते, ‘अगं, आज काय एकच कानातलं घातलंस?’ तिचा हात नकळत कानाकडं जातो.  लक्षात येतं गडबडीमध्ये ‘हिऱ्याचं’ कानातलं पडलंय.  त्यानंतर ते  सापडवण्यासाठी प्रचंड धावपळ सुरू होते,  कारण ते ‘मौल्यवान’ असतं. हिऱ्याची कुडी हरवल्यानंतर कोणीही ‘हरवली तर हरवू दे’ असं म्हणून शांत बसत नाही.

जवळच्या व्यक्तीचं निधन होतं. मन ते स्वीकारत नाही. अस्वस्थ होतं. पुढं अनेक वेळा विविध प्रसंगात आपण त्या व्यक्तीला मनानं शोधत राहतो. ‘हरवलेल्या’मुळं तुमचं अडणार असेल, ते मौल्यवान असेल तर तुम्ही शोधत राहता!

जगामध्ये अनेक ‘सर्व्हे’ करण्यात आले आहेत. त्यात लक्षात आलं, की लहानांपासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना हवा आहे तो ‘आनंद’! तो त्यांना ‘मौल्यवान’ आहे. ‘हास्या’तून व्यक्ती ‘आनंद’ व्यक्त करत असते. ‘लहानपणी आम्ही खूप आनंदात होतो,’ असं लोकं सांगतात. त्याचाच अर्थ ते ‘लहानपणी खूप हसत होतो,’ असाही होतो. लहान मुलांना शाळेमध्ये ‘हसू नकोस!’ असं सांगतात.  याऐवजी ‘केव्हा हसावं , कसं हसावं, किती हसावं, कोणत्या कारणासाठी हसावं, तसंच कोणाला हसू नये,’ हे शिकवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लहानपणापासून ‘हसणं मौल्यवान’ आहे, याचा संस्कार मनावर होणं महत्त्वाचं आहे. लहानपणी दिवसातून दोनशे ते पाचशे वेळा हसणारे मोठेपणी कमी हसायला लागतात. मोठी माणसं दिवसातून जास्तीत जास्त पाच ते दहा वेळेला स्मित हास्य करतात. लहान मुलासारखं खळखळून पोटातून हसणं क्वचितच करतात. ‘माणसाचं वय वाढतं म्हणून हसणं कमी होत नाही तर हसणं कमी होतं म्हणून वय वाढतं!’  हसणं गमावलेल्या अनेकांना ताणतणावाशी संबंधित आजार, जसे की, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, नैराश्य आदी निर्माण व्हायला लागतात. या सगळ्याचं मूळ कारण म्हणजे आपण हसणं गमावत आहोत.  एखादी वस्तू हरवली तर आपण अस्वस्थ होतो, शोधत राहतो.  पण आपल्या आयुष्यातील अत्यंत मौल्यवान, ‘हसणं हरवलं’ आहे. ते आता शोधायची वेळ आली आहे. 

‘हसणारे वेडे नसतात, तर न हसून लोकं ‘वेडेपणा’ करतात!’ सकारात्मक मानसिकतेसाठी हसणं हा ‘मनाचा व्यायाम’ आहे.  वारंवार हसून हसून आपण आपल्या अंतर्मनाला सकारात्मक राहण्याचं ट्रेनिंग देतो.  यासाठी आता हास्यक्लब सुरू झाले आहेत. ‘हास्ययोगा’मुळे लाखो लोकांना शारीरिक व मानसिक फायदे झालेले आहेत. हास्यक्लबमध्ये विशिष्ट पद्धतीचा वापर करून खेळकरपणे हसणं लांबवलं जातं. या व्यायामाच्या हास्यामुळं आपलं गमावलेला हास्य पुन्हा सापडतं. ‘न वापरल्यानं शेपटी गळून गेली’ असं म्हणतात. आता ‘न वापरल्यानं हास्य संपून गेलं!’ असं होऊ नये याची आपण काळजी घेऊया.

येत्या ‘रविवारी जागतिक हास्यदिन’ आहे.  चला तर, हास्याच्या नवचैतन्यानं आनंदाची बाग  फुलवूया!!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com