esakal | काय म्हणता ! कुष्ठरोगाचे निर्मुलन झाले...मग हे सहा हजार रुग्ण आले कुठून?
sakal

बोलून बातमी शोधा

leprosy

कुष्ठरोगाविरुद्ध अखेरच्या युद्धाची तयारी आरोग्य विभागने केली असून, साडेसात कोटी नागरिकांची तपासणी या मोहिमेंतर्गत केली जाणार आहे.

काय म्हणता ! कुष्ठरोगाचे निर्मुलन झाले...मग हे सहा हजार रुग्ण आले कुठून?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी दोन आठवड्यांची कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविली जाते. गेल्यावर्षी सुमारे साडेसात कोटी नागरिकांची या मोहिमेअंतर्गत तपासणी करण्यात आली. त्यामध्ये राज्यात नव्याने सहा हजार 100 रुग्ण आढळले त्यामध्ये विदर्भातील विविध जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात सध्या 13 हजार 850 कुष्ठरुग्ण उपचार खाली असल्याची माहिती पुढे आली आहे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत यावर्षी कुष्ठरोगविरुद्ध अखेरचे युद्ध हे घोषवाक्य असून त्यानुसार कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्यात प्रयत्न केले जात आहेत. राज्यभर कुष्ठरोग निवारण दिनानिमित्त 13 फेब्रुवारी पर्यंत कुष्ठरोग निवारण पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारमार्फत कुष्ठरोग निर्मूलन मोहीम ऑक्टोंबर 2020 पर्यंत राबविण्यात येत आहे. दरवर्षी 30 जानेवारीला कुष्ठरोग निवारण दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त जाणीवजागृती सोबतच कुष्ठरोग याबाबत शास्रीय माहिती समाजातील विविध घटकांना देण्यात येत आहे.


कुष्ठरुग्णांच्या शंकाचे निरसन
पंधरवाड्यानिमित्त गावागावात ग्रामसभा घेण्यात येत असून, त्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आव्हानाचे वाचन केले जात आहे. सरपंच अथवा गावातील मान्यवर यावेळी कुष्ठरोग बाबत मार्गदर्शन करतील. गावातील जेष्ठ व्यक्ती महात्मा गांधींची वेशभूषा साकारून त्यामार्फत कुष्ठरोग निर्मूलन विषयक संदेश देतील. कुष्ठरोगाबाबत शंकांचे निरसन यावेळी केले जाईल. गावात कुष्ठरुग्ण असल्यास त्यांच्यामार्फत ग्रामसभेत आभार प्रदर्शन करण्यात येईल.


विविध माध्यमातून जनजागृती
कुष्ठरोगाची जनजागृती विविध माध्यमातून सुरू आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, पथनाट्य, निबंध, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलनासाठी संदेश दिला जाईल. तसेच स्पर्श अभियान राबविण्यासाठी राज्य जिल्हा आणि तालुका स्तरावर समन्वय समिती नेमण्यात आल्याचीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.