
आपण गेल्या आठवड्यात अष्टांगयोगाच्या सातव्या अंगाची, अर्थात ‘ध्याना’ची ओळख करून घेतली. आज आठव्या आणि अखेरच्या अंगाची म्हणजे ‘समाधी’ची माहिती घेऊया.
योग- जीवन : सेतुबंध सर्वांगासन
- मुकुंद मावळंकर, अय्यंगार योग शिक्षक
आपण गेल्या आठवड्यात अष्टांगयोगाच्या सातव्या अंगाची, अर्थात ‘ध्याना’ची ओळख करून घेतली. आज आठव्या आणि अखेरच्या अंगाची म्हणजे ‘समाधी’ची माहिती घेऊया. अय्यंगार गुरुजींनी समाधीला योग कल्पतरूच्या फळांची उपमा दिली आहे. समाधी हे सातत्यपूर्वक वर्षानुवर्षे केलेल्या तपश्चर्येचे फळच आहे. पण हे फळ सगळ्यांनाच मिळत नाही.
समाधी हे योगतपश्चर्येचे ध्येय आहे. या स्थितीत साधकाला परमात्म्याचे दर्शन होते आणि त्याचे चित्त परमात्म्यामध्ये विलय पावते. एका अर्थी आत्मा आणि परमात्मा एकरूप होतात. साधकाचे जीवन सार्थक होते. गीताताई अय्यंगार यांनी त्यांच्या ‘शांती योग’ या पुस्तकात समाधीची स्थिती सुरेख समजावली आहे. त्या म्हणतात, ‘‘समाधी एका बैठकीत सिद्ध होत नसते. त्याचे सबीज समाधी, निर्बीज समाधी आणि धर्ममेघ समाधी हे प्रकार आहेत. हे तिन्ही टप्पे एकानंतर एक असे लगेच गाठता येत नाहीत. दरेक टप्पा गाठल्यानंतर विराम घ्यावा लागतो. याला ‘विरामप्रत्यय’ म्हणतात. हे सगळे समजण्यास अवघड तर आहेच, पण आपण फक्त एवढेच समजून घेऊयास की पहिल्या सात अंगांच्या अभ्यासाच्या कठोर तपश्चर्येनंतर आत्मसाक्षातकार होतो आणि त्याच्या शिवाय परमात्माचा साक्षात्कार होत नाही. समाधीचा शेवटचा टप्पा म्हणजेच परमात्म्याचा साक्षातकार. हेच आहे योगाचे ध्येय. अशा प्रकारे आपण सर्व आठ अंगांची थोडी माहिती करून घेतली.
आसनाची कृती
आता वळूया आजच्या आसनाकडे. हे आहे सेतुबंध सर्वांगासन. सेतू म्हणजे पूल. या आसनाचा अविष्कार पुलासारखा दिसतो, म्हणून सेतुबंध. हे आसन सालांब सर्वांगासनातून हाताच्या आधाराने मागे पडून कराचे असते. ते अवघड आहे.
जमिनीवर एक लोड आडवा ठेवा. त्याच्यावर बरोबर मध्ये दुसरा लोड ठेवा. दोघांची काटकोनात फुली झाली पाहिजे. लोडाकडे पाठ करून वरच्या लोडच्या एका टोकावर बसा.
आता हातांचा आधार घेत, पाठीचा एक-एक कणा लांब करीत लोडावर आडवे व्हा. पाय वाकलेलेच असूद्या. डोके व खांदे जमिनीवर येईपर्यंत डोक्याकडे घसरत राहा. आता डोके जरासे उचलून हातांनी मान लांब करून डोके परत जमिनीवर ठेवा.
एकानंतर एक पाय लांब करा. पाय जुळवून ठेवा. हात शरीरापासून बाजूला लांब सरळ करा. तळहाताची मागची बाजू जमिनीवर टेकवा. संपूर्ण हात काखेपासून आतून बाहेर फिरवा, जेणे करून दोन्ही अंगठे जमिनीला टेकलेले असतील. यामुळे काखा मोकळ्या होतात आणि छातीच्या बाजूच्या कडा रुंदावतात. या स्थितीत खोल श्वास घेत २ मिनीटे थांबा. हे आहे सेतुबंध सर्वांगासन.
डोके मागे फेकले जात असल्यास डोक्याखाली आणि दोन्ही खाद्यांखाली ब्लॅंकेटची घडी ठेवा. कंबरेवर ताण येत असल्यास टाचांखाली लोड किंवा उशी ठेवा. हे केल्याने पाय उचललेले राहतील आणि पाठीचा ताण निघून जाईल.
आसनातून बाहेर येण्यासाठी पाय वाकवा. शरीराला डोक्याकडे रेटा. पूर्ण पाठ आणि नितंब जमिनीवर आले पाहिजे. आता उजव्या कुशीवर वळा. उजव्या दंडावर डोके ठेवा. त्यानंतर जमिनीकडे बघत वरती येऊन बसा.
या आसनात पाठीच्या पूर्ण कण्याला आधार मिळतो. छाती लांब होऊन गोलाकार रुंदावते. आत्मविश्वास वाढतो. श्वसनक्रिया सुधारते. डोके छातीपेक्षा खाली असल्यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो. डोके आणि कपाळ शांत होते व तरतरी येते. मानेवरचा ताण कमी होतो. पाठीचा कणा लवचिक होतो व सुदृढ होतो. त्यामुळे चेतासंस्था सशक्त होतात आणि मरगळ दूर होते.
Web Title: Mukund Mavalkar Writes Yoga Setu Bandha Sarvangasana
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..