माय फिटनेस  : इस ‘फिटनेस’में क्या बा! 

manoj-bajpayee
manoj-bajpayee

मनोज वाजपेयी हा हिंदी चित्रपटसृष्टीतील चतुरस्र अभिनेता. ‘सत्या’मधील भिकू म्हात्रे या भूमिकेमुळं तो घराघरांत पोचला आणि त्यानंतरही त्यानं अनेक दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांना खूष केलं. लॉकडाउनच्या काळात त्याची अमेझॉन प्राईमवरील ‘अ फॅमिली मॅन’ ही वेबसिरिजही गाजली. मनोज वाजपेयी सध्या चर्चेत आहे त्याच्या स्थलांतरितांचं दुःख आणि समस्या मांडणाऱ्या ‘बंबई मी का बा’ या पॉप गाण्यामुळं.

आपल्या ‘एनएसडी’मधील दिवसांत लोकसंगीतातील गाणी गाणाऱ्या मनोजनं प्रथमच अल्बमसाठी गाणं गाण्याचा प्रयोग केला आहे. आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यानं स्थलांतरितांचा प्रश्‍न ऐरणीवर आणला आहे. अभिनय आणि आवाजाबरोबरच मनोज आपल्या फिटनेसबद्दलही तेवढाच जागरूक असतो. ‘‘मी दररोज जिममध्ये जाऊन सिक्स पॅक ॲब्ज विकसित करण्यापेक्षा दररोज भरपूर व्यायाम आणि आहारावर लक्ष केंद्रित करण्यास प्राधान्य देतो. सुदृढ आयुष्य हेच माझे ध्येय आहे,’’ असे मनोज सांगतो. मनोज गेली ३० वर्षे सातत्याने मोठ्या पडद्यावरच बिझी कलाकार आहे आणि त्यानं नुकतीच वयाची पन्नाशीही ओलांडली आहे. मात्र, त्याच्या देहयष्टीमध्ये कोणताही बदल झाल्याचे दिसून येत नाही. याबद्दल तो म्हणतो, ‘‘मी सेटवर वा घरी आराम करीत असतानाही व्यायामाचा कधीही कंटाळा करीत नाही. दररोजच्या व्यायामाबरोबरच पौष्टिक व प्रमाणात जेवणावर माझा विश्‍वास आहे. माझ्या फिटनेसचे हेच सर्वांत मोठे रहस्य आहे.’’ मनोजचा फिटनेस फ्रिक असल्याचे त्याला ओळखणाऱ्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, स्वतःबरोबर घरच्यांनाही पौष्टिक आहार मिळावा म्हणून थेट स्वयंपाक घरात प्रवेश करून हेल्दी डिश बनवतो, हे खूप थोड्यांना माहिती आहे. मनोजनं पत्नी नेहाकडून काही योगासने शिकून घेतली असून, दोघे मिळून रोज त्याचा सरावही करतात. याद्वारे शारीरिक व मानसिक संतुलन प्राप्त करण्याचा आमचा उद्देश असतो, असे तो सांगतो. मनोजला सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकारही आवडतो व तो शाळेत असल्यापासून त्याचा सराव करीत आहे. ‘‘जीममध्ये मेहनत करणे हा फिटनेसचा एकमेव मार्ग नाही. अभिनेता असल्यानं मला फिटनेसकडं अधिक लक्ष द्यावं लागतं व मी त्यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येकानंच आपल्या फिटनेसबद्दल आग्रही असावं, असं मला वाटतं,’’ असा सल्ला मनोज आपल्या चाहत्यांना देतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com