कोरोनावर होमिओपॅथी उपचार ठरू शकते प्रभावी : तज्ज्ञांचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

केवळ होमिओपॅथीद्वारेच उपचार करावे, असे आमचे मत नाही. मात्र, कोरोनाग्रस्त रुग्णावर ऍलिओपॅथीतील जे उपचार सुरू आहेत, त्यांच्यासोबत समांतर म्हणून होमिओपॅथी प्रभावी ठरू शकेल. विख्यात तज्ज्ञ डॉ. राजन शंकरन यांनी व होमिओपॅथीचे अभ्यासक तथा उद्योजक राजीव बजाज यांनीही या पॅथीचे महत्त्व विशद केले आहेच, त्याचा सरकारने सकारात्मक विचार करावा. 
- डॉ. विलास महाजन 

जळगाव: जगभरात लाखोंना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या कोरोनावर आजपर्यंत लस, औषधी विकसित होऊ शकलेली नाही. तरीही, लक्षणांनुसार उपचार होत असून त्यातून अनेक रुग्ण बरेही होत आहे. याच आधारे व्यक्ती व त्यातील लक्षणपरत्वे उपचारास प्राधान्य असलेली होमिओपॅथी कोरोनाविरुद्धच्या लढ्यात प्रभावी पर्यायी उपचार म्हणून यशस्वी ठरू शकते, असा दावा जळगावातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. विलास महाजन यांनी केला आहे. 

कोरोनावरील लसीच्या संशोधनाला अद्याप यश आलेले नाही. तरीही या संसर्गजन्य रोगाच्या लक्षणांचे स्वरूप पाहून रुग्णावर उपचार केले जात आहेत. याच पद्धतीने काही रुग्ण बरेही होत असून भारतात अशा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. असे असले तरी, या उपचारांपेक्षाही प्रभावी उपचार झाल्यास कोरोना संसर्गाचा मृत्यूदर आणखी घटेल. आणि त्यासाठीच देशभरातील तज्ज्ञ होमिओपॅथीचा पर्याय सातत्याने सुचवीत आहेत. 

लक्षणांवरुन उपचार 
मुळात, होमिओपॅथीत कोणत्याही रोगावर एकच निश्‍चित असे औषध नसते. या पॅथीतील औषधी रुग्ण, त्या रुग्णाची प्रकृती, रोगाचे स्वरूप, त्याची लक्षणे यानुसार दिली जातात. सध्या कोरोनावरील लस नसली तरी ऍलिओपॅथीत त्यातील लक्षणांनुसार उपचार केले जात आहेत. व्यक्तीपरत्वे लक्षणे बदलू शकतात, म्हणून त्या रुग्णातील लक्षणे पाहून योग्य औषध निवडून ते रुग्णाला दिले जाऊ शकते. एकीकडे ऍलिओपॅथीचे उपचार सुरू ठेवावेत, त्याला समांतर होमिओपॅथीतील औषधींचे डोसही रुग्णाला द्यावे. त्यातून निश्‍चितच सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्‍वास डॉ. महाजन यांनी व्यक्त केला. 

प्रतिकारशक्ती वाढीवर भर 
विशेष म्हणजे होमिओपॅथी अशाप्रकारच्या विषाणूजन्य रोगावरील नियंत्रणासाठी (viral infection) रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. कोरोना संसर्गावर उपचार करताना नेमकी हीच पद्धती वापरणे योग्य ठरेल. होमिओपॅथीत रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी ठराविक औषधी आहेच. 

स्वाईन फ्ल्यू, चिकुन गुनियात प्रभाव सिद्ध 
विषाणूजन्य रोगांवर होमिओपॅथीने प्रभावी उपचार केल्याच्या उदाहरणादाखल डॉ. विलास महाजन यांनी स्वाईन फ्ल्यू, चिकुन गुनियासारख्या रोगांचा उल्लेख केला. या रोगांनी पीडित रुग्णांवर ऍलिओपॅथीनुसार उपचार झाले. मात्र, त्यानंतरही काही रुग्णांमध्ये त्याचा त्रास कायम होता. तेव्हा अनेक रुग्णांना आम्ही होमिओपॅथीतील ठराविक औषधी दिल्यानंतर हे उपचार अत्यंत प्रभावी ठरल्याचे अनुभवास आले, असे डॉ. महाजन यांनी सांगितले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Homeopathic remedies for corona can be effective