हसण्यासाठी जगा : हसऱ्या चेहऱ्याची ‘इमोजी’!

मकरंद टिल्लू
Tuesday, 19 January 2021

आम्ही एकदा ग्रुपने विनोदी नाटक बघायला गेलो होतो. करड्या व्यक्तिमत्त्वाची एक ज्येष्ठ व्यक्ती ग्रुपमध्ये नव्याने सहभागी झाली होती. नाटकादरम्यान लोक हसून हसून खुर्चीवरून पडत होते.
...पण हे गृहस्थ गंभीरपणे बसले होते.

आम्ही एकदा ग्रुपने विनोदी नाटक बघायला गेलो होतो. करड्या व्यक्तिमत्त्वाची एक ज्येष्ठ व्यक्ती ग्रुपमध्ये नव्याने सहभागी झाली होती. नाटकादरम्यान लोक हसून हसून खुर्चीवरून पडत होते.
...पण हे गृहस्थ गंभीरपणे बसले होते.

नाटक संपल्यानंतर न राहवून मी विचारलं, ‘तुम्हाला  नाटकादरम्यान हसू नाही का आलं?’
ते त्याच गंभीर चेहऱ्यानं म्हणाले, ‘हसत होतो ना!’
मी म्हणालो, ‘सर्वसाधारणपणे हसताना  गालाचे उंचवटे वर येतात, घशातून थोडा आवाज येतो. तुमच्या  बाबतीत असं काहीच घडत नव्हतं.’
ते म्हणाले, ‘लहानपणापासून आमच्या घरचं वातावरण एकदम शिस्तीचं! हसलं तर  ‘शिस्तभंगाची कारवाई व्हायची. मोठेपणी ऑफिसमधील  वातावरण, तसंच होतं! त्यामुळं माझ्या गालांना वरती यायची सवयच नाही !!!’
मनात येणाऱ्या विविध भावना व्यक्त  करण्याचं काम चेहरा करतो. ‘कॅटेगरी थेअरी’नुसार आपल्या भावना मूलभूत सहा प्रकारांतून व्यक्त होतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आनंद, दुःख, राग, भीती, किळस आणि आश्चर्य! जातपात, पंथ, प्रांत यांपलीकडे जाऊन  सर्व माणसं या भावना व्यक्त करत असतात. हास्यातून आनंदाची भावना व्यक्त होत असते. लहान मूल दिवसातून २०० ते ३०० वेळा हसते, तर मोठेपणी माणूस दिवसातून जास्तीत जास्त चार ते सतरा वेळा हसतो. हसऱ्या आनंदी मुलांना लहानपणापासून,  ‘हसू नकोस. दात काय काढतोस? गप्प बैस!’’ असं सांगून, लांबट आणि आंबट चेहऱ्याची माणसं आपण तयार करायला सुरुवात केली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकारात्मक भावनांची अभिव्यक्ती महत्त्वाची आहे. याचसाठी ‘टेक्स्ट मेसेज’ खूपच ‘ड्राय’ वाटतात, म्हणून भावना व्यक्त करायला ‘इमोजी’ आल्या. त्यातून मोबाईलवरील संवाद ‘जिवंत’ झाला! आता गंभीर चेहऱ्याऐवजी ‘हसणं’  गांभीर्याने घेऊया! आपणही आपल्या चेहऱ्यावर हसऱ्या चेहऱ्याची ‘इमोजी’ वापरायला सुरुवात करूया! यासाठी इतरांनी आपल्याकडं पाहण्याऐवजी कधीतरी स्वतःच स्वतःच्या चेहऱ्याकडं बघूया! चेहऱ्यावरची आनंदाची मुलभूत भावना, ‘आयसीयू’मध्ये तर गेली नाही ना, हे चेक करूया! 

...आणि गालांचे  उंचवटे वर घेत हास्याचा ‘ऑक्सिजन’ देऊन जगण्याला संजीवनी देऊया!!!
(लेखक एकपात्री कलाकार व लाफ्टर योगा ट्रेनर आहेत.)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Makrand Tillu Writes about Smiling face emoji