
हसण्यासाठी जगा : ‘हास्याचं बटन, प्रकाशमान मन’!
शरीर आणि मनाचं स्वास्थ्य राखण्यासाठी आता प्रत्येक जण धडपडतो आहे. जगण्याच्या गाडीची ‘मोबिलिटी’ आता फक्त ‘इम्युनिटी’च्या दिशेने जाताना दिसत आहे. सकारात्मक मन करण्यासाठी ‘हास्ययोग’ ही एक विलक्षण पद्धती आहे. या पद्धतीचं मूळ ‘विनाकारण हसा, व्यायामासाठी हसा’ या संकल्पनेवर आधारित आहे. बहुसंख्य लोकांच्या मनामध्ये विनोद नसताना हसणं म्हणजे ‘खोटं हसणं’ असा समज लपलेला आहे. विनोदाशिवाय हसणं अनैसर्गिक, असाही समज आहे. शरीर, मनाचा व्यायाम करणं हे हास्ययोग करण्याचं कारण आहे. आपल्या आयुष्यातील खालील घटना ‘ डोळस’पणे पाहिल्यास नवा दृष्टिकोन देतील.
एखादी व्यक्ती ताकद कमवण्यासाठी हजारो रुपये भरून ‘जिम’मध्ये जाते. तिथं वजन उचलते. त्याच्या दंडात ताकद येते, पण एखादी व्यक्ती ‘मार्केट यार्ड’ मध्ये हमाल म्हणून काम करते. धान्याची पोती दररोज उचलून, कधी दुकानात तर कधी ट्रकमध्ये टाकते. त्या व्यक्तीच्या दंडातील ताकद ‘नकळतपणे’ वाढलेली असते. शरीर ‘मशिन’ आहे. ‘जिम’मध्ये गेला किंवा नाही गेला तरी कळत नकळत सातत्यानं वजन उचलण्याचं काम केलं तर ताकद वाढतेच.
फार पूर्वी जंगलामध्ये राहणारा माणूस शिकारीसाठी पळायचा. नकळतपणे त्याच्या फुफ्फुसांची क्षमता वाढायची. सध्याच्या काळात शहरात राहणारा माणूस कधी शिकारीसाठी पळत नाही, तर मैदानात जाऊन पळतो. ‘शिकारीसाठी पळणं म्हणजे खरं पळणं आणि मैदानातून जाऊन पळणं हे खोटं पळणं,’ असं आपण म्हणत नाही. कारण मैदानात जाणारी व्यक्ती व्यायाम करण्यासाठी पळत आहे, हे आपण ‘सामाजिक दृष्ट्या स्वीकारलं’ आहे.
भूक लागल्यावर खाणं नैसर्गिक आहे, पण भूक नसताना घरामध्ये उठसूट कपाट उघडून, डबे उघडून खाणारे अनेक लोकं असतात. ‘भूक असताना खाल्लं तर ते मी पचवणार. पण भूक नसताना खाणं हे अनैसर्गिक खाणं, त्याला मी पचवणार नाही,’ असं शरीर म्हणत नाही. कारण शरीर ‘मशिन’ आहे. ते त्याचं काम करतंच.
लग्नसमारंभात स्वागतासाठी लोक दरवाजात उभी असतात. ओळखीच्या व्यक्तीनं स्वागत केलं तर आनंद वाटतोच, पण अनोळखी व्यक्तीनं स्वागत केलं तरी समोरच्याला बरं वाटतं. कारण ‘कोणीतरी स्वागत करत आहे,’ हे मनाला समाधान देतं.
हेही वाचा: IPL 2021 : बायो-बबलचा फुगा फुटला; या हंगामाचा 'खेळ खल्लास'
हास्ययोगात करत असलेल्या हास्याच्या व्यायामाचा वरील उदाहरणांच्या दृष्टिकोनातून विचार करता, काही मुद्दे लक्षात येतील.
शरीर ‘मशिन’ आहे. विनोदासह हसलो किंवा विनोदाशिवाय हसलो, तरी हसण्यामुळं निर्माण होणारे शारीरिक अथवा मानसिक पातळीवरील फायदे मिळतातच.
पळणं, पोहणं, चालणं, वजन उचलणं या गोष्टी व्यायाम म्हणून सामाजिक दृष्ट्या स्वीकारल्या आहेत. ‘जे स्वीकारलं जातं ते नैसर्गिक वाटतं!’ गेल्या पंचवीस वर्षांत हास्यामुळं लोकांना होणारे अनेक फायदे संशोधनाने सिद्ध झाले आहेत. आता तर डॉक्टर मंडळीसुद्धा ‘हास्यक्लबला जा,’ असं सांगतात. त्यामुळं हास्यक्लबमध्ये जाऊन ‘हसण्याचा व्यायाम’ करण्यात येतो, हे सामाजिक दृष्ट्या स्वीकारण्याची वेळ आली आहे.
हास्यामध्ये मनातील नकारात्मकतेचा निचरा करण्याची विलक्षण ताकद आहे. तुम्ही सकारण हसा किंवा व्यायामासाठी हसा, मनातील नैराश्याचा निचरा होतोच.
थोडक्यात सूर्यकिरणांचा प्रकाश म्हणजे नैसर्गिक प्रकाश आणि ‘ट्यूब’चा प्रकाश म्हणजे अनैसर्गिक प्रकाश, असं म्हणून कोणी रात्री अंधारात बसत नाही. कारण ‘प्रकाश’ महत्त्वाचा! तितकंच जगण्यासाठी ‘हास्य’ महत्त्वाचं! म्हणूनच मनाच्या गाभाऱ्यातील नैराश्याचा अंधार घालवण्यासाठी हास्याचं बटन दाबून आपण प्रकाश निर्माण करूया!!!
Web Title: Makrand Tillu Writes About Live To Laugh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..