esakal | इनर इंजिनिअरिंग : योग आणि तुमची ओळख
sakal

बोलून बातमी शोधा

Sadguru

इनर इंजिनिअरिंग : योग आणि तुमची ओळख

sakal_logo
By
सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन

योग म्हणजे तुमचे शरीर वेडेवाकडे पिळणे, श्वास रोखून ठेवणे, डोकं खाली पाय वर करणे किंवा यासारखे काहीही नाहीये. मुळात तुमची जीवन प्रक्रिया तुम्ही एका मोठ्या शक्यतेसाठी विकासाची पायरी म्हणून वापरत असाल, जीवनाचा प्रत्येक पैलू तुमच्यासाठी प्रगतीची एक प्रक्रिया आणि वर जाण्याचा मार्ग झाला असेल, तर तुम्ही योगावस्थेत आहात. यासाठी पुष्कळ पद्धती आणि प्रक्रिया आहेत ज्यांच्या मदतीने असे वातावरण निर्माण केले जाऊ शकते जेणेकरून तुमचे अवघे शरीर, तुमचे अवघे मन, असे सर्वकाही, तुमच्यासाठी एक अडथळा नव्हे; तर शक्यता होऊ शकेल. फक्त योगासने करणे म्हणजे योग नव्हे. तुमचं जीवन, तुम्ही कसे जगता हा योग आहे.

योग शब्दाचा शब्दश: अर्थ आहे मिलन. तुमचा वियोग झालाय त्याचं फक्त एकच कारण आहे आणि ते म्हणजे तुम्ही तुमच्या ओळखींना घट्ट धरून बसलाय. मुळात योग म्हणजे तुमची ओळख विरून टाकणे. जी काही कार्य-कृती तुम्ही करत आहात, त्याच्याशी तुम्ही तुमची ओळख बांधता आणि मग एक प्रकारे तुम्ही पूर्वाग्रहाने दूषित होता, हाच आहे मनाचा स्वभाव. एकदा का तुम्ही तुमची ओळख एखाद्या गोष्टीशी बांधली, की मग तुमचे मन फक्त त्याभोवतीच कार्यरत राहतं.

तुम्ही म्हणालात, ‘मी भारतीय आहे’ की मग तुम्ही तसाच विचार करू लागता आणि तुम्हाला तसेच वाटूही लागते, नाही का? ‘देश’ ही फक्त एक कल्पना आहे. पण ज्या क्षणी तुम्ही या कल्पनेशी तुमची स्वतःची ओळख बांधता तुमची अवघी विचार करण्याची पद्धत, तुमची समज, तुमच्या भावना आणि तुमचा जीवनाचा अनुभव, असं सगळं काही बदलतं. हे तुमच्या बाबतीत अनेक वेगवेगळ्या पातळींवर घडत आहे. ज्या क्षणी तुमची ओळख तुम्ही एखाद्या गोष्टीशी बांधता, तुम्ही एक प्रकारे पक्षपाती प्रक्रिया बनता. योगाची संपूर्ण प्रक्रिया ही तुम्हाला तुमच्या ओळखींपासून अंतर निर्माण करणे आहे, जेणेकरून तुम्ही तुमची ओळख; तिला जशी हाताळणे गरजेची आहे तशी तुम्ही हाताळू शकाल. तुमची ओळख तुम्ही विरून टाकल्यास हे अवघे अस्तित्व जीवनाचा एक प्रचंड मोठा उद्रेक असेल. आधुनिक विज्ञानाने आता हे निःशंकपणे सिद्ध केले आहे की प्रत्येक अणू आणि परमाणू निरंतरपणे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टीशी संवाद साधत आहेत, तर मग तुम्ही यापासून का अलिप्त आहात? तुम्ही त्याला मुकत आहात कारण तुम्ही काही ना काही ओळखीत स्वतःला बांधून ठेवलंय. योग म्हणजे स्वत:च्या ओळखी अशा प्रकारे विरून टाकणे; जेव्हा तुम्ही इथे बसता तेव्हा हे अवघं अस्तित्वच तुम्ही असल्याचं अनुभवाला येतं, तुमची एक स्वतंत्र, वेगळी अशी ओळख उरत नाही.

एका क्षणासाठी तुम्ही हे अवघं अस्तित्व तुमचाच एक अविभाज्य अंग असल्याचं अनुभवलं, की मग तुम्ही कायमचेच बदलून जाल. प्रत्येक मनुष्याला हे अनुभवणे शक्य आहे.